दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी आज मतदान
Saturday, February 7th, 2015=यंत्रणा सज्ज, चोख पोलिस बंदोबस्त=
नवी दिल्ली, [६ फेब्रुवारी] – दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी उद्या शनिवार ७ फेब्रुवारीला मतदान होत असून ६७३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदान सुरळीत आणि शांततेत व्हावे म्हणून निवडणूक आयोगाने संपूर्ण तयारी केली आहे. मंगळवारी १० फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात होणार असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. मागील निवडणुकीपेक्षा यावेळी मतदानाची वेळ एकतासाने कमी झाली आहे. मागील निवडणुकीत सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली होती. १ कोटी ३३ लाख ९ हजार ७८ मतदार १२१७७ मतदान केंद्रातून मताधिकार बजावणार आहेत. यातील ३६ लाख ९३ हजार ९७५ मतदार २० ते २९ या वयोगटातील आहेत. विशेष म्हणजे ३११ मतदार हे शंभर आणि त्यापेक्षा जास्त वर्षांचे आहेत. ७४१ मतदानकेंद्रे संवेदनशील असून १९१ अतिसंवेदनशील आहेत.
निवडणूक व्यवस्थेत ९५ हजार अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणुकीसाठी २० हजार इव्हीएम आणि १६ हजार इव्हीएम कंट्रोल युनिट राहणार आहेत. मतदान शांततेत पार पडावे, कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून राजधानीत ३५ हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. गुरुवारी प्रचार संपल्यानंतर काल रात्रीपासून उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार सुरू केला आहे. विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयात मतदारांना मतदानासाठी कसे बाहेर काढायचे यादृष्टीने चर्चा सुरू होती.
सव्वा वर्षाच्या कार्यकाळात दिल्लीला दुसर्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. याआधी डिसेंबर २०१३ मध्ये दिल्लीत विधानसभा निवडणूक झाली होती. यावेळी भाजपा, आम आदमी पार्टी आणि कॉंग्रेस यांच्यातच खरा मुकाबला आहे. भाजपाने किरण बेदी यांना आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केले आहे. आम आदमी पार्टीतर्फे अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत. कॉंग्रेस माजी केंद्रीय मंत्री अजय माकन यांना प्रचार समितीचे प्रमुख नियुक्त करून त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढत आहे.
नवी दिल्ली मतदारसंघात आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांचा सामना भाजपाच्या नुपूर शर्मा आणि कॉंग्रेसच्या किरण वालिया यांच्याशी आहे. कृष्णानगर मतदारसंघात भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्याविरुद्ध आपचे बग्गा आणि कॉंग्रेसचे बन्सीलाल हे उमेदवार आहेत. कॉंग्रेसचे अजय माकन सदर बाजार मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी ग्रेटर कैलाशमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जनकपुरीमध्ये सासरे आणि जावई यांच्यातच लढाई आहे. याठिकाणी भाजपाचे प्रो. जगदीश मुखी यांच्याविरुद्ध त्यांचे जावई कॉंग्रेसचे सुरेशकुमार यांच्यात चुरस आहे.
Short URL: https://vrittabharati.in/?p=20362

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!