Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » ‘नीट’मधून महाराष्ट्राला वगळा

‘नीट’मधून महाराष्ट्राला वगळा

=मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना साकडे=
modi, fadanvisनवी दिल्ली, [१८ मे] – दोन वर्ष ‘नीट’ लागू करू नये, सीईटीच राहू द्यावी, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घातले. केंद्र सरकार महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, यासाठी आवश्यक ते सर्व केले जाईल, असा निर्वाळा पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिला.
दुष्काळाच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सहभागी होण्यासाठी राजधानी दिल्लीत आले असता, मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘नीट’च्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी सर्वोच्च न्यायालयाने यावर्षीपासून राष्ट्रीय स्तरावर ‘नीट’ आवश्यक केली आहे. महाराष्ट्रातील ८० टक्के विद्यार्थी राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित बारावीची परीक्षा देतात. तर नीटची परीक्षा ही सीबीएसईच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. या परीक्षेसाठी आवश्यक असलेली पुस्तकेही बाजारात उपलब्ध नाही, त्यामुळे या ‘नीट’मुळे राज्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशापासून हे विद्यार्थी वंचित राहतील, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.
महाराष्ट्रात खाजगी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश सीईटीच्या माध्यमातूनच होतात, खाजगी महाविद्यालयांना स्वत:ची वेगळी प्रवेश परीक्षा घेता येत नाही, असे फडणवीस म्हणाले.
आमचा ‘नीट’ला विरोध नाही, मात्र घाईगर्दीत विद्यार्थ्यांवर ‘नीट’ लादू नये, तर पूर्ण तयारीने आणि या परीक्षेसाठी आवश्यक असलेला अभ्यासक्रम आणि पुस्तके बाजारात उपलब्ध करून देऊन ही परीक्षा घ्यायला आमची हरकत नाही. त्यामुळे किमान यावर्षी आणि पुढच्या वर्षी राज्याला ‘नीट’मधून वगळण्यात यावे, ही दोन वर्षे राज्यातील वैद्यकीय प्रवेश सीईटीच्या माध्यमातूनच होऊ द्यावे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.
नीट परीक्षेपासून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्राने तातडीने अध्यादेश काढावा, अशी मागणीही फडणवीस यांनी यावेळी केली. नीटमधून महाराष्ट्राला वगळण्यासाठी आवश्यक ते सर्व केले जाईल, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, असा निर्वाळा पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिला.
महाराष्ट्रातील दुष्काळाच्या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांचीही भेट घेतली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28324

Posted by on May 18 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (325 of 2451 articles)


=बुधवार ठरला यंदाच्या मोसमातील सर्वांत उष्ण दिवस= नवी दिल्ली, [१८ मे] - भारतीय वेधशाळेने महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये उष्णतेचा रेड अलर्ट ...

×