Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पी ए संगमा यांचे निधन

पी ए संगमा यांचे निधन

PA_Sangmaनवी दिल्ली, [४ मार्च] – आपल्या दिलखुलास हास्याने सदस्यांना जिंकत सभागृहाचे कामकाज हसतखेळत चालवणारे लोकसभेचे माजी सभापती पी. ए. संगमा यांचे शुक्रवारी सकाळी हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते ६८ वर्षांचे होते. संगमा यांच्या आकस्मिक निधनाने राजधानीतील राजकीय वर्तुळात शोककळा पसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह अनेकांनी संगमा यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले.
शुक्रवारी सकाळी आपल्या निवासस्थानी अस्वस्थ वाटू लागल्यानंतर संगमा यांना राममनोहर लोहिया रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे उपचारांना प्रतिसाद न देताच त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. संगमा यांच्या निधनाचे वृत्त वार्‍यासारखे पसरताच अनेक मान्यवरांनी रुग्णालयात धाव घेतली. दुपारी संगमा यांचे पार्थिव राममनोहर रुग्णालयातून लेडी हार्डिंग रुग्णालयात नेण्यात आले. संगमा यांच्या पार्थिवावर उद्या शनिवारी मेघालयात अंत्यसंस्कार केला जाणार आहे. संगमा यांच्या पश्‍चात जेम्स आणि कॉनरॅड ही दोन मुले आणि अगाथा ही मुलगी आहे. अगाथा कॉंग्रेसप्रणीत संपुआ सरकारच्या कार्यकाळात राज्यमंत्री होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संगमा यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. संगमा यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान मोदी शनिवारी मेघालयात जाणार आहेेत.
११ व्या लोकसभेत म्हणजे १९९६ मध्ये संयुक्त मोर्चा सरकारच्या कार्यकाळात संगमा यांनी लोकसभेचे सभापतीपद भूषवले होेते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक सदस्य असलेल्या संगमा यांनी प्रणव मुखर्जी यांच्याविरोधात राष्ट्रपतिदाचीही निवडणूक लढवली होती. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाला आव्हान दिल्यानंतर कॉंग्रेसचा त्याग करत शरद पवार यांनी संगमा आणि तारिक अन्वर यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची स्थापना केली होती. मात्र, नंतर शरद पवार यांच्याशीही मतभेद झाल्यामुळे संगमा यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. काही काळ या पक्षात राहिल्यानंतर संगमा यांनी नॅशनल पीपल पार्टीची स्थापना केली होती. या पक्षाचे मेघालय विधानसभेत सध्या दोन आमदार आहेत.
संगमा नऊवेळा लोकसभेवर निवडून आले होते. विद्यमान लोकसभेत संगमा मेघालयातील तुरा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. १९८८ ते ९० या काळात संगमा मेघालयचे मुख्यमंत्री होते. १९९०-९१ या काळात मेघालय विधानसभेत ते विरोधी पक्षनेतेही होते. केंद्रीय मंत्रिमंडळातही अनेक महत्त्वपूर्ण जबाबदार्‍या त्यांनी पार पाडल्या. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना रालोआ सरकारच्या कार्यकाळात गठित करण्यात आलेल्या संविधान सपीक्षा आयोगाचे संगमा सदस्य होते.
अल्पपरिचय
बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेले लोकसभेचे माजी सभापती पी. ए. संगमा यांचे पूर्ण नाव पूर्णो अगितोक संगमा असे होते. त्यांचा जन्म १ सप्टेंबर १९४७ मध्ये मेघालयच्या पश्‍चिम गारो हिल जिल्ह्यातील चपाथी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव डीसी मारक, तर आईचे नाव सीएम संगमा होते. शिलॉंगच्या सेंट ऍन्थोनी महाविद्यालयातून बीए आणि नंतर डिब्रुगड विद्यापीठातून एलएलबीची पदवी घेतलेल्या संगमा यांनी लेक्चरर, वकील आणि पत्रकार म्हणून काम करत नंतर राजकारणात प्रवेश केला.
युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकीर्दीला प्रारंभ करणारे संगमा १९७३ मध्ये युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष झाले. १९७४ मध्ये युवक कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली. १९७७ मध्ये पहिल्यांदा संगमा मेघालयच्या तुरा मतदारसंघातून लोकसभेवर विजयी झाले.
लोकसभेत श्रद्धांजली
शुक्रवारी सकाळी ११ वाजता लोकसभेच्या कामकाजाला प्रारंभ होताच सभापती सुमित्रा महाजन यांनी संगमा यांच्या दु:खद निधनाची सभागृहाला माहिती दिली. संसदीय कामकाज आणि नियमांची परिपूर्ण माहिती असलेल्या संगमा यांच्याबद्दल सर्व सदस्यांमध्ये आदराची भावना होती, त्यांनी समाजातील गरीब आणि वंचित वर्गासाठी आपले आयुष्य वेचले, या शब्दात सुमित्रा महाजन यांनी संगमा यांना श्रद्धांजली अर्पण केली. सभागृहाचे कामकाज हसतखेळत कसे चालवायचे हे मी त्यांच्याकडूनच शिकले, असे महाजन म्हणाल्या. सभागृहाने दोन मिनिटे मौन पाळून संगमा यांना आदरांजली वाहिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27018

Posted by on Mar 5 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (769 of 2453 articles)


=लोकप्रतिनिधींचा सहभाग= नवी दिल्ली, [४ मार्च] - महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने ‘चला भारताचा विचार करू या’ शीर्षकाखाली उद्या शनिवापासून राजधानी दिल्लीत ...

×