Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पेट्रोल, डिझेल पुन्हा स्वस्त

पेट्रोल, डिझेल पुन्हा स्वस्त

=अच्छे दिन’ची मालिका सुरूच, अबकारी करातही वाढ=
petrol_rupeeनवी दिल्ली, [१६ जानेवारी] – देशवासीयांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्याची आणि महागाईच्या विळख्यातून त्यांना मुक्त करण्याची मालिका सुरूच ठेवताना, केंद्र सरकारने आज शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा एकदा कमी केल्या. पेट्रोलच्या प्रति लिटर किमतीत २.४२ आणि डिझेलच्या प्रति लिटर किमतीत २.२५ रुपयांची कपात जाहीर करण्यात आली. शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच ही दरकपात लागू झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीने आजवरचा नीचांक गाठल्याने याचा मोठा फायदा देशवासीयांना मिळाला. गेल्या वर्षी जूनमध्ये प्रति बॅरल ११५ डॉलर्स इतका भाव असलेले कच्चे तेल आता प्रति बॅरल अवघ्या ४६ डॉलर्सपर्यंत खाली आले आहे. यामुळे भारतात पुन्हा एकदा पेट्रोल व डिझेलचे दर कमी होणार, हे आधीच स्पष्ट झाले होते.
शुक्रवारी सायंकाळी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी दरकपातीची घोषणा केली. पेट्रोलच्या प्रति लिटर किमतीत २.४२ रुपये आणि डिझेलच्या किमतीत २.२५ रुपयांची कपात करण्यात आली आहे. वेगवेगळ्या शहरांमधील स्थानिक कर किंवा व्हॅटचा समावेश नसल्याने प्रत्यक्षात असलेली कपात यापेक्षाही जास्त राहणार आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच नवे दर अंमलात आले आहेत, असे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने जाहीर केले. गेल्या वर्षी ऑगस्टपासून पेट्रोलच्या किमतीत करण्यात आलेली ही सलग नववी आणि ऑक्टोबरपासून डिझेलच्या किमतीत झालेली सलग पाचवी कपात आहे. यापूर्वी १६ डिसेंबर रोजी पेट्रोल व डिझेलच्या किमतीत प्रत्येकी दोन रुपयांची कपात करण्यात आली होती.
डिझेलच्या किमतीत आणखी घट झाल्याने याचा परिणाम मालवाहतुकीचे दर कमी होण्यात होणार असून, यामुळे अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही घसरण होणार आहे.
अबकारी शुल्कात वाढ
दरम्यान, सरकारने पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनांच्या अबकारी शुल्कात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत असताना केंद्राने अबकारी शुल्कात केलेली ही सलग चौथी वाढ आहे. यामुळे उर्वरित आर्थिक वर्षाच्या काळात सरकारच्या तिजोरीत २० हजार कोटी रुपयांचा महसूल जमा होणार आहे. अबकारी शुल्कात जर वाढ झाली नसती, तर देशवासीयांना पेट्रोल व डिझेल आणखी स्वस्तात मिळाले असते, असे जाणकारांचे मत आहे.
अर्थमंत्रालयाने अबकारी शुल्कात वाढ करणारी अधिसूचना शुक्रवारी जारी केली. आता प्रति लिटर पेट्रोलवरील अबकारी शुल्क ८.९५ रुपये आणि डिझेलवरील अबकारी शुल्क ७.९६ रुपये इतके झाले आहे. यातून सरकारला जो महसूल मिळणार असून, त्यामुळे वित्तीय तूट जीडीपीच्या ४.१ टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य गाठणे सरकारला शक्य होणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19780

Posted by on Jan 17 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2217 of 2453 articles)


=अतिरेकी हल्ल्याचा इशारा= मुंबई, [१६ जानेवारी] - प्रजासत्ताक दिन येत्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे. या दिवसाची देशात सर्व ठिकाणी ...

×