Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » परीक्षेकडे उत्सव म्हणून बघा, यश तुमचेच

परीक्षेकडे उत्सव म्हणून बघा, यश तुमचेच

  • पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला
  • ताण घेऊ नका, समोरे जा

narendra modi 21नवी दिल्ली, [२२ फेब्रवारी] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी रेडिओवरील ‘मन की बात’ कार्यक्रमातून सध्या परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. परीक्षेकडे उत्सव म्हणून पाहा, मनावर ताण ठेवू नका. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. इतरांशी स्पर्धा करण्यात आपली ऊर्जा वाया घालवू नका. स्वत:शीच स्पर्धा करा, असा मोलाचा सल्ला पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिला.
नरेंद्र मोदी यांनी यावेळी पालकांनाही महत्त्वाचा सल्ला दिला. आपल्या पाल्यांची इतरांशी तुलना करू नका, पालक नेहमीच आपल्या पाल्यांना दुसर्‍यांचे उदाहरण देत असतात. आयुष्यात स्पर्धा आवश्यक असते. पण, ही स्पर्धा स्वत:सोबतच करा. काही चांगले करण्याची, गतीने काहीतरी करण्याची स्पर्धा करा. कालपेक्षा आज कसा चांगला राहील, याची स्पर्धा करा. यातून मनाला शांतता आणि आनंद मिळतोे, असे सांगताना, ऍथ्लिट सर्गेई बुबका याने नेहमीच स्वत:शी स्पर्धा केली आणि आपलाच विक्रम ३५ वेळा मोडित काढला, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.
परीक्षा हा जीवन आणि मरणाचा मुद्दा नाही. विद्यार्थ्यांनी काळजी करणारे नव्हे, तर लढवय्ये बनावे, विजयाचा संकल्प घेऊन समोर जा. आयुष्यात चढ-उतार येतच असतात. लक्षात ठेवा, कधीकधी नकोसे निकालही तुम्हाला आयुष्यात बळकट करतात. आजचा पेपर बिघडला म्हणून त्यावर चिंता करण्यापेक्षा दुसर्‍या दिवशीच्या पेपरवर आपले लक्ष केंद्रीत करा. पालकांनीही आजच्या पेपरवर फार जास्त विश्‍लेषणात्मक चर्चा करू नये. मुलांना आनंदी ठेवा आणि पुढच्या पेपरची तयारी करण्यासाठी सहकार्य करा, यश नक्कीच मिळेल, असे पंतप्रधानांनी सांगितले.
माझे शाळांना आवाहन आहे की, त्यांनी वर्षातून एकदा परीक्षा उत्सव साजरा करावा. यामुळे विद्यार्थ्यांवरील तणाव दूर होईल. त्यांना प्रेरणा मिळेल. विद्यार्थ्यांनी परीक्षेलाही महोत्सवासारखेच समजायला हवे आणि आनंद लुटायला हवा. माझ्या अनुभवावरून सांगतो, यशस्वी झालो तर तिरस्काराचे आणि अपयशी ठरलो तर टीकेचे पात्र ठरतो. हे चक्र सुरूच राहणार, त्याकडे लक्ष देऊ नका. खरे यश दुसर्‍यांना मदत करण्यात असते.
परीक्षा ही परीक्षाच असते आणि त्यात यशस्वी होणे आवश्यक असते. पण, अनेकदा आपण बाहेरची कारणे शोधत असतो. आपण असे तेव्हाच करतो, जेव्हा आपला स्वत:वरच विश्‍वास नसतो. टीव्हीचा आवाज मोठा आहे, मित्राचा फोन आला, अशी कारणे देत असतो, असे सांगताना, मुलगी आईला आणि घरातही मदत करते आणि तरीही ती परीक्षेत समोर असते. मुलांपेक्षा मुली इतक्या का चमकतात, याचा विचार करा. आत्मविश्‍वास वाढवा. कारण, आत्मविश्‍वास कमी झाल्यास अंध:विश्‍वास भारी होतोे. आपल्या इच्छा स्थिर ठेवा, संकल्प करा, कारण संकल्पासोबत पुरुषार्थ जोडला असतो. इच्छा+स्थिरता = पुरुषार्थ आणि स्थिरता+संकल्प = सिद्धी! तेव्हा समोर जा, सर्व परीक्षांचा सामना करा. स्वत:च स्वत:ची परीक्षा घ्या. बघा, काल जिथे होता, त्यापेक्षा तुम्ही समोर गेलेले असाल. त्यानंतर प्रत्येक परीक्षा तुम्हाला मजबूत करणारीच ठरेल. स्वत:च स्वत:चे मार्गदर्शक बना. नेहमीच वर्तमानात जगा. वर्तमानाचा सामना करा, आपले मन स्थिर ठेवा, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, असे त्यांनी स्पष्ट केले.
परीक्षा क्षमतेच्या प्रदर्शनाकरिता नसते, तर स्वत:ची क्षमता ओळखण्याकरिता असते. हे जेव्हा तुम्हाला समजेल, तेव्हा तुम्ही नेहमीच स्वत:च्या शक्तीचा विकास करीत राहाल. स्वत:ला ओळखा. स्वत:मध्ये जगा, वेगळाच आनंद मिळेल. काही विद्यार्थी निराश होतात, याचे कारण त्यांचा स्वत:वर विश्‍वास नसतो. चांगल्या तयारीने निराशेवर मात करणे शक्य आहे. विषयावर आपले प्रभुत्व सिद्ध करा. निराशा आपोआपच दूर होईल. आपल्या बुद्धीवर, परिश्रमावर विश्‍वास ठेवा. पेपर कितीही कठीण असला तरी, मी यशस्वी होईलच, असा विश्‍वास ठेवा. वेळेपूर्वीच पेपर सोडविणार, असा निर्धार करा. कठीण प्रश्‍नांचा नंतर विचार करा, आधी सोप्या प्रश्‍नांना प्राधान्य द्या, असा सल्ला देताना पंतप्रधानांनी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20836

Posted by on Feb 23 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2020 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२२ फेब्रुवारी] - रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे मांडला जाण्याचे हे शेवटचे वर्ष ठरण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ...

×