Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » पठाणकोट वायुसेना तळावर पुन्हा गोळीबार

पठाणकोट वायुसेना तळावर पुन्हा गोळीबार

  • बॉम्ब निकामी करताना लेफ्ट. कर्नल शहीद
  • आणखी दोन अतिरेक्यांचा खात्मा
  • रावळपिंडीत रचण्यात आला कट
  • सात जवानांना आले वीरमरण

pathankot-airbase attackपठाणकोट, [३ जानेवारी] – पठाणकोट येथील वायुसेनेच्या तळावरील भीषण दहशतवादी हल्ला परतावून लावताना शनिवारी संपूर्ण दिवसभर मोहीम राबविल्यानंतर आज रविवारी सकाळपासून पुन्हा या तळावर गोळीबार सुरू झाला. रात्रभर लपून बसलेल्या दोन अतिरेक्यांनी आज जवानांवर हल्ला चढविला. तो परतावून लावताना जवानांनी दोघांचाही खात्मा केला. तर, शनिवारी ठार झालेल्या अतिरेक्याच्या शरीराला गुंडाळलेले पाच बॉम्ब निकामी करताना अचानक स्फोट हाऊन लेफ्टनंतर कर्नट निरंजन कुमार यांना वीरमरण आले. अतिरेक्यांच्या गोळीबारात शनिवारी जखमी झालेल्या तीन जवानांचाही आज मृत्यू झाला. यामुळे शहीद जवानांची एकूण संख्या सात झाली आहे.
आज सकाळपासूनच या परिसरात एनएसजी कमांडो आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी शोधमोहीम हाती घेतली. दहशतवादविरोधी मोहीम संपली, असे वाटत असताना, अचानक एका ठिकाणी लपून बसलेल्या दोन अतिरेक्यांनी त्यांच्या गोळीबार केला. यात तीन जवान जखमी झाले. शनिवारी ठार झालेल्या अतिरेक्यांचे मृतदेह आज बाहेर काढण्यात आले. यातील एका अतिरेक्याच्या शरीराला पाच बॉम्ब गुंडाळले होते. ते निकामी करण्यासाठी लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार प्रयत्न करीत असताना, अचानक स्फोट झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. वीरमरण आलेल्या एकूण सात जवानांमध्ये एक गरूड कमांडो असून, डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्सचे तीन जवान आणि एनएसजीच्या तीन कमांडोंचा समावेश आहे. शनिवारच्या कारवाईत जवानांनी चार अतिरेक्यांना ठार केले होते.
वायुसेनेच्या तळावर आणखी दोन अतिरेकी असल्याची खात्री केल्यानंतर जवानांनी त्यांना चहूबाजूंनी घेरले आणि एका अतिरेक्याला कंठस्नान घातले. दुसर्‍या अतिरेक्यानेही शरीराला शक्तिशाली बॉम्ब गुंडाळले असल्याने, त्याने स्फोट घडविल्यास मोठी हानी होऊ शकते, हे लक्षात घेऊन जवानांनी सावध पावित्रा घेतला आणि त्यालाही यमसदनी पाठविले.
वायुसेनेच्या तळावर आज सकाळी जवानांनी मोहीम सुरू करताच अतिरेक्यांनी दोन शक्तिशाली स्फोट घडवून आणले. यात तीन जवान जखमी झाले. शनिवारीही ९ जवान जखमी झाले होते. या सर्वांवर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू असून, यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
दरम्यान, या दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानच्या रावळपिंडी येथे तयार झाला असून, पाकची गुप्तचर संस्था आयएसआय आणि जैश-ए-मोहम्मदच्या वरिष्ठ अतिरेकी नेत्यांमध्ये अनेक दिवस तेथे सातत्याने बैठका झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्याचे संतप्त पडसाद देशात सर्वत्र उमटले आहे. पठाणकोट येथे हजारो नागरिकांनी पाकचा ध्वज जाळून निषेधाच्या घोषणा दिल्या.
अतिरेक्यांना रोखा : व्ही. के. सिंह
भारत आणि पाकमधील संबंध सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठोस पुढाकार घेतला असताना, अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे तणाव आणखी वाढू शकतो. तेव्हा पाकने त्यांच्या भूमीतून भारतविरोधी कारवाया करणार्‍या अतिरेक्यांना वेळीच आवर घालावा, असा इशारा केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांनी दिला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26408

Posted by on Jan 4 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (941 of 2453 articles)


=अनेक गाड्यांची सेवा खोळंबली= नवी दिल्ली, [३ जानेवारी] - पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतानाच, दिल्ली-कानपूर शताब्दी एक्सप्रेस बॉम्बने ...

×