Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » नरेंद्र मोदींनी करून दाखविले!

नरेंद्र मोदींनी करून दाखविले!

=पाकमधील मीडियाची स्तुतिसुमने=
Prime Minister Narendra Modi with Pakistani Prime Minister Nawaz Sharifइस्लामाबाद, [११ जुलै] – पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्याचा जो निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला होता, त्यादिशेने त्यांनी वारंवार पावले उचलली आहेत. रशियाच्या ऊफा येथे त्यांनी पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेऊन या दिशेने आणखी एक ठोस पाऊल उचलले आहे. मोदी केवळ बोलत नाहीत, तर करूनही दाखवितात, अशा शब्दात पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांनी आज शनिवारी मोदी यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला आहे.
नरेंद्र मोदी आणि नवाझ शरीफ यांच्यातील भेट म्हणजे फार मोठी उपलब्धी असून, यामुळे दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यास प्रचंड मदत होणार आहे. आता द्विपक्षीय संबंधांतील पुढील प्रगती दोन्ही देशांमधील विशेषत: पाकमधील राजकीय नेतृत्वावर अवलंबून राहणार आहे. नवाझ शरीफ यांच्या मनात भारतासोबत संबंध सुधारावे, असा विचार कदाचित असावा. पण, लष्कर आणि आयएसआय यासारख्या पाकमधील अन्य शक्तिशाली संस्थांवर त्यांचे नियंत्रण नसल्याने आणि आपली भूमिका त्यांच्यासमोर रोखठोकपणे मांडणे त्यांना शक्य नसल्याने या संधीचे पाकिस्तान कसे सोने करणार, हा प्रश्‍न महत्त्वाचा ठरणार आहे, असे ‘डॉन’ या आघाडीच्या दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.
दहशतवादी कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानसोबत चर्चा करण्यास भारतातील अनेक राजकीय पक्षांचा विरोध असतानाही, त्याकडे दुर्लक्ष करून नरेंद्र मोदी यांनी शरीफ यांची शुक्रवारी रशियात भेट घेतली आणि पुन्हा एकदा मैत्रीचा हात पुढे केला. आपला शब्द खरा करून दाखविण्याची ताकद मोदी यांच्यात आहे. आता आम्ही केवळ जगाला दाखविण्यासाठी बोलत नाही, तर जगाला दिलेला शब्द खरा करून दाखविण्याचीही क्षमता आपल्यात आहे, हे दोन्ही देशांना सिद्ध करावे लागणार आहे, असेही अग्रलेखात नमूद आहे.
नवाझ शरीफ यांनी नरेंद्र मोदी यांना सार्क परिषदेच्या निमित्ताने पाकिस्तानला येण्याचे निमंत्रण दिले आणि मोदी यांनी ते सहर्षपणे स्वीकारले. पुढील वर्षी नरेंद्र मोदी यांनी खरोखरच पाकला भेट दिली, तर हादेखील एक इतिहासच ठरेल. कारण, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी भारतावर दहा वर्षे सत्ता केल्यानंतरही ते पाकला आले नव्हते. नरेंद्र मोदी यांना प्रादेशिक सहकार्य मजबूत करायचे असल्याने आणि शेजारी देशांसोबत विशेषत: पाकसोबत चांगले संबंध ठेवायचे असल्याने ते नक्कीच पाकचा दौरा करतील, असा विश्‍वासही या दैनिकाने व्यक्त केला आहे.
शरीफांवर प्रखर टीका
दरम्यान, मोदी यांची स्तुती करताना, पाकमधील काही मीडिया व राजकीय नेत्यांनी नवाझ शरीफ यांच्यावर मात्र टीकेचा भडिमारही केला. मोदी यांच्यासोबत सुमारे तासभर चर्चा केल्यानंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी केले आणि दहशतवादाचा प्रभावीपणे मुकाबला करण्याचे वचनही दिले. पण, शरीफ यांनी मोदी यांच्यासोबत चर्चा करताना किंवा संयुक्त निवेदनात काश्मीरचा साधा उल्लेखही केला नाही, अशी टीका माध्यमांनी केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23391

Posted by on Jul 12 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1566 of 2458 articles)


ब्रसेल्स, [११ जुलै] - युरोपीय आयोग, युरोपियन केंद्रीय बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ग्रीसने आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी सादर केलेल्या नव्या ...

×