Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » नितीशकुमार मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार

नितीशकुमार मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार

 =मुलायमसिंह यादव यांची घोषणा, स्वत: लालूंनीच ठेवला प्रस्ताव=
nitish_kumarनवी दिल्ली, [८ जून] – बिहार विधानसभा निवडणुकीच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारावरून जदयु आणि राजद यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला वाद समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी आज सोमवारी यशस्वी शिष्टाई करून सोडविला. नितीशकुमार हेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार राहणार असल्याचे मुलायमसिंह यांनी जाहीर केले. तथापि, जागावाटपाचा वाद अजूनही कायम असल्याने वाद पूर्णपणे मिटला, असे सध्यातरी म्हणता येणार नाही.
याच वर्षीच्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होत असलेली बिहार विधानसभा निवडणूक जदयु आणि राजद संयुक्तपणे लढणार आहे आणि नितीशकुमार हेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, असे मुलायमसिंह यांनी स्पष्ट केले.
लालूप्रसाद आणि नितीशकुमार यांच्या एकत्र येण्याने मला आनंद झाला आहे. लालूप्रसाद यांनी स्वत: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून नितीशकुमार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. निवडणुकीत ते प्रचारही करणार आहेत. आता कोणतेही मतभेद नाहीत. जातीयवादी शक्तींना आम्ही एकत्रितपणे पराभूत करू, असे मुलायमसिंह यांनी पत्रपरिषदेला संबोधित करताना सांगितले. या पत्रपरिषदेला लालूप्रसाद यादव आणि शरद यादव हे नेतेही उपस्थित होते. यावेळी बोलताना लालूप्रसाद यांनी, नितीशकुमार यांनाच आधीपासून आपला पाठिंबा असल्याचे आणि आमच्यात कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट केले. रविवारी झालेल्या संयुक्त बैठकीत जदयु आणि राजदने एकत्रितपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता.
मी स्वत: निवडणूक लढण्यासाठी अपात्र आहे आणि माझ्या परिवारातील कोणताही सदस्य मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही. त्यामुळे नितीशकुमार हेच आमच्या सर्वांच्या पसंतीचे उमेदवार आहेत. आमच्यात मतभेद असल्याबाबत प्रसारमाध्यमांनी आतापर्यंत ज्या बातम्या चालविल्या, त्या सर्वच निराधार होत्या, असेही लालूप्रसाद म्हणाले.
दरम्यान, गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामुळेच एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या लालूप्रसाद आणि नितीशकुमार यांना एकत्र यावे लागले, असे मत राजकीय विश्‍लेषकांनी व्यक्त केले आहे.
लोक पुन्हा भयभीत होतील : भाजपा
बिहारमध्ये जंगलराज आणणारे लालूप्रसाद यादव यांच्या राजदशी जदयुने युती केल्याने राज्यातील लोक पुन्हा भयभीत होती. भाजपाच्या वाढत्या शक्तीमुळेच राजकारणातील दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांना नाईलाजाने एकत्र यावे लागले आहे. पण, आता कुणीही भाजपाचा विजयरथ रोखू शकणार नाही, असे भाजपा प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22765

Posted by on Jun 9 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (1646 of 2452 articles)


=हाशिम अन्सारी यांची कबुली, कोणाच्याही बोलण्याने प्रभावित होत नाही= नवी दिल्ली, [८ जून] - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खरोखरच धर्मनिरपेक्ष ...

×