Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » जीवनमान उंचावण्यास सरकार कटिबद्ध

जीवनमान उंचावण्यास सरकार कटिबद्ध

=विधिमंडळातील अभिभाषणात राज्यपालांचे प्रतिपादन=
c_Vidyasagarमुंबई, [९ मार्च] – राज्यातील जनतेच्या न्याय मागण्यांची पूर्तता करणे आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज बुधवारी केले. राज्य सरकारने दुष्काळाशी सामना करण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजनांचेही राज्यपालांनी कौतुक केले. महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत सुविधा कंपनीची स्थापना रेल्वेसोबत करण्याची घोषणाही राज्यपालांनी यावेळी अभिभाषणातून केली.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सकाळी ११ वाजता दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात झाली. यात राज्यपालांनी अभिभाषण केले. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्रिमंडळातील सदस्य तसेच विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्य उपस्थित होते.
दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचा हे सरकार विशेष प्रयत्न करीत आहे, असे सांगून राज्यपालांनी रस्ते, रेल्वे, विमानतळे, बंदरे, ऊर्जा आणि सिंचन प्रकल्प यांचा धावता आढावा घेतला. ३ लाख ३७ हजार किमीच्या उद्दिष्टांपैकी २ लाख ६३ हजार किमीपेक्षा जास्त लांबीचे रस्ते पूर्ण झाले आहेत. पाच महसूल विभागांना जोडणारा नागपूर-मुंबई अतिजलद दळणवळण द्रुतगती महामार्ग बांधण्याचे काम यावर्षी हाती घेण्यात येईल, अशी घोषणाही राज्यपालांनी केली. राज्याच्या नागरी क्षेत्रात सार्वजनिक वाहतूक सुधारणा राबविण्यात येत असून, मुंबई मेट्रो-३, नागपूर आणि पुणे मेट्रो प्रकल्प ही कामे या वर्षी सुरू करण्यात येणार आहेत. नवी मुंबईतील बेलापूर पेंढार हा ११ किमीचा मेट्रोप्रकल्प पुढील वर्षी पूर्ण होईल.
नवी मुंबई विमानतळाच्या परिसरात ३० गावांचा समावेश असलेली ‘नयना’ ही स्मार्ट सिटी सिडको विकसित करणार आहे. त्यात शैक्षणिक, वैद्यकीय, करमणूक, वाणिज्यिक, वैज्ञानिक व उद्योगविषयक कार्यक्षेत्र असेल. तर दक्षिण नवी मुंबईत ब्राऊन फिल्ड स्मार्ट सिटी विकसित करण्यात येणार आहे. या ठिकाणी परवडणारी घरे, मेट्रो, बंदर विकास व अन्य आर्थिक सुविधा असतील. पुणे व सोलापूर या केंद्राने निवडलेल्या डॉन शहारांसोबतच आणखी ८ शहरे स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यात येणार आहेत.
शेतकर्‍यांसाठी राजीव गांधी आरोग्यदायी योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून, १४ जिल्ह्यांत ६८ लाख शेतकर्‍यांना अन्नसुरक्षेचा लाभ दिला जात आहे. यवतमाळ व धाराशिव (उस्मानाबाद) या दोन आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान आणि शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी दिवंगत मोतीराम लहाने कृषी समृद्धी प्रकल्प हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहेत, अशी माहिती राज्यपालांनी दिली.
राज्यपालांचे केंद्रीय सभागृहात आगमन होताच विरोधी बाकांवरून घोषणाबाजी सुरू झाली. चारा छावण्या, बंद-डान्स बार, कर्जमाफी आदी विषयांवरून सभागृहात घोषणाबाजी करीत, राज्यपालांनी मराठीतून भाषण करावे आणि शिवाजी महाराजांच्या नावाने योजना सुरू करण्याची मागणी करणार्‍या घोषणा देत विरोधकांनी सभागृहात प्रचंड गदारोळ घातला. सत्ताधारी सदस्य मात्र राज्यपालांच्या अभिभाषणाला बाके वाजवून जोरदार दाद देत होते. राज्यपालांनी इंग्रजीतून आपले भाषण पूर्ण केले आणि अभिभाषणाचा शेवट मात्र त्यांनी मराठीत केला.
अभिभाषणातील प्रमुख मुद्दे
• विदर्भ व मराठवाड्यामध्ये अधिक उद्योगधंदे आकर्षित व्हावेत, याकरिता मूल्यवर्धित करात पूर्ण सूट
• विदर्भ व मराठवाड्यातील शेतीविषयक विवंचना भासणार्‍या १४ जिल्ह्यांमध्ये विविध निवारण उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या जिल्ह्यांतील ६८ लाखांहून अधिक शेतकर्‍यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळाला आहे
• पुणे व नागपूर येथे भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (आयआयआयटी) स्थापन करण्याकरिता भारत सरकार, महाराष्ट्र शासन व खाजगी भागीदार यांच्यात डिसेंबर २०१५ मध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे
• नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेचे (आयआयएम) पहिले विद्यावर्ष यापूर्वीच २०१५-२०१६ मध्ये सुरू झाले आहे
• नागपूर व औरंगाबाद येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठेही आता अधिसूचित करण्यात आली आहेत.
• चंद्रपूरमध्ये एमबीबीएसच्या १०० जागा असलेले नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आता पूर्णपणे कार्यरत झाले असून, गोंदियामध्ये आणखी एक वैद्यकीय महाविद्यालय आणि वाशीम येथे दंतवैद्यक महाविद्यालय उभारण्याचे प्रस्तावित आहे.
• मेळघाट, धडगांव, सुरगणा आणि मोखाडासारख्या दुर्गम प्रदेशांतील दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांसाठी अग्रगण्य कंपन्यांची सामाजिक जबाबदारी अंतर्गत टेली-मेडिसिनद्वारे शिव आरोग्य योजना लवकरच चालू करण्यात येईल. शासकीय रुग्णालयांतील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकार्‍यांची कमतरता दूर करण्यासाठी, नवीन पदव्युत्तर पदविका पाठ़्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27150

Posted by on Mar 10 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (722 of 2451 articles)


=जेटलींचा मानहानी खटला= नवी दिल्ली, [९ मार्च] - दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेतील कथित भ्रष्टाचारप्रकरणात केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांची बदनामी ...

×