Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » धार्मिक तिढा संपला तर भारताचा विकास

धार्मिक तिढा संपला तर भारताचा विकास

  • बराक ओबामा यांचे मत
  • तीन दिवसांच्या ऐतिहासिक भारत दौर्‍याची सांगता

India US Obamaनवी दिल्ली, [२७ जानेवारी] – विविध धर्म, संस्कृती आणि भाषा अशा वैविधतेने नटलेला असाच भारत देश आहे. या देशाने सहिष्णुता काटेकोरपणे जपली, तर भारताचा प्रचंड विकास होऊ शकतो. धार्मिक तिढा विकासाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे, असे स्पष्ट मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आज मंगळवारी व्यक्त केले.
प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी म्हणून रविवारी भारताच्या तीन दिवसांच्या भेटीवर आलेले ओबामा यांनी आज सिरी फोर्ट ऑडिटोरियममध्ये सुमारे १५०० मान्यवरांची उपस्थिती असलेल्या सभेला संबोधित करताना ३५ मिनिटांच्या आपल्या भाषणात भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृतीचा आवर्जून उल्लेख केला. प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्मानुसार, आपल्या श्रद्धेनुसार राहण्याचे, प्रथांचे पालन करण्याचे आणि कार्य करण्याचे स्वातंत्र्य आहे. सोबतच, कोणत्याही धर्मावर श्रद्धा न ठेवण्याचाही अधिकार असतो. अशा सर्वच प्रकारच्या नागरिकांना एकाच समाजात शांततेत राहता यावे, यासाठी पक्षपातरहित आणि निर्भय वातावरणाची गरज असते, असे ओबामा यांनी सांगितले.
धर्माचा गैरवापर व्हायलाच नको, असे स्पष्ट करताना, सर्व धर्म एकाच झाडाची फुले आहेत, या महात्मा गांधींच्या विचाराचेही ओबामांनी स्मरण केले. भारत हा सर्वात मोठा लोकशाही देश आहे. यात विविध जाती-पंथ-धर्म एकत्र नांदत आहेत. हा एकोपा आणखी भक्कम झाल्यास जगासमोर तो एक आदर्श ठरेल. प्रत्येकाला त्याच्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे. मात्र, त्याचवेळी धर्मा-धर्मांत तेढ निर्माण करणार्‍या प्रवृत्तींनाही आपण विरोध केला पाहिजे. त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे, असे ओबामांनी नमूद केले. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांना दहशतवादाच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी दहशतवादविरोधात एकजूट होण्याची आणि परस्पर सहकार्याने कार्य करण्याची गरज आहे, असे ओबामा म्हणाले.
भारत आणि अमेरिका हे नैसर्गिक भागीदार आहेत. लोकशाही, धार्मिक स्वातंत्र्य आणि विविधता हे दोन्ही देशांचे समान मूल्य आहेत. याच मूल्यांच्या बळावर दोन्ही देशांनी विकास साधला आहे आणि दोन्ही देशातील नागरिकांची मने जुळून आली आहेत, असेही ओबामा यांनी सांगितले.
भारत हा सर्वोत्तम मित्र
भारत हा अमेरिकेचा सर्वोत्तम मित्र आहे आणि ही मैत्री आणखी घट्ट होऊ शकते. अमेरिकेत ३० लाख भारतीय आहेत. त्यामुळे दोन्ही देश अधिकच जवळ आले आहेत. सर्व क्षेत्रात एकमेकांना सहकार्य करीत आपण पुढे जाऊ या, असे आवाहन ओबामा यांनी केले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला कायम सदस्यत्व मिळावे, यासाठी अमेरिकेचा पाठिंबा आहे. त्याशिवाय भारतातील गरिबी दूर करण्यासाठी आणि ऊर्जाविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास अमेरिका तयार असल्याचेही ओबामांनी सांगितले.
आचार्‍याचा नातू राष्ट्राध्यक्ष झाला
चहावाल्याचा मुलगा पंतप्रधान झाला आणि आचार्‍याचा नातू राष्ट्राध्यक्ष होऊ शकला, अशा देशांमध्ये आपण राहात आहोत, असे सांगत ओबामा यांनी मोदींसोबतच्या दोस्तीची वेगळी किनार समोर ठेवली. माझे आजोबा ब्रिटिश लष्करात आचारी होते. जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा आमच्यासारख्या लोकांना मतदानाचाही हक्क नव्हता, असे ओबामा म्हणाले. भाषणाच्या ओघात त्यांनी नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी, मिल्खा सिंग, मेरी कोम, शाहरुख खान यांचा उल्लेख करीत भारतात गुणवत्ता ठासून भरलेली आहे, असे गौरवोद्‌गार काढले.
नमस्ते… जयहिंद…
भारतातील तीन दिवसांच्या ऐतिहासिक भेटीचा समारोप करताना ओबामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय नागरिकांचे मन:पूर्वक आभार मानले. भारताच्या पाहुणचाराने आपण भारावून गेलो. भारत दौरा संपविल्यानंतर पालम विमानतळावर आल्यानंतर ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी दोन्ही हात जोडून ‘नमस्ते… जय हिंद’ असे उद्‌गार काढले.
ताजमहाल पहायला नक्की येऊ : मिशेल
यावेळी ताजमहाल पाहण्याची आमची संधी हुकली. पण, जगातील आठ आश्‍चर्यांपैकी एक असलेले हे प्रेमाचे प्रतीक पाहण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा भारतात नक्की येऊ, अशी प्रतिक्रिया मिशेल ओबामा यांनी दिली.
ओबामा निघाले सौदी अरबकडे
प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी म्हणून आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आज मंगळवारी भारत आणि भारतीयांचे आभार मानत आपल्या तीन दिवसीय ऐतिहासिक दौर्‍याची सांगता केली. दुपारी दोनच्या सुमारास आपल्या विशेष एअरफोर्स वन या विमानाने ते सौदी अरबकडे रवाना झाले.
पालम विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांनी अभूतपूर्व सन्मानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारत देश आणि समस्त भारतीयांचे आभार मानले. असा सन्मान मी आजवर अनुभवला नाही, असे ओबामा यांनी ट्विटरवर नमूद केले. पालम विमानतळावर आल्यानंतर बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा या दोघांनीही हात जोडून नमस्ते…जय हिंद असे म्हटले आणि भारताचा निरोप घेतला. पंतप्रधान मोदी यांनीही ट्विट करून, ‘आपला प्रवास मंगलमय होवो,’ अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
ओबामा थेट सौदी अरबला जाणार आहे. गेल्या आठवड्यात निधन झालेले सौदी नरेश अब्दुल्ला यांच्या अंत्यसंस्कार सोहळ्यात ते सहभागी हेाणार आहेत. त्यानंतर ते अमेरिकेला रवाना होणार आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20123

Posted by on Jan 28 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (2157 of 2453 articles)


=मिस्किल कुंचला शांत झाला= पुणे, [२७ जानेवारी] - स्वातंत्र्योत्तर भारताला पन्नास वर्षापेक्षाही अधिक काळ आपल्या व्यंग्यचित्राने अधिक सुंदर बनविण्यासाठी झटणारे ...

×