Home » ज.काश्मीर, झारखंड, ठळक बातम्या, राज्य » झारखंडमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत

झारखंडमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत

=जम्मू-काश्मीर त्रिशंकू, विधानसभा निवडणूक=
BJP-Sरांची/श्रीनगर, [२३ डिसेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची लाट देशात अजूनही कायम आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कामावर जनता समाधानी आहे, याची पावतीच पुन्हा एकदा मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीत झारखंडमध्ये भाजपा युतीने ४२ जागांसह स्पष्ट बहुमत प्राप्त केले असून, जम्मू-काश्मिरात २५ जागांसह दुसरा मोठा राजकीय पक्ष म्हणून तो उदयास आला आहे. या दोन्ही राज्यांमध्ये आघाडी करून सरकारमध्ये राहिलेल्या कॉंगे्रसचा पार सफाया झाला आहे. त्याचप्रमाणे प्रस्थापित पक्षांनाही भाजपाने ‘बॅकफूट’वर आणले आहे.
८१ सदस्यीय झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी कॉंगे्रस, राजद आणि जदयु हे त्रिकूट बिहार विधानसभा पोटनिवडणुकीप्रमाणेच चमत्कार घडविण्यासाठी एकत्र आले. पण, या पक्षांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. केवळ सात जागांवरच ‘त्रिकुटा’ला समाधान मानावे लागले. तर, कॉंगे्रसने साथ सोडल्यानंतर स्वबळावर निवडणूक लढविणार्‍या झारखंड मुक्ती मोर्चाला १९ जागाच मिळू शकल्या. या राज्यात बहुमतासाठी ४१ जागांवर विजय मिळविणे आवश्यक आहे. भाजपा युतीला ४२ जागा मिळाल्या असल्याने स्वबळावर सरकार स्थापन करण्याचा भाजपाचा मार्गही मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, अटलबिहारी वाजपेयी यांच्या सत्तेच्या काळात २००० मध्ये बिहारचे विभाजन करून झारखंड राज्याची निर्मिती करण्यात आली होती. तेव्हापासून आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला येथे स्पष्ट बहुमत मिळविणे शक्य झाले नाही. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होत भाजपाने ही आजवर अशक्य असलेली किमया साध्य केली आहे. गेल्या १४ वर्षांच्या काळात झारखंडमध्ये स्वबळावर सरकार स्थापन करणारा भाजपा पहिलाच राजकीय पक्ष ठरणार आहे.
भाजपाने ऑल झारखंड स्टुडंट्‌स युनियन (एजेएसयु) पक्षासोबत युती करून ही निवडणूक लढविली होती. भाजपा युतीने ४२ जागांवर विजय मिळविला असला, तरी यातील ३७ जागा भाजपाने स्वबळावर जिंकल्या आहेत. २००९ च्या निवडणुकीत भाजपाला केवळ १८ जागाच जिंकता आल्या होत्या.
या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि मावळते मुख्यमंत्री हेमंत सोरेन बरहेत मतदारसंघातून विजयी झाले असले, तरी आतापर्यंत ज्या डुमका जागेचे त्यांनी प्रतिनिधित्व केले, त्याच मतदारसंघात त्यांचा दारुण पराभव झाला आहे. अशाच प्रकारचा धक्का भाजपालाही सहन करावा लागला आहे. एकीकडे भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले असताना तब्बल तीन वेळा मुख्यमंत्रिपद भूषविणारे भाजपाचे वरिष्ठ नेते अर्जुन मुंडा यांना खर्सवान येथे पराभव पत्करावा लागला. भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रघुवर दास यांनी मात्र जमशेदपूर पूर्व ही जागा जिंकली आहे. भाजपासोबतच्या युतीत असलेल्या एजेएसयुचे प्रमुख आणि माजी उपमुख्यमंत्री सुदेश महातो यांनाही सिल्ली या त्यांच्या बालेकिल्ल्यात पराभव पत्करावा लागला. झारखंडचे पहिले मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांच्या झारखंड विकास मोर्चाने (प्रजातांत्रिक) सात जागा जिंकल्या आहेत. तथापि, मरांडी यांना त्यांच्याच गिरिडीह येथे पराभवाचा सामना करावा लागला. धनवार मतदार संघात मात्र त्यांना विजय मिळविता आला आहे. त्याचप्रमाणे, कोळसा खाण वाटप घोटाळ्यात सीबीआयने आरोपपत्र दाखल केलेले माजी मुख्यमंत्री आणि जय भारत समानता पार्टीचे प्रमुख मधू कोडा यांचा माझगाव जागेवर दारुण पराभव झाला. तिथेच, त्यांची पत्नी गीता कोडा यांनी जगंथपूरची जागा कायम ठेवण्यात यश मिळविले आहे.
जम्मू-काश्मीर त्रिशंकू
त्रिशंकू अवस्थेत आलेल्या ८७ सदस्यीय जम्मू-काश्मीर विधानसभेत भाजपाने २५ जागांवर नेत्रदीपक विजय मिळवून दुसरा मोठा पक्ष म्हणून उदयास येण्याचा मान प्राप्त केला आहे. आतापर्यंत विरोधी बाकावर असलेल्या पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीने (पीडीपी) सर्वाधिक २८ जागा जिंकल्या आहेत. नॅशनल कॉन्फरन्ससोबत युती करून पाच वर्षे सत्तेचे सुख उपभोगणार्‍या कॉंगे्रसला केवळ १२ जागाच जिंकता आल्या आहेत. तर, नॅशनल कॉन्फरन्सला १५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. अपक्ष व इतरांना सात जागा जिंकता आल्या आहेत.
मावळते मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यावर या निवडणुकीने मोठी नामुष्की आणली होती. बीरवाह आणि सोनावार अशा दोन जागांवरून त्यांनी निवडणूक लढविली. यातील बीरवाड मतदारसंघात अवघ्या एक हजार मतांच्या फरकाने ते विजयी झाले. तर सोनावार येथे त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला. २००८ च्या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सला २८, कॉंगे्रसला १७, भाजपाला ११ आणि पीडीपीला २१ जागा मिळाल्या होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मिरात भाजपाकरिता ‘मिशन ४४’ निर्धारित केले होते. तथापि, काश्मीर खोरे आणि लडाख प्रांतात असलेल्या ५० जागांपैकी एकही जागेवर भाजपाला विजय मिळविता आला नाही. भाजपाला जे काही यश मिळाले, त्यात जम्मूचा सिंहाचा वाटा आहे. असे असले, तरी इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत भाजपाला मिळालेल्या मतांची टक्केवारी सर्वात जास्त असल्याचे दिसून आले आहे.
झाविमो भाजपात विलीन करणार
दरम्यान, झारखंडमध्ये सात जागांवर विजय मिळविणार्‍या झारखंड विकास मोर्चाला भाजपात विलीन करण्याचा निर्णय या पक्षाचे अध्यक्ष बाबुलाल मरांडी यांनी घेतला आहे. याबाबतची औपचारिकता लवकरच पूर्ण केली जाईल, असे मरांडी यांनी स्पष्ट केले.
जम्मू-काश्मिरात मोठी भरारी – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
जम्मू-काश्मिरात लोकांनी बंदुकीचे भय बाजूला सारून विक्रमी मतदान केले. त्यांनी भाजपावर आपला विश्‍वास व्यक्त केला. या निकालासाठी मी काश्मिरी नागरिकांचे मनापासून अभिनंदन करतो आणि धन्यवादही देतो. झारखंडमधील नागरिकांनीही भाजपावर विश्‍वास ठेवला आणि पक्षाला स्पष्ट बहुमत दिले. लोकशाहीची खरी शक्ती दोन्ही राज्यांमध्ये लोकांनीच दाखविली.
भाजपासोबत युतीचे मेहबुबांचे संकेत
श्रीनगर : त्रिशंकू अवस्थेत असलेल्या जम्मू-काश्मीर विधानसभेत सत्तेचे समीकरण कसे राहणार, याबाबत राजकीय पंडित आणि विविध पक्ष तर्क लावत असताना, सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरलेल्या पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी आपल्या पक्षाचे सर्वच पर्याय खुले असल्याचे स्पष्ट करतानाच भाजपासोबत जाण्याचे संकेतही देऊन टाकले आहेत.
निवडणूक निकाल कुणाच्याही बाजूने नाहीत. स्थिती चिंताजनक अशीच आहे. सर्वात जास्त जागा आम्हाला मिळाल्या असल्या, तरी आम्ही सरकार स्थापन करण्याची घाई करणार नाही. आम्ही सर्व शक्यता आणि पर्याय तपासून पाहणार आहोत. लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणे व सुशासन देणे यालाच आमचे प्राधान्य राहणार आहे, असे सांगताना मेहबुबा मुफ्ती यांनी सुशासनाकरिता केद्रातील भाजपा सरकारची स्तुतीही केली. निवडणूक निकाल जाहीर होत असताना आणि निकालांचा कल स्पष्ट झाला असताना पत्रकारांनी त्यांना गाठून पीडीपीची भूमिका काय राहील, याबाबत विचारणा केली होती.
युतीचे पर्याय खुले भाजपाध्यक्षांची ग्वाही
जम्मू-काश्मिरात २५ जागांसह भाजपा ‘किंगमेकर’च्या भूमिकेत असतानाच, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी एक तर पीडीपी किंवा नॅशनल कॉन्फरन्ससोबत युती करण्याचे आमचे पर्याय खुले असल्याचे स्पष्ट केले.
भाजपाला या राज्यात सरकार स्थापन करायचे आहे. यासाठी पीडीपी किंवा नॅशनल कॉन्फरन्स दोनपैकी कुणासोबतही युतीकरिता आम्ही प्रयत्न करू शकतो. आमच्याजवळ तीन पर्याय आहेत. पहिला म्हणजे, स्वत: सरकार स्थापन करणे, दुसरा पर्याय इतर पक्षाच्या सरकारला पाठिंबा देणे आणि तिसरा पर्याय म्हणजे, इतरांच्या सरकारमध्ये सहभागी होणे, असे अमित शाह यांनी राजधानी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.उद्या बुधवारी भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. यात सर्व पर्यायांची चाचपणी केली जाणार आहे. याशिवाय, झारखंडमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल, यावरही चर्चा केली जाणार आहे, असे शाह म्हणाले.
अंतिम निकाल :
जम्मू-काश्मीर (एकूण जागा ८७)
भाजपा २५
माकपा १
कॉंग्रेस १२
नॅकॉं १५
पीडीपी २८
पीकॉ २
पीडीएफ (एस) १
अपक्ष ३
झारखंड (एकूण जागा ८१)
बसपा १
भाजपा ३७
कॉंग्रेस ६
एजेएसयु ५
झामुमो १९
झाविमोप्र ८
इतर ५

Short URL: https://vrittabharati.in/?p=19234

Posted by on Dec 24 2014. Filed under ज.काश्मीर, झारखंड, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ज.काश्मीर, झारखंड, ठळक बातम्या, राज्य (2308 of 2452 articles)


=नववर्षात करणार प्रवेश= नाशिक, [२३ डिसेंबर] - राज ठाकरे यांच्या अवतीभवती असलेल्या ‘चापलुसी’ नेत्यांंच्या व्यवहाराला कंटाळलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चार ...

×