Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » तामिळनाडूतील पूरपरिस्थितीवर केंद्राची नजर: राजनाथ

तामिळनाडूतील पूरपरिस्थितीवर केंद्राची नजर: राजनाथ

=सर्वतोपरी मदत करणार=
RAJNATH SINGHनवी दिल्ली, [३ डिसेंबर] – तामिळनाडूतील गंभीर पूरपरिस्थितीवर केंद्राची नजर असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याला तातडीची म्हणून ९३० कोटी रुपयांची मदत दिली असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज गुरुवारी संसदेत सांगितले.
तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशातील पूरपरिस्थितीवर संसदेच्या दोन्ही सभागृहात झालेल्या चर्चेला राजनाथसिंह उत्तर देत होते. तामिळनाडूतील पूरपरिस्थितीची हवाई पाहणी करण्यासाठी पंतप्रधान मोदी गुरुवारी दुपारी चेन्नईला गेले आहेत, ही पाहणी झाल्यानंतर राज्याला आणखी मदत दिली जाईल, याकडे लक्ष वेधत राजनाथसिंह म्हणाले की, पुरामुळे तामिळनाडूत २६९, तर आंध्रप्रदेशात ५४ बळी गेले आहेत.
तामिळनाडूत २४ तासांत ३३० मिमी पाऊस झाला असून, राज्यातील स्थिती अतिशय गंभीर आहे, सर्वत्र पाणीच पाणी असल्यामुळे मदत सामुग्री पोहोचवण्यातही अडथळे येत आहेत, असे स्पष्ट करत राजनाथसिंह म्हणाले की, पावसाने गेल्या १०० वर्षांचा रेकॉर्ड तोडला आहे. पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी लष्कर, तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या अनेक चमू राज्यात पाठवण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
पूरपरिस्थितीमुळे राज्यातील विमान, तसेच रेल्वेसेवा विस्कळीत झाली असून, रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी चेन्नईच्या जवळपास कुठपर्यंत गाड्या आणता येतील, याचा रेल्वे मंत्रालय आढावा घेत आहे, असे राजनाथसिंह यांनी सांगितले.
अशा राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी तातडीने मदतकार्य करण्यासाठी आपत्ती निवारण मंत्रालय स्थापन करण्यात यावे, अशी सूचना समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी केली होती, त्याचा संदर्भ देत असे खाते तयार असल्याचे राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले.
राज्यातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात पाठवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात पिण्याचे पाणी, दूध आणि खाण्याच्या पदार्थांची टंचाई नसल्याचे राज्य सरकारने कळवले असल्याचे त्यांनी सांगितले. विविध पक्षांनी राजनाथसिंह यांच्या निवेदनावर असमाधान व्यक्त केले, तृणमूल कॉंग्रेसने तर सभात्यागही केला. पश्‍चिम बंगालला एकाचवेळी पूरपरिस्थिती आणि दुष्काळी समस्येचा सामना करावा लागत आहे, मात्र केंद्रसरकार राज्याला सापत्नपणाची वागणूक देत असल्याचा आरोप तृणमूल कॉंग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय यांनी केला.
बिजू जनता दलाचे भर्तृहरी मेहताब यांनीही राजनाथसिंह यांच्या उत्तरावर नाराजी व्यक्त केली. राजनाथसिंह यांच्याकडून आणखी सकारात्मक उत्तराची आणि ठोस उपाययोजनांची अपेक्षा होती, मात्र ती पूर्ण झाली नाही, असा आरोप करत मेहताब म्हणाले की, राज्यातील नैसर्गिक आपत्तीच्या मुकाबल्यासाठी सरकारने ४ हजार कोटी रुपयांची मागणी केली असताना केंद्र सरकारने फक्त २८० कोटी रुपये दिले. ओडिशाला आधीच्या संपुआ आणि आताच्या रालोआ सरकारककडून सापत्न वागणूक मिळत आहे, असे ते म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25963

Posted by on Dec 4 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1092 of 2453 articles)


सॅनफ्रॅन्सिस्को, [३ डिसेंबर] - एअर इंडिया या सार्वजनिक विमान वाहतूक कंपनीने असंख्य अनिवासी भारतीयांचे वास्तव्य असलेल्या अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीसाठी नवी ...

×