Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत पदावर राहणार नाही

निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत पदावर राहणार नाही

=आरोप करणार्‍यांनी पुराव्याचा एक तरी कागद सादर करावा : खडसे यांचे आव्हान=
EKNATH KHADSE8मुंबई, [४ जून] – माझ्यावर झालेल्या एकाही आरोपात तथ्य नाही. माझ्यावर आरोप करणार्‍यांनी माझ्याविरुद्ध पुराव्याचा एक तरी कागद सादर करावा, मी राजकारण सोडण्यासही तयार आहे, असे थेट आव्हान मी विरोधकांना देत आहे, अशी आक्रमक भूमिका एकनाथ खडसे यांनी आज शनिवारी घेतली.
भाजपा हा नैतिक मूल्यांची जपणूक करणारा पक्ष आहे. माझे निर्दोषत्व चौकशीतून सिद्ध होत नाही, तोपर्यंत कोणत्याही पदावर राहणे मला स्वत:ला अनुचित वाटत असल्याने आपण पदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविला, असे खडसे यांनी सांगितले. राजीनामा दिल्यानंतर ते भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रपरिषदेत बोलत होते.
सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय आपण घेतल्याने अनेक जण दुखावले आणि त्यातूनच हे प्रकरण उद्भवले. मात्र, या अडचणीच्या परिस्थितीतही पक्ष माझ्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी. ज्यांनी खोटे आरोप केले आहेत, त्यांच्यावरही कारवाई व्हावी, अशी मागणी आपणच मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचेही खडसे यांनी सांगितले.
यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, शिक्षणमंत्री विनोद तावडे आदी त्यांच्यासोबत उपस्थित होते. गेली चाळीस वर्षे आपण राजकारणात आहोत; मात्र अशा प्रकारे मीडिया ट्रायलचा प्रयोग कधी अनुभवला नसल्याचे सांगून एकनाथ खडसे म्हणाले की, माझ्यावरील आरोपांच्या बातम्या देताना माध्यमांनी पुरावे छापले असते, तर मला आनंदच झाला असता. भोसरी एमआयडीसीच्या जमिनीत मी कोणताही भ्रष्टाचार केला नाही. सर्व व्यवहार नियमानुसारच झाले आहेत. अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपातही कोणतेच तथ्य नाही. माझ्या मालमत्तेबाबतचा संपूर्ण तपशील मी निवडणूक शपथपत्रात दिला आहे. त्या व्यतिरिक्त जे आरोप केले, त्यासाठी दिशाभूल करणारे कागदपत्र सादर करण्यात आले. जावयाची लिमोझिन असल्याचा आरोप झाला. माझ्या मुलीचे लग्न २०१३ मध्ये झाले. त्याआधी २०१२ मध्येच त्यांनी ती गाडी घेतली होती. दाऊदशी फोनवरून बोलल्याचा खोटा आरोप केला आहे.
पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या जमिनीचा बनावट कागदपत्रांच्या आधारे केलेला टीडीआर घोटाळा उघडकीस आणला. एफआयआर दाखल करायला लावला व शासनाची गेलेली ४०० कोटी रुपये किमतीची जमीन शासनाला परत मिळवून दिली. पुण्यातील येरवडा येथील खाजगी बिल्डरने हडप केलेली १० एकर जमीन शासनास परत मिळवून दिली. मी सातत्याने एकच मागणी केली की, एक तरी कागदोपत्री पुरावा सादर करा. मात्र, आजपर्यंत यातील एकाही प्रकरणी ठोस पुरावा सादर करण्यात आला नाही. भाजपा हा नैतिकता जपणारा पक्ष आहे. त्यामुळे नैतिकतेला स्मरून मी मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी आपणच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. निर्दोषत्व सिद्ध होत नाही, तोपर्यंत पदावर राहायचे नाही, असा निर्णय घेतला असल्याचे खडसे म्हणाले.
दुखावलेल्या व्यक्तींकडूनच त्रास
मी महसूल तसेच कृषिमंत्री म्हणून आपल्या कार्यकाळात महत्त्वाचे ११९ निर्णय घेतले. वक्फ बोर्डाच्या जमिनीबाबतही कठोर निर्णय घेतला. पुण्यातील बेकायदेशीरपणे अतिक्रमण केलेल्या जमिनी मी सरकारजमा केल्या. अशा निर्णयांमुळे अनेकजण दुखावले गेले. यामुळेच माझी प्रतिमा मलीन करण्याचे कारस्थान रचण्यात आले. आरोपांनंतर मी अज्ञातवासात गेलो, अशा वावड्याही उठविण्यात आल्या. मात्र, आरोपांची राळ उडत असताना प्रसारमाध्यमांच्या प्रश्‍नांना उत्तर देताना वेळ निघून जात होता. पावसाळा तोंडावर आला असताना शेतकर्‍याच्या हिताचे निर्णय घेणे हे मंत्री म्हणून माझे कर्तव्य होते. बियाणे-खतांची उपलब्धता करून देण्याचा निर्णय घेण्यासाठी मला वेळ हवा होता, तेच निर्णय मी घेतल्याचेही खडसे यांनी स्पष्ट केले.
भाजपा खडसेंच्या पाठीशी : दानवे
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्यावर प्रसारमाध्यमांमधून अनेकांनी आरोप केले. मात्र, हे आरोप पूर्णपणे तथ्यहिन आणि निराधार आहेत. भाजपा सरकारला बदनाम करण्याचे हे कारस्थान आहे. खडसे यांनी सातत्याने पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले. पण, कुणीही पुरावे सादर केले नाही. निर्दोष सिद्ध होईपर्यंत मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा खडसे यांचा निर्धार आहे. गेली ४० वर्षे खडसे यांनी पक्षासाठी जिवाचे रान केले आहे. संकटकाळातही त्यांनी पक्ष वाढविला आहे. सरकार येण्यात त्यांचाही महत्त्वाचा वाटा आहे. भाजपा खडसे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे, अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यावेळी दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28519

Posted by on Jun 5 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (259 of 2451 articles)


=निवृत्त न्यायाधीशांमार्फत होणार चौकशी= मुंबई, [४ जून] - गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भ्रष्टाचाराचे विविध आरोप होत असलेले राज्याचे महसूलमंत्री एकनाथ ...

×