Home » क्रीडा, ठळक बातम्या » झुंज अपयशी : फिल ह्युजचे निधन

झुंज अपयशी : फिल ह्युजचे निधन

=क्रिकेट वर्तुळात शोककळा=
phil-hughesसिडनी, [२७ नोव्हेंबर] – तीन दिवसांपूर्वी शेफिल्ड शिल्ड सामन्यात एक उसळता चेंडू खेळण्याच्या नादात डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर कोमात गेलेला ऑस्ट्रेलियाचा युवा क्रिकेटपटू फिल ह्युजची मृत्युशी सुरू असलेली झुंज अखेर संपली असून, सिडनी येथील एका रुग्णालयात त्याने गुरुवारी अखेरचा श्‍वास घेतला. ह्युजच्या अकाली निधनामुळे जागतिक क्रिकेट वर्तुळात एकच शोककळा पसरली आहे आणि उमद्या क्रिकेटपटूचे अशाप्रकारे निधन झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ह्युजच्या निधनाची घोषणा केली.
२५ वर्षीय ह्युज शेफिल्ड शिल्ड सामन्यात ६३ धावांवर खेळत असताना वेगवान गोलंदाज सीन अबॉटचा उसळता चेंडू खेळण्याचा त्याचा प्रयत्न चुकला आणि चेंडू डोक्यावर लागल्यामुळे तो मैदानातच कोसळला होता. तातडीने मैदानावर उपचार करण्यात आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, मैदानावर बेशुद्ध पडल्यानंतर तो कोमात गेला आणि अखेरपर्यंत तो शुद्धीवर आलाच नाही.
गेल्या मंगळवारी जखमी झाल्यानंतर ह्युज कधीही शुद्धीवर आला नाही. अखेरचा श्‍वास घेण्यापूर्वी त्याला कोणत्याही वेदना होत नव्हत्या आणि यावेळी त्याचे कुटुंबीय आणि मित्र त्याच्या जवळ होते. क्रिकेट समुदाय म्हणून आम्ही ह्युजच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त करतो आणि या दु:खाच्या प्रसंगी आम्ही त्याचे कुटुंब आणि मित्रांसोबत आहोत, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
चेंडू लागून ह्युजचे निधन झाल्यामुळे जागतिक क्रिकेट वर्तुळात एकच शोककळा पसरली असून, भारतासह जगभरातील अनेक आजीमाजी क्रिकेट खेळाडूंनी अशा घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. फिलिप ह्युज इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेत मुंबई इंडियन्सकळून खेळला होता. फेब्रुवारी-मार्च २००९ साली कसोटी पर्दापण करणार्‍या ह्युजने २६ कसोटी सामने खेळले आणि तीन शतके व सात अर्धशतकांसह १५३५ धावा केल्या. जुलै २०१३ मध्ये ह्युजने इंग्लंडविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर असून, फिल ह्युजच्या सन्मानार्थ उद्या शुक्रवारपासून ऍडिलेड येथे खेळला जाणारा भारताचा सराव सामना रद्द करण्यात आला आहे. याशिवाय ४ डिसेंबरपासून ब्रिस्बेन येथे खेळल्या जाणार्‍या पहिल्या कसोटी सामन्यावरही अनिश्‍चिततेचे सावट पसरले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=18656

Posted by on Nov 28 2014. Filed under क्रीडा, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, ठळक बातम्या (2332 of 2455 articles)


वॉशिंग्टन, [२६ नोव्हेंबर] - स्वामी विवेकानंद, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर या तिघांची कार्यक्षेत्रे निरनिराळी असली आणि ही व्यक्तिमत्त्वे ...

×