Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » नेतृत्वबदलावर बैठकीत चर्चा नाही : द्विवेदी

नेतृत्वबदलावर बैठकीत चर्चा नाही : द्विवेदी

=संघटनात्मक सुधारणांबाबत विविध सूचना=
Janardan-Dwivediनवी दिल्ली, [१३ जानेवारी] – कॉंग्रेस कार्य समितीच्या बैठकीत पक्षाची संपूर्ण धुरा उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे सोपवली जाईल, अशी चर्चा जोरात असताना आज झालेल्या कार्य समितीच्या बैठकीत या मुद्यावर कोणतीच चर्चा झाली नाही. लोकसभा तसेच महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीर राज्यातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर कॉंग्रेस कार्य समितीची आज येथे महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे सोपवली जाईल, अशी चर्चा होती. मात्र, आज झालेल्या बैठकीच्या कार्यक्रमपत्रिकेत हा विषयही नव्हता, तसेच कोणत्याही सदस्याने हा मुद्दा उपस्थित केला नाही, असे कॉंग्रेसचे महासचिव जनार्दन द्विवेदी यांनी बैठकीनंतर कॉंग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.
बैठकीला कार्य समितीचे ३४ पैकी ३० सदस्य उपस्थित होते, जवळपास पावणेचार तास ही बैठक चालली. प्रारंभी कॉंग्रेस कार्य समितीचे सदस्य आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले आणि कॉंग्रेस नेते जी. व्यंकटसामी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाने बैठकीला सुरुवात झाली, उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही बैठकीला संबोधित केले, असे द्विवेदी यांनी सांगितले.
संघटनात्मक निवडणुका आणि शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर बैठकीत चर्चा झाली. किमान हमी भाव तसेच शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च याचा आढावा घेऊन देशातील शेतकर्‍यांच्या स्थितीवर बैठकीत सदस्यांनी चिंता व्यक्त केली, सरकारची धोरणे शेतकरी विरोधी असल्याचा आरोपही बैठकीत करण्यात आला, याकडे लक्ष वेधत द्विवेदी म्हणाले की, भूमी अधिग्रहण विधेयक अन्यायकारक असल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली. शेतकर्‍यांच्या तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्‍नावर आंदोलन करण्याबाबत विविध पातळ्यांवर घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती बैठकीत देण्यात आली. संबंधित प्रश्‍नावर जयराम रमेश आणि के. व्ही. थॉमस यांनी बैठकीत सविस्तर भूमिकाही मांडली.
गावागावात जाऊन पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र, कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. बैठकीत झालेल्या चर्चेवर संपूर्ण देशातील कार्यकत्यार्र्चे मत जाणून घेण्याचा आणि नंतरच अंतिम निर्णय घेण्याचे ठरवण्यात आले, असे स्पष्ट करत द्विवेदी म्हणाले की, पक्ष संघटना आणि आंदोलनाबाबत कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेऊनच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
पदाधिकार्‍यांचा कार्यकाळ पुन्हा तीन वर्षांचा करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. २०१० मध्ये बुराडी येथे झालेल्या बैठकीत पक्षाच्या पदाधिकार्‍यांचा कार्यकाळ तीन वर्षांवरून पाच वर्षांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, आता हा कार्यकाळ पुन्हा तीन वर्षांचा करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र, याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आला नाही, असे द्विवेदी यांनी स्पष्ट केले.
सध्या साधारण सदस्य आणि सक्रिय सदस्य असे दोन प्रकार आहेत, त्याऐवजी सदस्यत्वाचा एकच प्रकार ठेवण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली, असे नमूद करत द्विवेदी म्हणाले की, पक्षाच्या वेगवेगळ्या आघाड्यांसाठी वेगवेगळे सदस्य करण्याऐवजी सर्वजण कॉंग्रेस पक्षाचेच सदस्य राहतील. नंतर त्यांच्या वयोगटानुसार त्यांना पक्षाच्या वेगवेगळ्या आघाड्यांमध्ये काम देण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे सदस्यत्वासाठी अर्ज करण्याऐवजी ऑनलाईन सदस्य करण्याबाबतही चर्चा झाली.
अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी तसेच अल्पसंख्यकांना पक्षसंघटनेत ५० टक्के आरक्षण देण्याबाबतच्या मुद्यावरही बैठकीत चर्चा झाली. मात्र, या सर्व मुद्यांवर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. देशभरातील कॉंग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून, त्यांना विश्‍वासात घेऊनच अंतिम निर्णय घेण्याचा निर्णय या बैठकीत झाला असल्याचे द्विवेदी यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19667

Posted by on Jan 14 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (2245 of 2453 articles)


चेन्नई, [१३ जानेवारी] - अगदी पहिल्या प्रयत्नात भारताची मंगळ मोहीम यशस्वी करून दाखविणार्‍या भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या ‘मंगळ’ ...

×