Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » दोन्ही सभागृहांमध्ये समन्वय आवश्यक

दोन्ही सभागृहांमध्ये समन्वय आवश्यक

  • जीएसटीसह महत्त्वपूर्ण विधेयके पारित करण्यासाठी सहकार्य करा
  • अभिभाषणावरील उत्तरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधकांना आवाहन

Narendra modi-lok-sabha_16नवी दिल्ली, [९ मार्च] – जीएसटीसह अनेक महत्त्वपूर्ण विधेयके पारित करण्यासाठी विरोधी पक्षांनी सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी राज्यसभेत केले.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले की, लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांच्या भूमिकेत समन्वय असला पाहिजे. राज्यसभा हे ज्येष्ठांचे सभागृह आहे, हे सभागृह मोठी भूमिका बजावू शकते. अनेक विधेयक या सभागृहात चर्चेच्या प्रतिक्षेत आहेत, त्यामुळे लोकसभेत पारित झालेले विधेयक येथेही पारित करण्यासाठी या सभागृहाने सहकार्य केले पाहिजे.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात कॉंग्रेसवर सडकून टीका केली. मोदी यांच्या भाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांनी केला, पण त्याला भाजपा सदस्यांनी चोख प्रत्युत्तर दिले.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणात कोणतीही दुरुस्ती न सुचवता ते एकमताने पारित करण्याचे आवाहन मोदी यांनी केले. सभागृहाचे कामकाज सुरळीत चालू दिल्याबद्दल विरोधी पक्षांचे तसेच अभिभाषणावरील चर्चेत मोठ्या संख्येत सहभागी झाल्याबद्दल सदस्यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले.
कॉंग्रेसवर हल्ला चढवताना मोदी म्हणाले की, मृत्यूला ज्याप्रमाणे बदनाम न होण्याचे वरदान मिळाले आहे, तसेच वरदान कॉंग्रेस पक्षालाही मिळाले आहे, कॉंग्रेस पक्ष कधीच बदनाम होत नाही. जेव्हा कोणाचा मृत्यू होतो, तेव्हा आम्ही त्या मृत्यूची वेगवेगळी कारणे सांगतो, तसेच कॉंग्रेसचेही आहे, कॉंग्रेसवर टीका केली की, ती टीका विरोधी पक्षांवर आहे, आमच्यावर नाही, असे कॉंग्रेस म्हणते, असे पंतप्रधान उपरोधिकपणे म्हणाले.
प्रश्‍नोत्तराचा तास ही सदस्यांची मोठी ताकद आहे, यातून सरकारला घेरण्याची विरोधकांना संधी मिळते आणि सरकारलाही जागरुक राहावे लागते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
समाजात दोन प्रकारचे लोक असतात, एक काम करणारे आणि दुसरे श्रेय घेणारे, या शब्दात कॉंग्रेसवर हल्ला चढवताना मोदी म्हणाले की, कॉंग्रेसने काम केले असते, तर आमच्यावर जनधन योजना आणण्याची वेळ आली नसती. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांना शालजोडीतून मारत मोदी म्हणाले की, विरोधी पक्षनेते म्हणून जनधन योजनेतील घोटाळा उघडकीस आणून त्यांनी चांगले काम केले, पण सत्तेत असतानाही त्यांनी असेच चांगले काम केले असते, तर चांगले झाले असते.
मी डॉ. मनमोहनसिंग यांच्यासारखा अर्थतज्ज्ञ नाही, मात्र मी गरीब आणि गरिबी जवळून पाहिली आहे, असा टोला मारत पंतप्रधान म्हणाले की, त्यामुळेच मला गरिबांसाठी काही करता आले. योग्य दिशेने काम केले तर यश निश्‍चितच मिळते.
कौशल्य विकासाबाबत कॉंग्रेसजवळ खुप ज्ञान होते, पण त्यांनी काहीच केले नाही, याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की, त्यांनी समित्या तर अनेक स्थापन केल्या, पण त्याची एकही बैठक झाली नाही. याउलट कौशल्यविकासाच्या बाबतीत आम्ही अडीचपट काम केले.
गंगेच्या स्वच्छतेची मोहीम राजीव गांधी यांच्या कार्यकाळात हाती घेण्यात आली होती, असा दावा कॉंग्रेसवाले करतात, मग ३० वर्षानंतरही गंगा नदीत घाण का, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे, असे स्पष्ट करीत मोदी म्हणाले की, श्रेय घेण्याचा प्रयत्न करणे चुकीचे नाही, पण त्यासाठी काही काम करायला पाहिजे. कॉंग्रेसच्या कार्यकाळात अनेक मोठमोठे प्रकल्प रखडले होते. मी स्वत: ३०० प्रकल्पांचा आढावा घेतला आणि हे प्रकल्प सुरू केले.
आमच्या सरकारचा भर पारदर्शिता आणि सुशासनावर आहे. सुशासनासाठी आम्ही उत्तरदायित्व निश्‍चित केले. अधिकारांचे विकेंद्रीकरण केले. पर्यावरण आणि अन्य क्षेत्रात राज्यांना जास्त अधिकार दिले. रेल्वे, रस्ते, वीज आणि पाईपलाईनच्या मंजुरीचा अधिकार राज्य सरकारांना देऊन टाकला. एक हजार कोटींपेक्षा कमी किमतींच्या प्रकल्पांना मंजुरी देण्याचा अधिकार मंत्रालय पातळीवर दिला, असे त्यांनी सांगितले.
सरकार धोरणाच्या आधारे चालावे, यावर आम्ही भर दिला. भ्रष्टाचार आणि वशिलेबाजीमुळे देशाची प्रतिमा खराब होते. त्यामुळेच आमचा भर पारदर्शी कारभारावर आहे. आमच्या कोळसा वाटप पद्धतीची फोर्ब्स मासिकानेही स्तूती केली आहे, असे सांगताना ते म्हणाले की, माझ्या त्रुटी आणि चुका शोधण्यासाठी कॉंग्रेस मायक्रोस्कोप घेऊन बसली आहे, पण त्यांना माझ्या चुका सापडत नाही, कारण प्रशासनाची निर्णयप्रक्रिया पारदर्शी केली आहे. मुद्रा बँकेच्या माध्यमातून आम्ही कोट्यवधी लोकांना कर्ज दिले, याचा सर्वाधिक फायदा अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांनाच मिळाला आहे, असे सांगत आपल्या प्रदीर्घ भाषणात मोदी यांनी सरकारच्या कल्याणकारी आणि लोकाभिमुख कार्यक्रमांचाही आढावा घेतला.
आतापर्यंत स्वच्छतेच्या मुद्यावर संसदेत कधी चर्चा झाली नाही, मात्र आम्ही सत्तेत आल्यानंतर हा मुद्दा जनआंदोलनाचा विषय झाला आहे, आमच्यावर टीका करणारी माध्यमसुद्धा या मुद्यावर आम्हाला सहकार्य करीत आहेत, असे ते म्हणाले.
विदर्भातील संत्रा उत्पादकांना दिलासा
विदर्भातील शेतकर्‍यांच्या समस्यांचा उल्लेख करीत मोदी म्हणाले की, आपल्या उत्पादनात ५ टक्के संत्रा रस मिसळविण्याबाबत आम्ही कोका कंपनीशी करार केला आहे. या निर्णयाचा फायदा प्रामुख्याने विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकर्‍यांना मिळणार आहे, त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढणार आहे, याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की, बटाट्यात कमी तर चीप्समध्ये जास्त फायदा आहे. हिरव्या मिरचीला कमी, तर लाल मिरचीला जास्त भाव मिळतो, त्यामुळे आम्ही मूल्यवर्धनाचा निर्णय घेतला आहे. २०२० पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा आमचा निर्धार आहे. त्यादृष्टीने अनेक पावले आम्ही टाकली आहेत. आज शेतकरी कोणताही विचार न करता शेजारच्या शेतकर्‍याने टाकले म्हणून आपल्या शेतातही खत आणि कीटकनाशक टाकतो. त्यामुळे शेतीतील मातीची तपासणी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, यातून शेतकर्‍याला त्याच्या शेतातील मातीची प्रतवारी कळेल, असे पंतप्रधान म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27190

Posted by on Mar 10 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (709 of 2453 articles)


=१४ एप्रिलपासून मुंबईत भारत समुद्र परिषदेचे आयोजन= नवी दिल्ली, [९ मार्च] - भारतीय समुद्र क्षेत्रात गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणात संधी आहे. ...

×