Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » दीक्षाभूमीला जगातील सर्वोत्तम स्थळ करू!

दीक्षाभूमीला जगातील सर्वोत्तम स्थळ करू!

  • धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळ्यात मुख्यमंत्री
  • बाबासाहेबांचे विचार देशाला तारू शकतात

Devendra-Fadnavis3नागपूर, [२३ ऑक्टोबर] – दीक्षाभूमी विकासाचा मास्टर प्लॉन तयार होत आहे. जगातील सर्वोत्तम सुंदर स्थळ व्हावे म्हणून सर्व व्यवस्था दीक्षाभूमीवर केली जाईल. त्यासाठी जितकी जागा लागेल ती उपलब्ध करून दिली जाईल. शिवाय निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे ५९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा भीमसागराच्या उपस्थितीत दीक्षाभूमीवर साजरा करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कार्यक्रमाला अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, कर्नाटकचे सामाजिक न्याय मंत्री एच. अंजय्या, महापौर प्रवीण दटके, नागपूरचे माजी पालकमंत्री शिवाजीराव मोघे, आ. नाना शामकुळे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. प्रकाश गजभिये, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी प्रवीण दराडे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, नासुप्रचे सभापती श्याम वर्धने, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, रातुम नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, पोलिस आयुक्त शारदाप्रसाद यादव उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, डॉ. आंबेडकरांनी देशाला संविधानसारखे अस्त्र दिले. संविधानामुळे आज देश प्रगती साधत आहे. २१ व्या शतकातील आव्हाने आणि त्यावरील उपाय हे बाबासाहेबांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सांगितले आहेत. यावरून त्यांच्या व्यापक दूरदृष्टीचा आपल्याला परिचय होतो. बुद्ध धम्माने तलवारीने नव्हे तर विचाराने जगावर राज्य केले आहे. याच विचाराने आज जगातील अनेक देशांनी विकास साधला आहे. महामानवाने आपल्याला जगण्याचा मंत्र दिला, त्यांचे स्मारक इंदू मिलच्या जागेवर व्हावे, यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन तीन दिवसांत जागा मिळवून दिली. लंडनमधील बाबासाहेबांचे घर विकत घेतले. हा प्रश्‍न पैशाचा नव्हे, तर अस्मितेचा आहे. येत्या १२ नोेव्हेंबर पंतप्रधानांच्या हस्ते लंडनमधील घराचे लोकार्पण होईल.
डॉ. आंबेडकर थोर अर्थशास्त्री होते. त्यांचे आर्थिक विचार देशाला तारू शकतात. त्यामुळे त्यांच्या विचाराचे संशोधन व्हावे म्हणून लंडनमध्ये संग्रहालय तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाची स्थापना केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी भदंत सुरई ससाई, एच. अंजय्या, महापौर प्रवीण दटके, शिवाजीराव मोघे यांचेही भाषणे झालीत. प्रास्ताविक स्मारक समितीचे कार्यवाह सदानंद फुलझेले यांनी केले. संचालन डॉ. अर्चना मेश्राम यांनी तर आभार विलास गजघाटे यांनी केले. व्यासपीठावर डॉ. राजेंद्र गवई, ऍड.आनंद फुलझेले, विजय चिकाटे, प्राचार्य डॉ. पी. टी. पगार आदी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
बुद्ध सर्किटमध्ये ८०० कि. मी. रस्ते बांधणार- गडकरी
तथागत गौतम बुद्धाचे जन्मस्थळ कपिलवस्तू (नेपाळ) या ठिकाणी आहे, तर बुद्धगयेत त्यांना बुद्धत्व प्राप्त झाले. याशिवाय बुद्धांनी सारनाथ येथे धम्मकार्य केले. बुद्ध जिथे-जिथे गेले, त्या सर्व रस्त्यांचा ‘बुद्ध सर्किट’ म्हणून विकास करणार आहे. या ८०० किलोमीटर रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात येईल. यासाठी ४ हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून, हे बांधकाम दोन वर्षांत पूर्ण केले जाईल. या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन येत्या दोन महिन्यात पंतप्रधानांच्या हस्ते केले जाईल, अशी गोड बातमी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
नितीन गडकरी म्हणाले की, जपान, नेपाळ, चीन, इंडोनेशिया, थायलंड, सिंगापूर आदी अनेक देशात बुद्ध धम्म आहे. या देशांतील लोकांना बुद्ध सर्किटमुळे बौद्ध स्थळांचे दर्शन घेणे सोयीचे जाईल, असे सांगून गडकरी म्हणाले की, कुणीही व्यक्ती जाति-धर्माच्या आधारावर नव्हे, तर गुणांवर मोठी ठरत असते. डॉ. आंबेडकरांनी हे सिद्ध करून दाखविले. बाबासाहेबांनी सर्व शास्त्रांचा अभ्यास केला होता. त्यामुळे ते जगातील उत्कृष्ट संविधान देऊ शकले. त्या संविधानाचा स्मृति-दिवस साजरा करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्य, समता, बंधुता घराघरांत पोहोचविणार- बडोले
बाबासाहेब आंबेडकरांनी करुणा, शांतीचा बौद्ध धम्म देऊन आमच्यावर उपकार केले. त्याची आठवण म्हणून दरवर्षी दीक्षाभूमीवर परिवर्तनाची लाट येते. सूर्याची किरणे आणि कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नव्हता. परंतु बाबासाहेबांमुळे प्रकाशाची किरणे गावांत पोहोचली. केंद्र व राज्यात आमचे सरकार येताच वर्षभरात बाबासाहेबांची स्वप्न पूर्ण व्हायला लागलीत. इंदू मिलच्या जागेवर स्मारक, लंडनमधील बाबासाहेबांच्या घराचा प्रश्‍न निकाली निघाला. सामाजिक न्याय मंत्रालयाच्या माध्यमातून ५० मागास मुले दिल्लीला आयएएस प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय घेतला. ‘बार्टी’चे उपकेंद्र नागपुरात सुरू होणार आहे. बाबासाहेबांचा स्वातंत्र, समता व बंधुत्वतेचा विचार घराघरांपर्यंत पोहोचविण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे, असे मत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25278

Posted by on Oct 24 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1293 of 2451 articles)


=सोमय्या यांचा बॉम्बगोळा= मुंबई, [२३ ऑक्टोबर] - सिंचन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि सुनील तटकरे ...

×