Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » तर राज कपूर यांना रशियाचे अध्यक्ष केले असते

तर राज कपूर यांना रशियाचे अध्यक्ष केले असते

=रशियन दिग्दर्शक निकिता मिखालकोव्ह यांचे गौरवोद्‌गार=
nikita mikhalkovपणजी, [२६ नोव्हेंबर] – रशियामध्ये भारतीय चित्रपटांचा खूप प्रभाव असल्यानेच ते पाहण्यासाठी रांगा लागायच्या. प्रेम आणि आपुलकी यांचे दर्शन घडत असल्याने लहानपणापासूनच माझ्यावरही राज कपूर यांच्या चित्रपटांची मोहिनी होती. राज कपूर यांची रशियात लोकप्रियता एवढी मोठी होती की, ते आणखी काही काळ जगले असते, तर रशियाच्या नागरिकांनी त्यांना देशाच्या अध्यक्षपदी विराजमान केले असते, असे गौरवोद्‌गार प्रसिद्ध व ज्येष्ठ रशियन दिग्दर्शक निकिता मिखालकोफ यांनी येथे काढले. मिखालकोव्ह यांना यंदा आंचिमचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे, हे विशेष.
आंचिममध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मनमोकळेपणाने आपले विचार व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासमवेत आंचिमचे संचालक सी. सेंथिल राजन उपस्थित होते.
आज भारतातच नव्हे तर रशियामध्येसुद्धा हॉलिवूड चित्रपटांची कॉपी करण्याचा प्रयत्न केला जातो. पण एखाद्या भागामध्ये त्या स्थानिक संस्कृतीचा सुगंध असलेली आणि राष्ट्रीयत्व जपणारी कलाकृतीच खर्‍या अर्थाने जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय म्हणून संबोधली जाऊ शकते, असे सांगत स्थानिक लोकांनी राज्यात, देशात आपल्या समस्यांवर व विषयांवर बनविलेले चित्रपटच मला भावतात. कारण त्यात खर्‍या अर्थाने खरेपणा आणि सांस्कृतिक ओळख दिसून येतेे. ही सांस्कृतिक ओळख जपण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.
आपल्या चित्रपटांबद्दल बोलताना मिखालकोव्ह यांनी सांगितले की, चित्रपटांना खर्‍या अर्थाने आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. कोणत्याही राजकीय व्यक्ती किंवा घटनेवर भाष्य न करता तत्कालीन वास्तव परिस्थितीचे चित्रण मी माझ्या चित्रपटांमध्ये केले आहे. त्यामुळेच बर्न्ट बाय द सन या चित्रपटाला १९९५ सालचा सर्वात्कृष्ट विदेशी चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार प्राप्त झाला होता. त्याचप्रमाणे १९९८ सालचा द बार्बर ऑफ सायबेरिया या चित्रपटाने १९९९ सालच्या कान्स चित्रपट महोत्सवाची सुरूवात झाली होती. हा मान क्वचितच कोण्या दिग्दर्शकाला मिळतो.
लोभच हिंसेला कारणीभूत
आजच्या काळात चित्रपटांमधून हिंसेचे प्रकार वाढत आहेत. त्यावर बोलताना ते खूप हळवे झाले. आज जगात स्वार्थ, लोभ वाढला आहे. माणसाला असे दिसू लागले आहे की आपण पैशांनी सर्व काही विकत घेऊ शकतो. आपल्याकडे गोष्टी असण्याची इच्छा वाढत चालली असून त्यातच सर्व सुख आहे, असे आज सर्वांना वाटते आहे. या इच्छेतूनच हिंसा जन्माला येते आहे. एखादी गोष्ट असण्यात आनंद नसतो, तर तो मानण्यात असतो. हे जोपर्यंत माणसाला समजत नाही तोपर्यंत आपण स्वत:च स्वत:चा नाश करून घेणार आहोत, याकडे मिखालकोव्ह यांनी लक्ष वेधले.
पुरस्कारासाठी काम करत नाही
आजपर्यंत आपल्याला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यंदाच्या आंचिममध्येही जीवनगौरव पुरस्कार बहाल करण्यात येणार असल्याबद्दल मिखालकोव्ह यांनी आभार व्यक्त केले. तसेच यापूर्वी ज्यांना हा पुरस्कार देण्यात आला ते सर्व महान लोक आहेत. त्यांच्या रांगेत बसविल्याने हा माझा सन्मानच आहे, असे त्यांनी बोलताना नमूद केले. त्याचप्रमाणे पुरस्कार हे कधीच तुम्हाला समाधान देत नाहीत. पण तुमचे काम तुम्हाला समाधान देते. म्हणूनच मी कधीच पुरस्कारासाठी काम केले नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25758

Posted by on Nov 27 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक (1145 of 2453 articles)


वॉशिंग्टन, [२६ नोव्हेंबर] - इसिस समुहाकडून तेल खरेदी करण्यास अमेरिकेने सीरियावर प्रतिबंध घातला आहे. सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर-अल-असद यांचे सरकार आणि ...

×