Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » देशाला घडले खरे ‘कॉंग्रेस दर्शन’

देशाला घडले खरे ‘कॉंग्रेस दर्शन’

  • सोनियांचे वडील फॅसिस्ट
  • नेहरूंमुळेच निर्माण झाली काश्मीर, सियाचिन समस्या
  • सरदार पटेलांवर स्तुतिसुमने

Sanjay-Nirupam -ANIमुंबई, [२८ डिसेंबर] – कॉंग्रेस पक्ष आज सोमवारी १३१ वा स्थापना दिवस धडाक्यात साजरा करीत असताना, पक्षाचेच मुखपत्र असलेल्या ‘कॉंगे्रस दर्शन’मधून या पक्षाच्या खर्‍या चेहर्‍याचे दर्शन घडविण्यात आले. यातील एका लेखात पं. जवाहरलाल नेहरू यांच्यामुळेच काश्मीर, तिबेट आणि सियाचिनची समस्या निर्माण झाली, तर कॉंगे्रस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे वडील फॅसिस्ट होते, अशी जबरदस्त टीकेची झोड यातून उठविण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे पार नाचक्की झालेल्या व हादरलेल्या कॉंग्रेसने या प्रकरणी मजकूर संपादक सुधीर जोशी यांना बडतर्फ केले आहे.
पंडित नेहरू पंतप्रधान असताना, त्यांना त्यांच्या सरकारमधील गृहमंत्री आणि प्रख्यात स्वातंत्र्यसेनानी सरदार वल्लभभाई पटेल यांनी काश्मीर, चीन आणि तिबेट मुद्यांवर अतिशय योग्य सल्ला दिला होता. पण, नेहरूंनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. सरदार पटेलांचे त्यांनी ऐकले असते, तर आज या समस्या निर्माणच झाल्या नसत्या, असे ‘कॉंगे्रस दर्शन’मधील सरदार पटेलांना आदरांजली वाहणार्‍या एका लेखात नमूद करण्यात आले आहे. तथापि, या लेखाच्या शेवटी कोणत्याही लेखकाचे नाव नाही.
नेहरू सरकारमध्ये सरदार पटेल यांना उपपंतप्रधान आणि गृहमंत्रिपद देण्यात आले असतानाही या दोन्ही नेत्यांमध्ये प्रचंड तणावाचे संबंध होते. त्यांच्यातील मतभेद इतके टोकाला गेले होते, ते प्रत्येक वेळी राजीनामा देण्याचीच धमकी देत असायचे. सरदार पटेलांकडे दूरदृष्टी होती. त्यामुळे नेहरूंची नेहमीच अडचण व्हायची. १९५० मध्ये सरदार पटेलांनी नेहरूंना एक पत्र लिहिले होते. यात त्यांनी चीनच्या तिबेट धोरणाबाबत सावध राहण्याचा सल्ला नेहरूंना दिला होता. चीन हा विश्‍वासपात्र देश नसून, भविष्यात तो भारताचा शत्रूच बनेल, याकडेही पटेलांनी नेहरूंचे लक्ष वेधले होते. काश्मीर प्रश्‍न संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावर उपस्थित करण्याच्या नेहरू यांच्या धोरणालाही पटेल यांनी विरोध केला होता. नेहरू यांनी आंतरराष्ट्रीय मुद्यांवर पटेलांचे ऐकले असते, तर आज ज्या समस्यांचा भारत सामना करीत आहे, त्या समस्या कदाचित उद्‌भवल्याच नसत्या, असेही लेखात म्हटले आहे. पक्षाच्याच मुखपत्राने अशा प्रकारचा घरचा अहेर दिल्यामुळे कॉंगे्रस पक्ष चांगलाच अडचणीत सापडला आहे. विशेष म्हणजे, मुंबई कॉंगे्रसचे अध्यक्ष संजय निरुपम हे या मुखपत्राचे संपादक आहेत.
या मुखपत्रातील एका लेखात सोनिया गांधी यांचे वडील एक फॅसिस्ट शिपाई होते. १९६८ मध्ये राजीव गांधी यांच्याशी सोनियांचा विवाह झाल्यानंतर त्या भारतात राहू लागल्या. मात्र, त्यांनी उशिरा म्हणजेच १९८३ मध्ये भारताचे नागरिकत्व स्वीकारले होते. सोनिया गांधी १९९८ मध्ये कॉंग्रेसच्या अध्यक्ष झाल्या. त्यानंतर त्यांनी केंद्रात सरकार स्थापन करण्याचा अयशस्वी प्रयत्नही केला होता, असेही मुखपत्रात म्हटले आहे.
स्वातंत्र्याच्या काळात अनेक प्रादेशिक समित्या सरदार पटेल यांच्या बाजूने होत्या. पण, महात्मा गांधींच्या इच्छेचा मान राखत पटेल यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आणि नेहरूंना पाठिंबा दिला होता. आंतरराष्ट्रीय व्यवहारासोबत पटेल यांनी गृहमंत्री या नात्याने राष्ट्रीय स्तरावरही नेहरूंना अनेक सूचना केल्या होत्या. त्या नेहरूंनी ऐकल्या असत्या, तर गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी १९६१ पर्यंत प्रतीक्षा करावीच लागली नसती.
निरुपम यांचा माफीनामा
दरम्यान, पक्षाच्या मुखपत्रातील चुकांची जबाबदारी मी पूर्णपणे स्वीकारली आहे. या प्रकरणी दोषींविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती मुखपत्राचे संपादक संजय निरुपम यांनी दिली. आम्ही चुका दुरुस्त करू आणि पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घेऊ, असेही निरुपम म्हणाले.
मुख्यालयावर पक्षाचा ध्वज फडकला
नवी दिल्ली : पक्षाच्या १३१ व्या स्थापना दिनानिमित्त सोनिया गांधी यांनी पक्षाच्या अकबर रोड येथील मुख्यालयावर पक्षध्वज फडकावला. उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, पक्षाचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद, आनंद शर्मा, शीला दीक्षित, गुलाम नबी आझाद आणि मणिशंकर अय्यर यांच्यासह अन्य नेते यावेळी उपस्थित होते. मात्र, कोणताही नेता पत्रकारांशी बोलला नाही.
प्रकाश जावडेकर, भाजपा – ‘‘सत्य कधीच लपत नसते. कधी तरी ते समोर येतच असते. कॉंगे्रसच्याच मुखपत्रातून पक्षाच्या १३१ व्या स्थापनादिनी या पक्षाबाबतचे सत्य देशवासीयांपुढे आले आहे. या मुद्यावर आता सोनिया गांधी यांनी स्पष्टीकरण द्यावे.’’

Short URL: https://vrittabharati.in/?p=26298

Posted by on Dec 28 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (977 of 2453 articles)


लाहोर, [२८ डिसेंबर] - २५ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाहोरला आश्‍चर्यकारक भेट देऊन पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट ...

×