Home » ठळक बातम्या, प.महाराष्ट्र » बिंदुमाधव जोशी कालवश

बिंदुमाधव जोशी कालवश

bindumadhav_joshiपुणे, [१० मे] – अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष, देशातील ग्राहक चळवळीचे प्रणेते आणि स्वातंत्र्य सैनिक बिंदुमाधव जोशी यांचे आज रविवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा बराच मोठा परिवार आहे.
बिंदुमाधव जोशी गेले काही दिवस आजारी होते. यापूर्वी त्यांच्यावर दोनदा हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती. वृद्धापकाळामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी दुपारी चारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांवर दुःखाची छाया पसरली. अनेकांनी तातडीने रुग्णालयाकडे धाव घेतली. संध्याकाळी सहा ते आठ या काळात जोशी यांचे पार्थिव कसबा पेठेतील घरी ठेवण्यात आले होते. तेथे अंत्यदर्शनासाठी अनेकांनी गर्दी केली होती. त्यानंतर रात्री वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुण्यात २५ सप्टेंबर १९३१ रोजी बिंदुमाधव जोशी यांचा जन्म झाला होता. पुण्यात आठशेहून अधिक वर्षे वास्तव्यास असलेल्या मूळच्या पुणेकर जोशी कुटुंबाचा वारसा त्यांना लाभला होता. पुण्यातील स. प. महाविद्यालयात त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. देश स्वतंत्र झाल्यानंतरही गोवा तसेच दादरा, नगर हवेली हे प्रदेश पोर्तुगिजांच्या अंमलाखाली होते. या प्रदेशांच्या स्वातंत्र्यासाठी त्यावेळी जोरदार संघर्ष सुरू झाला होता. बिंदुमाधव जोशी यांनी १९५४ मध्ये दादरा, नगर-हवेलीच्या मुक्तीसंग्रामात उडी घेतली होती.
बिंदुमाधव जोशी यांनी विवेकानंदांचा आदर्श नेहमी समोर ठेवला होता. राजकारणात जाण्याऐवजी समाजकारणातच राहणे पसंत केले. त्यामुळे राज्यातील आदिवासी, दुष्काळी व मागास भागातील लोकांच्या विकासासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत राहिले. जयप्रकाश नारायण यांच्या नवनिर्माण चळवळीचा त्यांच्यावर प्रभाव पडला. बिंदुमाधव जोशी यांनी १९७४ मध्ये अ. भा. ग्राहक पंचायत सुरू केली. तिचे उदघाटन जयप्रकाश नारायण यांनी केले होते. ही केवळ संस्था न राहता चळवळच बनून गेली. ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा प्राण असून, ग्राहकशक्ती उभी करणे ही काळाची गरज आहे, असे त्यांचे मत होते. भारतीय विचारधारा व समाजमनाचा विचार करून जोशी यांनी अनेक कल्पक उपक्रम राबविले. त्यातून ही चळवळ जनमानसात रूजली. भारतीय ग्राहक चळवळीचे संरक्षक अशा शब्दात न्या. एम. सी. छागला यांनी बिंदुमाधव जोशी यांचा गौरव केला होता.
देशातील ग्राहकांच्या हितरक्षणासाठी कायदा असणे जरूरीचे आहे, असे ते नेहमी आग्रहाने सांगत असत. त्यासाठी त्यांनी दीर्घकाळ परिश्रमही केले. त्याचेच फलित म्हणून १९८६ मध्ये ग्राहक संरक्षण कायदा पारित झाला. तसेच, स्वतंत्र ग्राहक प्राधिकरण व ग्राहक कल्याणकारी विभागाची स्थापनाही झाली. राज्यात व देशात ग्राहक मंच स्थापन करण्यासाठीही परिश्रम घेतले. त्यातूनच ग्राहकांच्या हितरक्षणासाठी देशभरात अनेक मंच स्थापन झाले. जोशी यांच्या कार्याची दखल राज्य सरकारनेही घेतली. त्यामुळेच ग्राहक संरक्षणासंदर्भातील उच्चाधिकार समितीच्या अध्यक्षपदी (मंत्रिपदाचा दर्जा) त्यांची नियुक्ती करण्यात आली. या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात जोशी यांनी ग्राहक चळवळ व प्रशासनात उत्तम समन्वय साधण्याचे शिवधनुष्य लिलया पेलले.
जोशी यांच्या या कार्याचा विविध पुरस्कारांनीही गौरव करण्यात आला होता. ‘फादर ऑफ इंडियन कंझ्युमर मूव्हमेंट’ असा सरकारने त्यांचा सार्थ गौरव केला होता. इंडियन मर्चंट चेंबरने अमृत पुरस्काराने त्यांचा गौरव केला होता. तसेच, रामशास्त्री प्रभुणे पुरस्कार, याज्ञवल्क्य पुरस्कार आणि फाय फाऊंडेशन पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22498

Posted by on May 12 2015. Filed under ठळक बातम्या, प.महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, प.महाराष्ट्र (1706 of 2451 articles)


=पहिला मान भारताला= नवी दिल्ली, [११ मे] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठोस पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या ‘ब्रिक्स’ राष्ट्रसमुहाच्या बँकेच्या ...

×