Home » ठळक बातम्या, नागरी, प.महाराष्ट्र, राष्ट्रीय » पंतप्रधान मोदी यांनी केला स्मार्ट सिटीचा शुभारंभ

पंतप्रधान मोदी यांनी केला स्मार्ट सिटीचा शुभारंभ

=शहरीकरणामुळे दारिद्र्य निर्मूलन शक्य: नरेंद्र मोदी=

पुणे, [२५ जून] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी पुण्यातून आपल्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून देशातील २० शहरांना स्मार्ट करण्याच्या मोहिमेचा शुभारंभ केला. आपले शहर कसे असायला हवे, हे प्रत्येकानेच ठरवावे. यापूर्वीच्या काळात शहरांच्या विकासाकडे समस्या म्हणून पाहिले जात होते. पण, आता ही संकल्पना बदली आहे. शहरीकरणामुळे दारिद्र्याचे निर्मूलन करणे सहज शक्य आहे. आपल्या देशातील नागरिक अतिशय हुशार आहेत. त्यांच्यात कमालीचे कौशल्य आहे आणि त्यांच्या कौशल्याचा योग्य वापर झाला, तर केवळ चमत्कारच घडू शकतो, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केले.
स्मार्ट सिटीसाठी कोणती शहरे निवडायची आणि त्यासाठी काय निकष असावे, हा प्रश्‍न होता. जयपूर आणि उदयपूरची यात निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी माझे आणि केंद्रीय नगर विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांचे अभिनंदन केले. पण हे आमचे यश नाही. त्या शहरातील नागरिकांचे आहे. माझे शहर देखील स्मार्ट असावे, अशी इच्छा तेथील नागरिकांच्या मनात निर्माण झाली.
आधीच्या सरकारांच्या काळात कोण किती मागास राहील, यासाठी प्रयत्न झाले. पण, केंद्रात भाजपाप्रणीत रालोआ सरकार आले आणि पुढे जाण्याची स्पर्धा सुरू झाली, असे पंतप्रधानांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून स्मार्ट सिटीसाठी निवड झालेल्या २० शहरांशी संवाद साधला.
बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात स्मार्ट सिटी योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्यासह राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, पुण्याचे खासदार अनिल शिरोळे आणि पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित होते.
पुणे कसे असावे हे दिल्लीत बसणारा माणूस ठरवू शकत नाही. याबाबतचा निर्णय पुणेकरांनीच घ्यायचा आहे, असे सांगताना मोदी म्हणाले की, आधी काहीच काम होत नव्हते, अर्थसंकल्पातील तरतुदींचीही योग्य अंमलबजावणी होत नव्हती. अतिशय कमी वेळेत अनेक देश आपल्या पुढे निघून का गेले असावे, असा प्रश्‍न मी स्वत:ला सतत विचारत असतो आणि त्यावर विचार करतो. लोकांसोबतही चर्चा करतो. या सर्व प्रक्रियेतून एक गोष्ट पुढे आली आणि ती म्हणजे आपण जे कोणी सरकारमध्ये बसलो असतो, त्या सर्वांमध्ये सर्वात स्मार्ट कुणी असेल, तर तो देशाचा नागरिक आहे. देशातील सर्व नागरिकांना एकत्र आणले, तर देश विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जाईल. याच अनुषंगाने स्मार्ट सिटी ही संकल्पना पुढे आली.
प्रत्येक शहराचे स्वतंत्र व्यक्तिमत्व असते. स्मार्ट सिटीमध्ये शहराचे व्यक्तिमत्व कायम राखण्यासाठी तेथील नागरिकांकडूनच सूचना मागविण्यात आल्या. शहरांचा आत्मा तोच ठेवून त्याचे स्वरूप बदलण्यासाठी स्मार्ट सिटीचा उपयोग होईल, असेही मोदी म्हणाले. शहरांच्या विकासाची जबाबदारी केवळ महापौर किंवा आयुक्तांची नाही. सर्व नगरसेवक आणि सर्वपक्षीयांनी मिळून काम केले, तरच विकास प्रत्यक्षात येईल. लोकांचे जीवन सुखदायी करणे म्हणजे स्मार्ट होणे आहे. पुण्यात अनेक ऐतिहासिक गोष्टींची सुरुवात झाली. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, पण हृदय पुणे आहे, असे केंद्रीय नगर विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी यावेळी सांगितले.
पहिल्या टप्प्यात दोन शहरे : मुख्यमंत्री
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्मार्ट सिटी उपक्रमात महाराष्ट्रातील दहा शहरांचा समावेश झाला. पहिल्या टप्प्यामध्ये दोन शहरांचा विकास होणार आहे. अनेक देश राज्यात गुंतवणूक करण्यास तयार आहेत. इतर शहरांच्या विकासासाठी केंद्र सरकारने मदत केल्यास या प्रकल्पाला गती मिळू शकते. स्मार्ट सिटी असो वा अमृत सिटी, महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहील, असा विश्‍वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28809

Posted by on Jun 26 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, प.महाराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, प.महाराष्ट्र, राष्ट्रीय (175 of 2453 articles)


मुंबई, [२५ जून] - महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना सोलर वीजपुरवठा तसेच विजेची मोठ्या प्रमाणात बचत करणारे एनर्जी इफिशियंट पंप उपलब्ध करून देण्यासाठी ...

×