Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » जलयुक्त शिवारच्या कामांमुळे पाण्याची समस्या सुटण्यास मदत

जलयुक्त शिवारच्या कामांमुळे पाण्याची समस्या सुटण्यास मदत

=स्वयंचलित हवामान केंद्र सुरू करण्याचे आदेश=
jalyukta shivarमुंबई, [२१ सप्टेंबर] – गेल्या काही दिवसात राज्याच्या सर्व भागात होत असलेल्या दमदार पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न बहुतांशी प्रमाणात सुटण्यास मदत होणार असून टँकर आणि चारा छावण्यांची संख्याही कमी झाली आहे. त्यासोबतच जलयुक्त शिवार योजनेतील कामामुळे पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे चित्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या आढाव्यात समोर आले आहे. या पावसामुळे रब्बीच्या क्षेत्रात भरघोस वाढ होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांसह सोलापूर, सातारा, सांगली, अहमदनगर येथील जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क साधून पीक-पाण्याच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी राज्यातील दुष्काळाचे सावट भेडसावणार्‍या अनेक भागातील चित्र स्पष्ट झाले आहे. मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव के. एच. गोविंदराज, जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.
समाधानकारक पावसामुळे राज्यात जलयुक्त शिवार योजनेच्या कामामुळे पाणी साठा आणि सिंचन क्षमतेत झालेल्या वाढीचा आढावा घेण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री पुढे म्हणाले, पाण्याचे योग्यप्रकारे नियोजन झाल्यास त्याचा रब्बी पिकासाठी फायदा होणार आहे. रब्बीखालील क्षेत्रात मोठी वाढ शक्य असून राज्यात जवळपास ७० लाख हेक्टरवर रब्बीची पिके घेतली जातील, असा अंदाज आहे. शासकीय यंत्रणेने त्या दृष्टीने नियोजन करावे. ज्या जिल्ह्यात रब्बीची पिके घेतली जात नाहीत अशा जिल्ह्यातही रब्बी पीक घेण्यासाठी कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या समाधानकारक पावसामुळे अनेक जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई दूर होण्यास मोठी मदत झाली आहे. बहुतांश जिल्ह्यात जून २०१६ पर्यंत पुरेल इतका जलसाठा निर्माण झाला आहे, तर अवर्षणग्रस्त भागातील स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असून या भागातही मार्च २०१६ पर्यंत पाणीटंचाई भेडसावणार नाही, असा विश्‍वास व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले, या पावसाच्या पहिल्या टप्प्यात पाणी आणि चार्‍याची स्थिती चांगल्याप्रकारे सुधारली आहे. जायकवाडी प्रकल्पातील साठा सव्वाचार टक्क्यांवरून ७ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. जालना जिल्ह्यातील गलाटी धरण प्रथमच ७० टक्के इतके भरले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील टँकरची संख्या १४३ वरून ६४ इतकी कमी झाली आहे. तर जालना जिल्ह्यात सात मध्यम प्रकल्पातील जलसाठा ५३ टक्के इतका वाढला असून लघु प्रकल्पातही जलपातळी वाढू लागली आहे. बीड जिल्ह्याला या पावसाने मोठा दिलासा दिला असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्याच्या मार्गावर आहे.
परभणी जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पातील साठा साडेतीन टक्क्यांवरून साडेतेरा टक्क्यांपर्यंत तर लोअर दुधना प्रकल्पातील साठा २७ टक्क्यांवरून ५५ टक्क्यांवर गेला आहे. विष्णूपुरी (जि. नांदेड) आणि माजलगाव (जि. बीड) या प्रकल्पातही पातळी वाढू लागली आहे. इतर ठिकाणीही परिस्थितीत मोठा बदल होत आहे. अनेक ठिकाणी गुरांसाठी उघडलेल्या चारा छावण्या बंद होऊ लागल्या असून पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येणार्‍या टँकरची संख्याही कमी होत आहे. काही गावात चारा टंचाई असली तरी याच गावांच्या जिल्ह्यात इतरत्र उपलब्ध असणार्‍या चार्‍यामुळे बाहेरून चारा मागविण्याची वेळ येणार नाही. अजून परतीचा पाऊस बाकी असल्याने या परिस्थितीत अधिक सुधारणा होईल.
राज्यात अनेक गावात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून चांगली कामे झाल्याने या पावसामुळे या अभियानाला मोठे यश लाभल्याचे सिद्ध झाले आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, विकेंद्रीत जलसाठ्यामुळे शेतीचा शाश्‍वत विकास होऊ शकेल, असा विश्‍वास निर्माण झाला आहे. परभणी, हिंगोली, नांदेड आदी जिल्ह्यातील जलप्रकल्पांतील पाणीपातळी वाढू लागली आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील टंचाईसदृश परिस्थितीचे सावट दूर झाले आहे.
नवीन जलस्रोत निर्माण करण्यापेक्षा जुन्या स्रोतांची दुरुस्ती व सक्षमीकरणावर लक्ष केंद्रीत केल्यास कमी खर्चात व कमी वेळेत चांगले काम होईल. तसेच स्वयंचलित हवामान केंद्रे लवकर सुरू व्हावीत यासाठी कार्यवाही करावी, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदतीचे वाटप करावे, वनहक्क कायद्याअंतर्गत आदिवासी शेतकर्‍यांना देण्यात आलेल्या जमिनीच्या सातबार्‍यावर त्या शेतकर्‍याचे नाव नोंदवावे, असे निर्देश मुख्य सचिवांनी यावेळी दिले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23988

Posted by on Sep 22 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1425 of 2451 articles)


=युनोच्या विस्ताराला विरोध म्हणजे पाठिंब्याचा अभाव नाही, अमेरिकेची स्पष्टोक्ती= वॉशिंग्टन, [२१ सप्टेंबर] - संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेचा विस्तार करण्याच्या ...

×