Home » ठळक बातम्या, विज्ञान भारती » नैराश्यग्रस्त व्यक्तींची स्मरणशक्तीही होते दुर्बळ

नैराश्यग्रस्त व्यक्तींची स्मरणशक्तीही होते दुर्बळ

=अमेरिकेच्या शास्त्रज्ञांचे संशोधन=
brainवॉशिंग्टन, [८ जानेवारी] – मनुष्याला नेहमीच सुखद आठवणीत रमायला आवडते. पण जर माणूस दु:खी, हताश निराश असेल तर… तेव्हा स्मरणशक्तीचे काय होते? चांगल्या आणि सकारात्मक स्मृती मनाच्या तळाशी साठवत माणूस आनंदाने जगतो. स्मरणशक्ती आणि तीही शिस्तीची स्मरणशक्ती ही माणसाला मिळालेली उत्तम देणगी आहे. स्मरणशक्तीच्या भरवशावर माणसे आपली बहुतांश व्यावहारिक कामे तडीस नेत असतात. मनुष्याचे मन जेव्हा आनंदी, उत्साही, आशावादी असते, मनात जेव्हा सकारात्मक विचार असतात तेव्हा त्याला स्मरणशक्तीही चांगली साथ देते, हा माणसाचा नेहमीचा अनुभव आहे. पण, जर माणसाला नैराश्याने (डिप्रेशन) ग्रासले असेल तर त्याची स्मरणशक्तीही दुर्बळ होते, हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे.
सर्वसामान्य लोकांच्या तुलनेत नैराश्याने ग्रस्त लोकांची स्मरणशक्ती दुर्बळ असते. डिप्रेशन असलेल्या लोकांची स्मरणशक्ती १२ टक्क्यांनी कमी झाल्याचे शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासातून सिद्ध झाले आहे. टेक्सास युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी प्रमुख संशोधक निकोलस हाबर्ड यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन केले. ‘जेव्हा व्यक्तीच्या मनात निराशाजनक विचार येतात तेव्हा त्याच्यावरून तिचे लक्ष इतरत्र वळविणे अतिशय कठीण होते आणि हेच दुर्बळ स्मरणशक्तीचे कारण होऊन बसते’, असे हाबर्ड यांनी सांगितले. या स्मरणशक्तीविषयक प्रयोगात १५७ महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. यातील ६० विद्यार्थी डिप्रेशन अर्थात नैराश्याने ग्रासले होते, तर अन्य ९७ विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य उत्तम होते. अध्ययनात सहभागी विद्यार्थ्यांना विविध प्रश्‍न विचारण्यात आले आणि त्यांना ‘चूक’ की ‘बरोबर’ याच पर्यायात उत्तरे देण्यास सांगण्यात आले. या प्रक्रियेत नैराश्यग्रस्त विद्यार्थी अनेक प्रश्‍नांची उत्तरेच विसरून गेले तर, अनेकांच्या मनाचा गोंधळ उडाल्याने त्यांना प्रश्‍नही नीट समजले नाहीत. या सर्व बाबींवरून माणूस जर निराश-हताश असेल तर त्याच्या स्मरणशक्तीवरही नकारात्मक परिणाम होतो, हे सिद्ध झाले आहे.
टिळकांची स्मरणशक्ती आणि गीतारहस्य
लोकमान्य टिळकांची स्मरणशक्ती व एकाग्रता अफाट होती. ब्रिटिश सरकारलाही त्यांच्या या जबरदस्त स्मरणशक्तीबाबत कुतूहल वाटत होते. त्यांनी तशी नोंदही केली आहे. प्रचंड प्रतिकूल वातावरण असूनही टिळकांना कधीच नैराश्याने घेरले नाही. त्यांची इच्छाशक्ती दुर्दम्य होती. मंडालेच्या तुरुंगात गीतारहस्याचा जन्म झाला. मात्र, ग्रंथ तेव्हा अपूर्ण होता. त्यांची काही कागदपत्रे ब्र्रिटिशांनी जप्त केली होती. त्यात गीतेशी संबंधित कागदही होते. शिक्षा भोगून पुण्याला परतल्यानंतर टिळकांनी ते लिखित कागद परत मागितले असता इंग्रज सरकारने ते देण्याचे नाकारले. मात्र, तरीही मुळीच हताश न होता टिळकांनी आपल्या स्मरणशक्तीच्या बळावर तुरुंगातील नोंदींप्रमाणेच हुबेहुब लिखाण केले व ग्रंथ पूर्ण केला. केवळ सकारात्मक वृत्ती आणि निराशेला कधीही थारा न दिल्याने टिळकांना त्यांच्या स्मरणशक्तीने जन्मभर साथ केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19506

Posted by on Jan 9 2015. Filed under ठळक बातम्या, विज्ञान भारती. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, विज्ञान भारती (2270 of 2466 articles)


=अभ्यासकांचा दावा= लंडन, [८ जानेवारी] - जगातील सात आश्‍चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहाल या सुंदर वास्तूच्या पांढर्‍या शुभ्र संगमरवराला पिवळेपणा आणून ...

×