Home » ठळक बातम्या, बंगाल, राज्य » पश्‍चिम बंगालमध्ये ममता दीदींची प्रतिष्ठा पणाला

पश्‍चिम बंगालमध्ये ममता दीदींची प्रतिष्ठा पणाला

=विधानसभा निवडणूक=
Mamata Banerjeeनवी दिल्ली, [२ एप्रिल] – पश्‍चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याच्या पहिल्या भागातील मतदानाचा प्रचार आज शनिवारी थांबला आहे. विशेष म्हणजे राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान दोन भागांत होणार आहे. पहिल्या भागात राज्यातील ३ माओवाद प्रभावित जिल्ह्यातील १८ मतदारसंघांत ४ एप्रिलला तर दुसर्‍या भागात ३१ मतदारसंघांत ११ एप्रिलला मतदान होणार आहे. राज्यात तृणमूल कॉंग्रेस, भाजपा आणि माकपा-कॉंग्रेस आघाडी अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
पहिल्या टप्प्याचे मतदान शांततेत व्हावे म्हणून या भागात निमलष्करी दलाच्या ३५० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. ज्या पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहे, त्यातील पश्‍चिम बंगाल असे एकमेव राज्य आहे, ज्याठिकाणी एकूण सहा टप्प्यांत मतदान होणार आहे. यावरूनच राज्यातील गंभीर परिस्थितीची कल्पना यावी.
पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर नारदा स्टिंग ऑपरेशनमध्ये तृणमूल कॉंग्रेसचे अनेक दिग्गज नेते भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकले. ममता बॅनर्जी यांची प्रतिमा स्वच्छ मुख्यमंत्री अशी आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांची स्थिती अडचणीची झाली. त्यातच गुरुवारी कोलकात्याच्या बडा बाजार भागातील निर्माणाधीन पूल कोसळून त्यात २६ जण मृत्युमुखी पडल्यामुळे राज्यातील वातावरण आणखी तापले आहे.
या मुद्यावरून विविध राजकीय पक्षात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या पुलाचे काम माकपाच्या कार्यकाळात सुरू झाल्यामुळे याचा ठपका माकपा सरकारवर ठेवला जात आहे. मात्र, यातून ममता बॅनर्जी यांचीही सुटका होऊ शकत नाही. कारण, त्यांच्याही सरकारच्या कार्यकाळात या पुलाचे काम ५ वर्षांपासून सुरूच आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनाही आपली जबाबदारी झटकता येणार नाही. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली आहे. भाजपाने मात्र सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. डाव्या पक्षाच्या नेत्यांनी या मुद्यावर अद्याप तोंड उघडलेले नाही. मात्र, पुलाचा हा मुद्दा निवडणुकीत गाजणार, हे निश्‍चित आहे.
२०११ मध्ये ममता बॅनर्जी यांनी कॉंग्रेसशी युती करून विधानसभा निवडणूक लढवली होती आणि राज्यात ३४ वर्षांपासून असलेली माकपाची राजवट उलथून लावली होती.यावेळी मात्र कॉंग्रेस ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेससोबत नाही. बिहारच्या फार्म्युल्यानुसार कॉंग्रेसने माकपासोबत आघाडी करून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. एवढेच नाही तर आपल्या आघाडीत जदयु आणि राजदलाही सहभागी करून घेतले. विशेष म्हणजे १९५२ पासून राज्यात एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणारे कॉंग्रेस आणि माकपा यावेळी प्रथमच एकत्र आले आहेत. ममता बॅनर्जी यांच्या प्रभावामुळे या दोन पक्षांना एकत्र येणे भाग पडले आहे.
यावेळी भाजपाही पूर्ण ताकदीने पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला राज्यात १७ टक्के मते आणि लोकसभेची एक जागा मिळाली होती, त्यामुळे भाजपाचा उत्साह यावेळी दांडगा आहे. आसनसोल मतदारसंघातून बाबुल सुप्रियो विजयी झाले होते. राज्यातील विधानसभा निवडणुकीवर नजर ठेवत भाजपाने त्यांना केंद्रात मंत्रिपदही दिले आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत दोन जागांवर आपले उमेदवार उतरवले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या परिवारातील अनेक जण भाजपात आले आहेत. भाजपाने तर सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार बोस यांना ममता बॅनर्जी यांच्या विरोधात उतरवले आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या अडचणी आणखीच वाढल्या आहेत.
ममता बॅनर्जी स्वत:ही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत, कोलकात्याच्या कालिघाट भागातील भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जी निवडणूक लढवत आहेत. त्यांना आपल्या मतदारसंघात प्रचार करण्यासोबत संपूर्ण राज्यात तृणमूलच्या उमेदवारांचा प्रचारही करावा लागत आहे. एका जनमत चाचणीत तृणमूल कॉंग्रेसला राज्यात पुन्हा बहुमत मिळणार असल्याचा दावा करण्यात आल्यामुळे ममता बॅनर्जी यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27659

Posted by on Apr 3 2016. Filed under ठळक बातम्या, बंगाल, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बंगाल, राज्य (542 of 2452 articles)


ब्रसेल्स, [३१ मार्च] - पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या बेल्जियमच्या दौर्‍यावर आहेत. बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना मोदींनी दहशतवादाच्या ...

×