Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » दोषींना सोडणार नाही

दोषींना सोडणार नाही

=सूरज परमार आत्महत्या प्रकरण, मुख्यमंत्र्यांचा इशारा=
FADNAVIS_DEVENDRA1नागपूर, [१८ डिसेंबर] – अकारण कोणत्याही गुन्ह्यात सूडभावनेतून कुणालाही गोवणार नाही. मात्र, चौकशीत दोषी आढळल्यास कोणत्याही परिस्थितीत सोडणारही नाही, असा कणखर इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शुक्रवारी दिला. यात लोकप्रतिनिधी असो किंवा अधिकारी कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाणे येथील कॉसमॉस ग्रुपचे प्रमुख बांधकाम व्यावसायी सूरज परमार आत्महत्या प्रकरणाची लक्षवेधी सूचना विधानसभा सदस्य अतुल भातखळकर यांनी विधानसभेत उपस्थित केली. त्यावर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केलेल्या उपप्रश्‍नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सदर इशारा दिला.
ठाणे शहरातील काही राजकीय पुढारी, महानगर पालिकेतील अधिकारी, नगरसेवक आदींनी बांधकामाच्या परवानग्या देण्यासाठी लाच घेऊनही कामात अडथळे आणले गेले. सदर प्रकरणातील आरोपींच्या खात्यातून या सभागृहाच्या एका सदस्यांच्या खात्यात पैसे गेले, त्या सदस्याचा या प्रकरणात सहभाग असेल तर, त्यांच्यावर गुन्हा नोंदवणार का, असा उपप्रश्‍न अमित साटम यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून सभागृहात उपस्थित केला होता.
या प्रकरणी चौकशी दरम्यान, काही नोंदी आढळ्या असून, त्याची चौकशी सुरू आहे. मात्र, त्याबाबत आम्ही अद्याप अंतिम निष्कर्षावर पोचलेलो नाही. त्यामुळे गुन्हा नोंदवलेला नसून, निष्कर्षाअंती निःपक्षपणे कोणी कोणत्याही पक्षाचा आणि विचाराचा असो, त्याची पर्वा न करता दोषी असणार्‍यांवर कारवाई करू, असे मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला आश्‍वस्त केले.
एकदा कठोर कारवाई करण्याची गरज आहे. कठोर कारवाई झाली नाही तर, अशा पद्धतीची प्रवृत्ती संपणार नाही. ही गँग प्रथा मोडून काढण्याचा सरकारचा संकल्प असून, यात सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
‘ते’ जितेंद्र आव्हाड!
आमदार अनिल गोटे यांनी या चर्चेत सहभाग घेत, परमार प्रकरणातील आरोपींकडून पैसे घेतल्यासंदर्भात ज्या सदस्याचे नाव समोर येत आहे, त्या सदस्याचे नाव जाहीर करण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीला सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांनी साथ देत मागणी लावून धरली. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी ‘ते’ सदस्य जितेंद्र आव्हाड असल्याचे सभागृहाला सांगितले. परमार आत्महत्या प्रकरणात चार नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यातील एका नगरसेवकाकडून आव्हाडांना पैसे दिल्याचे काही पुरावे तपासात समोर आले. ते न्यायालयापुढे ठेवण्यात आले असून, चौकशी सुरू आहे. चौकशीअंती जी काही सत्यता समोर येईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
* गरज पडल्यास मोक्काही लावू
परमार प्रकरणात शस्त्राचा वापर करण्यात आला, ब्लॅकमेलिंग झाली आहे. त्यामुळे हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार असल्याने, शासनाने संबंधितांवर मोक्का लावावा आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करावे, अशी मागणी आमदार अनिल गोटे यांनी यावेळी केली. तेव्हा, चौकशीअंती निष्पन्न झाल्यास, कायद्यात बसत असेल आणि आवश्यकता भासल्यास मोका लावण्यात सरकार मागेपुढे पाहणार नाही, असे ठाम मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. तर, सध्या आयुक्त आणि सहआयुक्तांच्या नेतृत्वात तपासकार्य योग्यदिशेने सुरू असून, एसआयटी स्थापन करण्याची आवश्यकता नाही. भविष्यात गरज भासल्यास ते देखील करता येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26217

Posted by on Dec 20 2015. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (1005 of 2452 articles)


वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत मांडला ठराव अवयवदानाच्या प्रकियेत जवळच्या नातेवाईकांमध्ये आजी-आजोबा, नात-नातूचा समावेश लहान मुले, मनोरुग्णांचे अवयव ...

×