Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » तर मी पंतप्रधान असतो : शरद पवार

तर मी पंतप्रधान असतो : शरद पवार

=सोनियानिष्ठांनी आडकाठी आणली होती=
SHARAD PAWARनवी दिल्ली, [११ डिसेंबर] – राजीव गांधी यांच्या हत्येनंतर १९९१ मध्ये केंद्रात कॉंगे्रसच्या नेतृत्वात आघाडीचे सरकार सत्तेवर आले. त्यावेळी पंतप्रधान होण्याची संधी मला प्राप्त झाली होती. पण, सोनिया गांधी यांचे निवासस्थान असलेल्या १०, जनपथमधील काही सोनियानिष्ठांनी माझ्या मार्गात अडथळे आणले होते, असा दावा राष्ट्रवादी कॉंगे्रसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केला.
पंतप्रधानपदाच्या शर्यतीत माझे नाव आघाडीवर होते. पण, स्वतंत्र आणि धडक विचारसरणीच्या तरुणाला या सर्वोच्च पदावर बसविणे योग्य होणार नाही. शरद पवार हे ‘लंबी रेस का घोडा’ असल्याने, त्यांच्यामुळे गांधी घराण्याचे महत्त्व कमी होईल, असे या निष्ठावान नेत्यांनी त्यावेळी सोनिया गांधींना सांगितले. त्यापेक्षा वृद्ध असलेले आणि कुठलाही प्रभाव नसलेले पी. व्ही. नरसिंहराव यांना या पदावर बसविण्यात यावे, असा सल्लाही त्यांनी सोनियांना दिला, असे नरसिंहराव मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री राहिलेले शरद पवार यांनी आपल्या नव्या पुस्तकात म्हटले आहे. ‘लाईफ ऑड माय टर्मस्- फ्रॉम द ग्रासरुट ऍण्ड कॉरिडोर ऑफ पॉवर’ असे त्यांच्या पुस्तकाचे नाव आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी यासारख्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत पवारांच्या या पुस्तकाचे गुरुवारी विमोचन करण्यात आले.
पंतप्रधानपदासाठी माझ्या उमेदवारीला केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर अन्य राज्यांचाही पाठिंबा होता. पण, १०, जनपथच्या निर्णयावरच सर्व काही अवलंबून आहे, याची मला जाणीव असल्याने मी स्वत: सोनियांच्या सभोवताल सुरू असलेल्या घडामोडींवर लक्ष ठेवून होतो. १९९१ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरसिंहराव यांनी प्रकृतीचे कारण समोर करून राष्ट्रीय राजकारणातून माघार घेतली होती. पण, केवळ मी पंतप्रधान होऊ नये, यासाठी त्यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यात आले. माझ्याविरोधात सोनिया गांधी यांच्या मनात कटुता निर्माण करणार्‍यांमध्ये अर्जुन सिंह, माखनलाल फोतेदार, आर. के. धवन आणि व्ही. जॉर्ज यासारख्या नेत्यांचा समावेश होता. सत्यता अशी आहे की, हे सर्वच नेते पंतप्रधानपदासाठी इच्छुक होते. पंतप्रधानपदासाठी पक्षात मतदान घेण्यात आले आणि नरसिंहराव यांना माझ्यापेक्षा ३५ मते जास्त मिळाली. यानंतर गांधी घराण्याच्या अतिशय जवळ असलेले पी. सी. अलेक्झांडर यांनी राव आणि माझ्यात बैठक घडवून आणली आणि पहिल्या तीन सर्वोच्च मंत्रालयांपैकी एक मंत्रालय मला देण्याचे ठरले, असा दावाही पवार यांनी केला आहे.
याच पुस्तकातील अन्य एका भागात पवार यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. १९९७ मध्ये अटलबिहारी वाजपेयी सरकारवरील विश्‍वासमताच्या काळात मी बसपा नेत्या मायावती यांची भेट घेतली आणि सरकारविरोधात मतदान करणेच तुमच्या हितात असल्याचे सांगितले होते, असे त्यांनी नमूद केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26133

Posted by on Dec 12 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1032 of 2453 articles)


=धावत्या रेल्वेत बालकाच्या दुधाची सोय= कानपूर, [११ डिसेंबर] - रेल्वे प्रवासादरम्यान दुधासारखी जीवनावश्यक वस्तू सहजगत्या उपलब्ध न झाल्याने अनेक बालकांचे ...

×