Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » नितीशकुमार, मांझींचा बहुमताचा दावा

नितीशकुमार, मांझींचा बहुमताचा दावा

=बिहारात सत्तासंघर्ष शिगेला=
jitan nitishपाटणा, [९ फेब्रुवारी] – जदयुने पक्षातून हकालपट्टी केल्यानंतरही बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी राजीनामा देण्यास ठाम नकार दिल्याने बिहारमध्ये सुरू असलेला सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. नितीशकुमार यांनी १३० समर्थक आमदारांच्या चिठ्ठीसह राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा केला, तर मांझी यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी २० ते २३ फेब्रुवारीपर्यंतची मुदत मागितल्यामुळे आता राज्यपाल कोणता निर्णय घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राज्यपालांनी ४८ तासात निर्णय घेतला नाही तर समर्थक १३० आमदारांची राज्यपालांसमोर परेड करण्याची तयारी नितीशकुमार यांनी केली आहे. तत्पूर्वी, जदयुचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपाखाली मांझी यांची सोमवारी पक्षातून हकालपट्टी केली.
नितीशकुमार, जदयु अध्यक्ष शरद यादव आणि राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यासह मोठ्या संख्येत समर्थक आणि आमदारांनी सोमवारी दुपारी राजभवनावर धडक दिली. राज्यपाल त्रिपाठी सकाळीच कोलकात्याहून पाटण्यात आले. सुमारे तासभर चाललेल्या बैठकीनंतर बाहेर प्रतीक्षेत असलेल्या पत्रकारांशी बोलताना नितीशकुमार म्हणाले की, सरकार स्थापन करण्याची संधी मला नाकारण्यात आली किंवा चालढकल करण्यात आली तर, जदयु, राजद, कॉंगे्रस आणि भाकपच्या सर्व १३० आमदारांना आपण राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यापुढे उपस्थित करू. राजभवनाबाहेर माझे १३० समर्थक आमदार उभे आहेत. त्यांच्या गळ्यात विधानसभा सचिवालयाने जारी केलेले ओळखपत्रही आहे. इच्छा असेल, तर तुम्ही त्यांची भेट घेऊ शकता, असेही मी राज्यपालांना सांगितले. पण, त्याची काहीच गरज नसल्याचे राज्यपाल म्हणाले.
संधी दिल्यास आपल्या सरकारचे बहुमत सिद्ध करण्याची माझी तयारी आहे, असे मी राज्यपालांकडे स्पष्ट केले आहे. त्यांनी मला दिवस सांगावा, त्याच दिवशी मी आपले बहुमत सिद्ध करेन. येत्या २० फेबु्रवारीपासून बिहार विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असल्याने त्यापूर्वीच नवीन सरकार सत्तेवर यावे, अशी विनंती मी राज्यपालांना केली असल्याचे नितीशकुमार म्हणाले.
बिहारमधील या अस्थिर स्थितीसाठी भाजपाच जबाबदार आहे, असा आरोप करून राज्यपाल त्रिपाठी यांनी मांझी यांना येत्या ४८ तासात बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणीही त्यागी यांनी केली.
मांझी बहुमत सिद्ध करतील : भाजपा
दरम्यान, जीतन राम मांझी बहुमत सिद्ध करतील, असा विश्‍वास त्यांच्या चेहर्‍यावरच झळकत आहे. मांझी समर्थकांमध्ये उत्साह तर, नितीशकुमार यांच्या तंबूत निरुत्साह दिसत आहे, असे भाजपा प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी सांगितले. मांझी यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाने पाठिंबा द्यायला हवा का, याबाबत अद्याप कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मांझी राज्यपालांना भेटले
दरम्यान, जीतन राम मांझी यांनी सोमवारी सायंकाळी राज्यपाल त्रिपाठी यांची भेट घेतली आणि नितीशकुमार यांची निवड बेकायदेशीर असल्याचे सांगताना, स्वत:चे बहुमत सिद्ध करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली. तथापि, राज्यपालांनी त्यांची भूमिका ठामपणे फेटाळून लावली. भाजपानेही आपली भूमिका विधानसभेत जाहीर करण्याचे ठरविले असल्याने मांझी यांचे भवितव्य आगामी ४८ तासातच निश्‍चित होणार आहे. मांझी हे पक्षविरोधी कारवाया करीत असल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात येत आहे, असा आदेश शरद यादव यांनी जारी केला. बेशिस्तीकरिता त्यांचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द करण्यात येत आहे. जदयुच्या घटनेतील कलम ३ नुसार पक्षाध्यक्षांना कुणालाही बडतर्फ करण्याचे अधिकार दिले आहेत, असेही त्यागी यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20478

Posted by on Feb 10 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (2076 of 2452 articles)


नवी दिल्ली, [९ फेब्रुवारी] - स्वित्झर्लंडमधील एचएसबीसी या खाजगी बँकेने जगातील २०० देशांमधील खातेधारकांची नावे उघड केली आहेत. त्यापैकी ११९५ ...

×