Home » आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप » डॉ आंबेडकरांचे लंडनमधील घर शासनाच्या ताब्यात

डॉ आंबेडकरांचे लंडनमधील घर शासनाच्या ताब्यात

=खरेदी प्रक्रिया पूर्ण=
dr. ambedkar's house in londonलंडन, [२५ सप्टेंबर] – १९२० च्या दशकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थी दशेत लंडन येथील ज्या घरात वास्तव्य केले होते, ते तीन मजली घर महाराष्ट्र सरकारने खरेदी प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घेतले आहे. या घराचे स्मारकात रूपांतर करण्यासाठी लवकरच पावले उचलण्यात येणार आहे.
‘आपल्या सर्वांनाच कळविताना मला अतिशय आनंद होत आहे की, महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि लंडनमधील भारतीय उच्चायोगाच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र सरकारच्या विशेष प्रयत्नांमुळे डॉ. आंबेडकर यांचा मुक्काम असलेले वायव्य लंडन भागातील १०, किंग हेन्री मार्गावरील २०५० चौरस फुटांचे हे घर गुरुवार, २४ सप्टेंबर रोजी खरेदी करण्यात आले असून, या घरावर आता महाराष्ट्र सरकारची मालकी प्रस्थापित झाली आहे,’ अशी माहिती फेडरेशन ऑफ आंबेडकरी ऍण्ड बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन, ब्रिटनचे अध्यक्ष संतोष दास यांनी दिली.
या वास्तूत दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असून, ते पूर्ण झाल्यानंतर या घराचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात रूपांतर करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
लंडन आणि जगभरातील आंबेडकरी अनुयायांसाठी हा दिवस अतिशय आनंदाचा आहे. याच घरात डॉ. आंबेडकर यांनी अभ्यास करून आपले शिक्षण पूर्ण केले होते आणि जातिव्यवस्थेच्या, तसेच ब्रिटिश राजवटीच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी स्वत:ला सक्षम केले होते. त्यामुळे हा दिवस सर्व आंबेडकरी अनुयायांसाठी तितकाच महत्त्वाचाही आहे. भारतीय रुपयाचे एकीकडे प्रचंड अवमूल्यन होत असताना, डॉ. आंबेडकरांच्याच ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपीज : इट्‌स ओरिजन ऍण्ड इट्‌स सोल्युशन’ या निबंधामुळे भारत सरकारला मोठी मदत मिळाली होती.
नजीकच्याच भविष्यात ब्रिटनमधील भारतीय आणि जगभरातून येथे येणारे अनुयायी, तसेच डॉ. आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेले सर्वच स्तरांवरील नागरिक या घराला भेट देऊ शकणार आहेत. पुढील वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती आहे. त्यापूर्वीच या घराचे स्मारकात रूपांतर झाले, तर आंबेडकरी अनुयायांचा आनंद द्विगुणीत होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24057

Posted by on Sep 26 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप (1412 of 2458 articles)


=संयुक्त राष्ट्रसंघात निनादला भारतीय संस्कृतीचा जयघोष= न्यूयॉर्क, [२५ सप्टेंबर] - जगात शांतता नांदण्यासाठी, न्यायपूर्ण विकास होण्यासाठी गरिबी दूर होण्याची नितांत ...

×