Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » प्रदूषणमुक्त भारतही घडवायचा: नितीन गडकरी

प्रदूषणमुक्त भारतही घडवायचा: नितीन गडकरी

=राष्ट्रीय हरित राजमार्ग धोरणाची घोषणा=
gadkari-nitinनवी दिल्ली, [२९ सप्टेंबर] – पर्यावरण आणि विकास हे परस्परविरोधी शब्द नसून एकमेकांना पूरक आहेत. आम्हाला पर्यावरणाचे रक्षण करताना विकासही साधायचा आहे. स्वच्छ भारतासोबतच प्रदूषणमुक्त भारत घडवायचा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.
भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग मंत्रालयातर्फे हॉटेल अशोकामध्ये आयोजित हरित महामार्ग (वृक्षारोपण, प्रत्यारोपण, सौंदर्यीकरण आणि देखभाल) धोरण २०१५ च्या राष्ट्रीय परिषदेत हरित महामार्ग धोरणाची घोषणा केल्यानंतर गडकरी बोलत होते. व्यासपीठावर भूपृष्ठ परिवहन राज्यमंत्री पोन. राधाकृष्णन, मंत्रालयाचे सचिव विजय छिब्बर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अध्यक्ष राघवचंद्र उपस्थित होते.
पेट्रोल आणि डिझेलमुळे सर्वाधिक प्रदूषण होते, हे प्रदूषण रोखण्यासाठी इलेक्ट्रिक आणि बॅटरीवर चालणार्‍या वाहनांना प्राधान्य देण्याची सरकारची भूमिका आहे, याकडे लक्ष वेधत येत्या दोन वर्षात इलेक्ट्रिक आणि बॅटरीवर धावणार्‍या बाईक, स्कूटर, कार आणि बसेस बाजारात येतील, अशी घोषणाही गडकरी यांनी केली.
राज्यात डिझेलवर धावणार्‍या दीड लाख बसेस आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. या सर्व बसेस बॅटरीवर आल्या तर प्रदूषणाला तर आळा बसेल, पण परकीय चलनाचीही मोठ्या प्रमाणात बचत होईल, कारण पेट्रोल आणि डिझेलच्या आयातीवर आपल्याला ८ लाख कोटी रुपये खर्च करावे लागतात, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले.
पेट्रोल आणि डिझेलला इथेनॉल आणि बायोडिझेलचा समर्थ पर्याय आहे. विशेष म्हणजे इथेनॉल आणि बायोडिझेल शेतकरीही तयार करू शकतात. शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टरसाठी बायोडिझेल तयार करण्यात आले आहे. डिझेलपेक्षा हे बायोडिझेल शेतकर्‍यांना स्वस्त पडणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
नागपुरात सध्या इथेनॉलवर एक बस धावत आहे. येत्या काही महिन्यात नागपुरात इथेनॉलवर १०० बसगाड्या धावतील, असे गडकरी म्हणाले.
देशात सध्या एक लाख किमीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. देशातील एकूण रस्त्यांच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्गाचे प्रमाण २० टक्के आहे. मात्र, देशातील एकूण वाहतुकीच्या ४० टक्के वाहतूक या राष्ट्रीय महामार्गावरून होते. त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढवण्याची गरज आहे, याकडे लक्ष वेधत येत्या काही वर्षात देशातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी दीड लाख किमी करण्याची घोषणा गडकरी यांनी केली.
प्रदूषण थांबवण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला झाडे लावण्याचा धोरणात्मक निर्णय सरकारने घेतला असून त्यासाठीच हरित महामार्ग धोरणाची घोषणा आज करण्यात आली. महामार्गावर नुसती झाडे लावली जाणार नाहीत, तर ती कशी टिकतील याचीही काळजी घेतली जाणार आहे. यासाठी स्वतंत्र यंत्रणा विकसित केली जाणार आहे.
या कामासाठी पैसा कमी पडू दिला जाणार नाही. यासाठी स्वतंत्रपणे निधी उभारला जाईल, महामार्गांच्या कामाचे जे बजेट असेल त्याच्या एक टक्का एवढा हा निधी असेल. यातून पाच वर्षात ५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाईल, असे गडकरी म्हणाले. महामार्गाच्या सौंदर्यीकरणाची योजना असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.
महामार्ग बांधताना जी झाडे रस्त्यात येतील, ती न कापता, त्याचे दुसर्‍या ठिकाणी प्रत्यारोपण केले जाईल, असे स्पष्ट करत गडकरी म्हणाले की, वृक्षारोपणाची, त्याच्या संवर्धनाची जबाबदारी स्वयंसेवी संस्थांकडे, महिला बचत गटाकडे तसेच ग्रामीण भागातील लोकांवर, शेतकर्‍यांवर सोपवली जाईल. यातून त्यांना काही प्रमाणात आर्थिक लाभही हाईल. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीही होईल. वृक्ष प्रत्यारोपणाचे यंत्र घेण्यासाठी मंत्रालय व्यक्ती वा संस्थेला कर्ज उपलब्ध करून देईल, असे गडकरी म्हणाले.
जास्तीत जास्त झाडे कशी जगतील, याची जबाबदारी या गटांवर राहील. यात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही. या कामाची देखरेख आणि अंकेक्षण गगन आणि भूवन या उपग्रहांच्या माध्यमातून केली जाईल.
चांगले काम करणार्‍या व्यक्तींना आणि संस्थांना बक्षिसे दिली जातील. ही बक्षिसे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर राहतील, असे स्पष्ट करत गडकरी म्हणाले की, चुकीचे काम करणार्‍यांना दंड करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारनेही राज्य महामार्ग आणि जिल्हा मार्गावर याच पद्धतीने काम करावे, अशी सूचना गडकरी यांनी केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24129

Posted by on Sep 30 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1388 of 2453 articles)


=आयकर विवरण सादर केले नाही= मुंबई, [२९ सप्टेंबर] - आयकर विवरण सादर करण्यात अपयशी ठरलेल्या महाराष्ट्रातील १६ पक्षांची मान्यता धोक्यात ...

×