Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » ‘त्यांना’ धरणे, निदर्शनेच करू द्या : मोदी

‘त्यांना’ धरणे, निदर्शनेच करू द्या : मोदी

=२४ तास वीज, प्रत्येक झोपडपट्टीधारकाला पक्क्या घराचे आश्‍वासन=
Modi in delhi election rallyनवी दिल्ली, [१० जानेवारी] – दिल्लीत २४ तास वीज आणि २०२२ पर्यंत प्रत्येक झोपडपट्टीधारकाला पक्के घर देण्याची घोषणा करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत स्थिर, सक्षम आणि बहुमताचे सरकार निवडून देण्याचे आवाहन दिल्लीवासीयांना केले. रामलीला मैदानावर आयोजित विराट सभेत पंतप्रधान मोदी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. आपल्या भाषणात केजरीवाल यांच्यावर टीका करताना त्यांना धरणे, निदर्शनेच करू द्या, असा उपहासही मोदींनी केला.
यावेळी व्यासपीठावर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, राष्ट्रीय संघटनमंत्री रामलाल, केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन, पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्रसिंह, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयुष गोयल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, झारखंडचे मुख्यमंत्री रघुवरदास, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, दिल्ली प्रदेश भाजपाचे प्रभारी खा. प्रभात झा, दिल्ली प्रदेश भाजपाचे अध्यक्ष सतीश उपाध्याय, ज्येष्ठ भाजपा नेते विजयकुमार मल्होत्रा, दिल्लीतील भाजपाचे खासदार मनोज तिवारी, प्रवेश वर्मा, मीनाक्षी लेखी, भाई उदितराज, राज्यसभा सदस्य विजय गोयल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राजधानीतील जनरेटरचे आवाज सरकार बंद करणार आहे, त्यासाठी दिल्लीत २४ तास वीज देण्याचा सरकारचा निर्धार आहे, असे स्पष्ट करत मोदी म्हणाले की, जनरेटर बंद झाल्यामुळे आपोआपच विषारी वायुपासून जनतेची सुटका होणार आहे. प्रदूषणही कमी होणार आहे.
विजेचे बिल कमी करण्यासाठी सरकार दिल्लीत प्रत्येक घरात दोन एलईडी बल्ब देणार आहे. या बल्बमुळे विजेचे बिल वर्षाला तीनशे रुपयांनी कमी होणार आहे, याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की, विजेचे दर कमी करण्यासाठी सरकार राजधानी दिल्लीत एक क्रांतिकारक निर्णय घेणार आहे. वीज विकण्यासाठी एकापेक्षा जास्त कंपन्यांना परवानगी दिली जाणार आहे. ज्या कंपनीचे विजेचे दर कमी असतील त्या कंपनीची वीज ग्राहकांना घेता येईल. यामुळे वीज विकणार्‍या कंपन्यांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन त्यांचे दर कमी होतील आणि याचा फायदा ग्राहकांना मिळेल, असे मोदी यांनी स्पष्ट केले.
राजधानीतील एकही माणूस झोपडपट्टीत आणि फुटपाथवर राहू नये, असे माझे स्वप्न आहे. त्यामुळे २०२२ पर्यंत म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्ष पूर्ण होतील, त्या वर्षात प्रत्येक झोपडपट्टीधारकाला पक्के घर दिले जाईल, असे आश्‍वासन मोदी यांनी दिले.
भ्रष्टाचार नाहीसा करण्याचा माझा निर्धार आहे, वरच्या पातळीवरील भ्रष्टाचार संपवण्याची मी सुरुवात केली आहे, त्यानंतर खालच्या पातळीवरील भ्रष्टाचार नाहीसा करेल, असे स्पष्ट करत मोदी म्हणाले की, आधी पंतप्रधानपदावरील व्यक्तीवरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले, पण माझ्यावर कोणीही भ्रष्टाचाराचे आरोप करू शकले नाही.
आपल्या भाषणात त्यांनी आम आदमी पार्टी आणि या पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. ज्या माणसाचा अराजकावर विश्‍वास आहे, जो अराजकाचे खुलेआम समर्थन करतो, त्याने नक्षलवाद्यांना जाऊन मिळावे, मात्र कोणत्याही परिस्थितीत आम्ही दिल्लीत, अराजक येऊ देणार नाही, असे ठणकावून सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19549

Posted by on Jan 11 2015. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (2259 of 2452 articles)


= ४८०० कोटींची केंद्राची मदत ७ दिवसात : फडणवीस= नवी दिल्ली, [१० जानेवारी] - राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या निवारणासाठी केंद्राकडे ४८०० ...

×