Home » आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप » फ्रान्सचे इसिसवर हवाई हल्ले

फ्रान्सचे इसिसवर हवाई हल्ले

  • आरपारची लढाई सुरू
  • २० बॉम्ब डागले, अनेक अड्डे नष्ट

france-air-strikesपॅरिस, [१६ नोव्हेंबर] – १२९ नागरिकांचे बळी घेणार्‍या पॅरिसवरील हल्ल्यानंतर संतप्त झालेल्या फ्रान्सने आज सोमवारी पहाटेपासूनच इसिसच्या राक्का येथील अनेक गुप्त अड्ड्यांवर जोरदार हवाई हल्ले सुरू केले. सुमारे १० लढाऊ विमानांनी इसिसच्या अड्ड्यांवर अक्षरश: आग ओकली. यात इसिसचे अनेक अड्डे आणि शस्त्रसाठा नष्ट झाला असून, काही अतिरेकीही ठार झाल्याची माहिती आहे.
शनिवारी इसिसच्या आत्मघाती पथकातील अतिरेक्यांनी फ्रान्सची राजधानी पॅरिस शहरात एकाचवेळी सहा ते सात ठिकाणी हल्ला केला होता. यात १२९ जणांचा मृत्यू, तर ३५० पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. एकीकडे आपल्या नागरिकांच्या मृत्यूचे दु:ख असतानाच, फ्रान्स सरकारने इसिसला कठोर धडा शिकविण्याचा निर्णयही घेतला आणि हल्ल्यांची रणनीती तयार केली. याचाच एक भाग म्हणून फ्रान्स हवाई दलाच्या सुमारे १० लढाऊ विमानांनी सीरियातील इसिसची स्वयंघोषित राजधानी असलेल्या राक्का शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार बॉम्बवर्षाव केला. एका पाठोपाठ २० बॉम्ब टाकण्यात आले. यात इसिसची कमांड पोस्ट, अतिरेक्यांची भरती करण्याचे केंद्र, प्रशिक्षण शिबिरे, शस्त्रागार आणि अन्य काही महत्त्वाची ठिकाणे पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाली, अशी माहिती फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयातील प्रवक्त्याने दिली. इसिसने मात्र, हल्ल्याच्या शक्यतेने आम्ही ही ठिकाणे आधीच रिकामी केली असल्याने कोणतेही नुकसान झाले नसल्याचा दावा केला.
इसिसचे कृत्य माफ करण्यासारखे मुळीच नाही. आमच्या निष्पाप नागरिकांना ठार मारणार्‍या इसिसला पूर्णपणे उद्‌ध्वस्त केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असे जाहीर करीत, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रॅन्कोईस होलांड यांनी इसिसविरुद्ध जणू युद्धच पुकारले आहे. फ्रान्सच्या हवाई दलाने हल्ले सुरू करताच, अमेरिका आणि अन्य पाश्‍चिमात्य देशही यात सहभागी झाले. जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरातमधील विमानतळांचा या हल्ल्यांसाठी वापर करण्यात आला, असे प्रवक्ता म्हणाला.
सलाह अब्देस्लामचा शोध
या हल्ल्याचा सूत्रधार इसिसचा सर्वाधिक घातक अतिरेकी सलाह अब्देस्लाम असून, तो जिवंत असल्याने पॅरीस पोलिसांनी शहरभर धाडसत्र सुरू केले आहे. अन्य शहरांमध्येही धाडी घालण्यात येत आहेत. सलाह आणि त्याचे दोन भाऊ या हल्ल्यातील सूत्रधारांपैकी एक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
काळ्या रंगाची कार जप्त
दरम्यान, स्थानिक पोलिसांना या हल्ल्याशी संबंधित काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. पोलिसांनी काळ्या रंगाची सीट कंपनीची कार ताब्यात घेतली आहे. पॅरिस हल्ल्यात दहशतवाद्यांनी याच कारचा वापर केल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. पॅरिसपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मॉन्ट्रिल या उपनगरातून ही कार ताब्यात घेण्यात आली आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, कार्लिऑन बार आणि ला पेटिट कॅम्बोज रेस्टॉरेन्टवर हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांनी याच कारचा वापर केला होता. अन्य एका कारवाईत पोलिसांनी बेल्जियममधील एकाच कुटुंबातील ६ जणांसह एकूण १२ जणांना अटक केली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25506

Posted by on Nov 17 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप (1231 of 2458 articles)


=देशाला बदनाम करण्यासाठी प्रचंड पैसा मोजला: व्ही. के. सिंह यांची स्पष्ट भूमिका= लॉस एन्जेलिस, [१६ नोव्हेंबर] - भारतात सध्या असहिष्णुतेवर ...

×