Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » बिहारमध्ये भाजपाचाच विजय

बिहारमध्ये भाजपाचाच विजय

=जेटलींचा दावा=
arun jaitley5नवी दिल्ली, [२३ मे] – सध्या केंद्रात सत्तेत असलेला भाजपा हा आता देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू झाला असून, सर्व राजकारण भाजपाच्या अवतीभोवती फिरत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज शनिवारी येथे एका पत्रपरिषदेत केले. बिहारची आगामी विधानसभा निवडणूक मित्रपक्षांच्या मदतीने भाजपाच जिंकेल, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
भाजपाप्रणीत रालोआ सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त ११ अशोका रोड या भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत जेटली म्हणाले की, देशाचे राजकारण आता भाजपा समर्थक आणि भाजपा विरोधक या दोन मुद्यांवरच केंद्रित झाले आहे. भाजपाच्या वाढत्या शक्तीचे हे द्योतक आहे. भाजपाने विधानसभा निवडणुकांमध्येही आपली ताकद सिद्ध केली आहे, केंद्रातील सत्तेनंतर हरयाणा आणि झारखंडमध्ये भाजपाने स्बळावर सरकार बनवले. महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीरमध्ये मित्रपक्षांच्या मदतीने, तर आंध्रप्रदेशात तेलगू देसम्‌सोबत सरकार स्थापन केले. ओडिशा आणि तेलंगणात गैरकॉंग्रेसी पक्षांचे सरकार आले. विशेष म्हणजे या सर्व राज्यात कॉंग्रेस कुठेच शिल्लक नसून पक्षाचा पूर्णपणे सफाया झाला आहे.
आता बिहारमध्ये होणार्‍या आगामी विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षांच्या मदतीने भाजपाच सरकार स्थापन करेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. बिहारमध्ये विरोधक गोंधळलेल्या मनस्थितीत आहे. आम्हाला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी तथाकथित जनता परिवाराने अव्यवहार्य युती करण्याचा प्रयत्न चालविला आहे, असा आरोपही जेटली यांनी केला.
जम्मू-काश्मिरात पीडीपीसोबत युती करण्याचा निर्णय देशहिताच्या भूमिकेतून घेण्यात आला. राज्यातील विघटनवादी शक्तींविरुद्ध संघर्ष करण्यासाठी याची आवश्यकता होती, असे स्पष्ट करत जेटली म्हणाले की, खोर्‍यात मिळालेल्या जनादेशाने भाजपा आणि पीडीपी यांना युती करावी लागली. जम्मूचा जनादेश भाजपासाठी, तर काश्मीर खोर्‍याचा पीडीपीला. त्यामुळे राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी या दोन पक्षांना एकत्र यावे लागले. राज्याच्या राजकारणातील हा एक टर्निंग पॉईट होता. वैचारिक मतभेद असलेले दोन पक्ष किमान कार्यक्रमावर राज्यात सरकार बनवण्यासाठी एकत्र आले. हा प्रयोग यशस्वी होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशहिताचे निर्णय धडाक्याने घेणे सुरू झाले, याकडे लक्ष वेधत जेटली म्हणाले की, सरकारची दिशा स्पष्ट आहे. जलद गतीने आम्ही अनेक निर्णय घेतले. निर्णय प्रक्रिया पारदर्शी केली. आम्ही भ्रष्टाचार बंद केला. साऊथ आणि नॉर्थ ब्लॉकमधील दलालांचा वावर कमी झाला. कोणतीही विशिष्ट व्यक्ती आणि उद्योगाला डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले नाही. चौकशी यंत्रणांचा दुरुपयोग बंद केला. त्यांच्या कार्यपद्धतीवरील प्रश्‍नचिन्ह दूर केले, असा दावा जेटली यांनी केला.
आमच्या सरकारच्या वर्षभराच्या काळातील अनेक उपलब्धी आहेत. सर्वांत महत्त्वाची उपलब्धी म्हणजे आम्ही पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा आणि विश्‍वसनीयता पुन्हा प्रस्थापित केली. संपुआ सरकारच्या काळात बाह्य सत्ताकेंद्रामुळे पंतप्रधानपदाचे अवमूल्यन झाले होते. आम्ही ते वातावरण बदलवले. आमच्याकडे पंतप्रधानांचा शब्द हा शेवटचा आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आमच्या कार्यकाळात अल्पसंख्यक सुरक्षित आहेत. चर्चवरील हल्ले हा जातीय नव्हे, तर कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे, असे जेटली म्हणाले. जोपर्यंत जनतेचे एकमत होत नाही, तोपर्यंत दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देणे शक्य नसल्याचे जेटली यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले सांगितले. पत्रपरिषदेला भाजपाचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव आणि प्रवक्ते श्रीकांत शर्मा उपस्थित होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22648

Posted by on May 24 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1671 of 2453 articles)


=जयललिता यांचा थाटात शपथविधी, राज्यभर प्रचंड जल्लोष= चेन्नई, [२३ मे] - बेहिशेबी संपत्तीच्या खटल्यातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता ...

×