Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » प्रसिद्धीसाठी गुंडगिरी योग्य नाही

प्रसिद्धीसाठी गुंडगिरी योग्य नाही

=अरुण जेटलींनी शिवसेनेला फटकारले=
Arun Jaitley3नवी दिल्ली, [२० ऑक्टोबर] – पीसीबी आणि बीसीसीआय यांच्यातील सोमवारची बैठक उधळून लावणार्‍या शिवसेनेला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज मंगळवारी अप्रत्यक्षपणे चांगलेच फटकारले. वारंवार गोंधळ घालण्याची प्रवृत्ती योग्य नाही. केवळ प्रचार आणि प्रसिद्धीसाठी अशा प्रकारची गुंडगिरी तर मुळीच मान्य नाही. चर्चेच्या माध्यमातून कोणतीही समस्या सोडविण्याचा सभ्य मार्गही आपल्याकडे आहे, अशा शब्दात अरुण जेटली यांनी मुंबईतील सोमवारच्या प्रकारावर आपला संताप व्यक्त केला.
आपण केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजपासोबत सत्तेत आहोत, याची जाणीव सदैव ठेवायलाच हवी. चर्चेचा मार्ग सोडून गोंधळ आणि धुडगूस घालणे लोकशाहीला अनुसरून नाही. आपल्यावर केवळ महाराष्ट्राचीच नाही, तर संपूर्ण देशाची जबाबदारी आहे, याचे भान ठेवायलाच हवे, असेही जेटली यांनी आज मंगळवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
सोमवारी पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान आणि बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्यात भारत-पाक क्रिकेट संबंध पुन्हा सुरळीत करण्यावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. पण, शंभरावर शिवसैनिकांनी सकाळीच बीसीसीआयच्या कार्यालयावर धडक दिली आणि शशांक मनोहर यांना जाब विचारला. आम्ही भारत-पाक क्रिकेट संबंध पूर्ववत होऊ देणार नाही आणि पाकिस्तानी क्रिकेट संघाला महाराष्ट्राच्या भूमीत पायही ठेवू देणार नाही, अशी ताकीदच शिवसेनेने दिल्यानंतर ही चर्चा रद्द करण्यात आली होती.
या घटनेबाबत विचारले असता, जेटली यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. अनेक मुद्यांवर वैचारिक मतभेद असू शकतात. पण, विरोध करताना प्रत्येकाने भान ठेवायलाच हवे. आपले आंदोलन देशाला लाजेने मान खाली घालायला लावणारे असू नये. केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी गोंधळ घालणे योग्य नाही. आपले म्हणणे संयमाने आणि शांतपणे सादर करण्याचाही एक मार्ग आहे. मुंबईत अलीकडील काळात ज्या काही घटना घडल्या आहेत, त्या निंदनीय आणि निषेधार्ह आहेत. भाजपाने अशा हिंसक मार्गाचा अवलंब कधीच केला नाही, असे जेटली यांनी स्पष्ट केले.
अशा प्रकारच्या हिंसक मार्गांचा अवलंब करणार्‍यांनी आत्मपरीक्षण करायलाच हवे, असे सांगताना जेटली म्हणाले की, भाजपातील बहुतांश नेते या प्रकारावर नाराज आहेत. भाजपाध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही यामुळे धक्का बसला आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, असा आम्हाला विश्‍वास आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25213

Posted by on Oct 21 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1316 of 2453 articles)


कट्टर हिंदुत्वाचा विरोध अन् दहतशवाद्यांचा बचाव तस्लिमा नसरीनचा संताप नवी दिल्ली, [१७ ऑक्टोबर] - रोखठोक आणि वादग्रस्त लिखाण करणार्‍या ...

×