Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » बिहारसाठी भाजपाचे ‘मिशन १८५’

बिहारसाठी भाजपाचे ‘मिशन १८५’

  • रालोआचे जागावाटप जाहीर
  • दोन तृतीयांश बहुमताचा अमित शाह यांना विश्‍वास
  • भाजपा १६० जागा लढवणार, मित्रपक्षांसाठी सोडल्या ८३ जागा

AmitShah-Varanasiनवी दिल्ली, [१४ सप्टेंबर] – बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आज सोमवारी जागावाटप जाहीर करण्यात आले. विधानसभेच्या २४३ जागांपैकी १६० जागा भाजपाकडे ठेवताना, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी ‘मिशन १८५’ जाहीर केले. रालोआतील इतर मित्रपक्षांसाठी ८३ जागा सोडण्यात आल्या आहेत.
रालोआतील जागावाटपाकडे बिहारचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. महाआघाडीतील जागावाटपाची घोषणा कधीच झाली होती, मात्र रालोआत गेल्या अनेक दिवसांपासून जागावाटपावर चर्चेच्या फेर्‍या सुरू होत्या. कधी रामविलास पासवान नाराज व्हायचे, तर कधी उपेंद्र कुशवाह. जीतनराम मांझी यांची समजूत घालता घालता भाजपा नेते मेटाकुटीस आले होते. पण, सोमवारी अखेर रालोआत जागावाटपाचा समझोता झाला.
अमित शाह यांनी घटकपक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत ११, अशोका रोड या भाजपा मुख्यालयात आयोजित संयुक्त पत्रपरिषदेत जागावाटपाची घोषणा केली. यावेळी केंद्रीय खत आणि रसायन मंत्री, तसेच भाजपाचे बिहार निवडणुकीचे प्रमुख अनंतकुमार, बिहार भाजपाचे प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे प्रमुख रामविलास पासवान, खा. चिराग पासवान, राष्ट्रीय लोकसमता पार्टीचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह, बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तान अवाम मोर्चाचे अध्यक्ष जीतन राम मांझी, बिहार भाजपाचे अध्यक्ष मंगल पांडे, सुशीलकुमार मोदी, अरुणकुमार यांच्यासह रालोआचे नेते उपस्थित होते. पासवानांच्या नेतृत्वातील लोकजनशक्ती पार्टीला ४०, उपेंद्र कुशवाह यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोक समता पार्टीला २३, तर जीतनराम मांझी यांच्या नेतृत्वातील हिंदुस्थान अवाम मोर्चाला २० जागा देण्यात आल्या आहेत. मांझी यांचे काही उमेदवार भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे अमित शाह यांनी सांगितले. मात्र, मांझी यांचे किती उमेदवार भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढतील, ते सांगण्यास शाह यांनी नकार दिला.
जागावाटपाचा समझोता एकमताने झाला, कोणाचीही कोणत्याही प्रकारची नाराजी आता राहिली नाही, रालोआतील सर्व घटकपक्ष एकदिलाने बिहारमधील विधानसभा निवडणुकीला सामोरे जातील, असे शाह यांनी स्पष्ट केले. विकासाच्या मुद्यावर भाजपा ही निवडणूक लढवणार असून, आम्हाला १८५ जागांसह दोन तृतीयांश बहुमत मिळेल, असा विश्‍वासही शाह यांनी व्यक्त केला.
बिहारच्या जनतेने आतापर्यंत सर्वांना संधी दिली आहे. यावेळी आम्हाला संधी द्यावी, असे आवाहन करीत शाह म्हणाले की, आम्ही सत्तेत आल्यावर बिहारचा सर्वांगीण विकास करू. बिहारला देशातील आघाडीचे राज्य बनवू. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाचे स्टार प्रचारक असून, ते भाजपासोबत मित्र पक्षांच्या उमेदवारांचाही प्रचार करतील, त्याचप्रमाणे मित्रपक्षांचे नेते आपल्या उमेदवारांसोबत भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार करतील, असे शाह यांनी सांगितले.
महाआघाडीत निवडणुकीपूर्वीच फाटाफूट झाली असून, महाआघाडीच्या नेत्यालाच महाआघाडीतून बाहेर पडावे लागले, असे स्पष्ट करीत शाह म्हणाले की, नितीशकुमार यांनी बिहारमध्ये जंगलराज आणणार्‍या लालूप्रसाद यादव यांच्यासोबतच १२ लाख कोटींचा भ्रष्टाचार करणार्‍या कॉंग्रेससोबत युती केली आहे. जंगलराज आणि भ्रष्टाचाराला सोबत घेऊन नितीशकुमार बिहारचा विकास करू शकत नाही.
भाजपासोबत असलेली युती नितीशकुमार यांनी का आणि कुणासाठी तोडली, हे बिहारच्या जनतेला माहीत आहे. बिहारच्या जनतेने आम्हाला जो जनादेश दिला होता, त्याच्याशीच नितीशकुमार यांनी विश्‍वासघात केला, हा मुद्दा आम्ही जनतेच्या दरबारात नेणार असल्याचे शाह यांनी सांगितले. बिहारमध्ये मुख्यमंत्री कुणाला बनवायचे, उपमुख्यमंत्री राहील की नाही, याबाबतचा निर्णय भाजपा संसदीय पक्ष घेणार असल्याचे एका प्रश्‍नाच्या उत्तरात शाह यांनी स्पष्ट केले.
मागील वर्षी महाराष्ट्र, हरयाणा, झारखंडमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले. मध्यप्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकमध्ये नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपाने बाजी मारली. तसेच दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत अभाविपला विजय मिळाला. देशातील जनमत कोणत्या दिशेने जात आहे, त्याचे हे निदर्शक आहे, त्यामुळे बिहारमध्येही भाजपाला दोन तृतीयांश बहुमत मिळेल, यात काहीच शंका नाही, असे त्यांनी सांगितले.
ज्या बिहारमधून गैरकॉंग्रेसवादाच्या राजकारणाचा प्रारंभ झाला, त्याच बिहारमध्ये नितीशकुमार कॉंग्रेससोबत युती करून निवडणूक लढवित आहेत, ही त्यांनी तत्त्वाशी केलेली फारकत आहे, याचा जाब जनता त्यांना विचारल्याशिवाय राहणार नाही, असे शाह म्हणाले. केंद्र सरकारसोबत संघर्षाची भूमिका घेणारे नाही, तर केंद्राच्या पावलावर पाऊल टाकून चालणारे सरकार बिहारमध्ये हवे आहे, असे ते म्हणाले.
रालोआतील जागावाटप असे
एकूण जागा २४३
भाजपा १६०
लोजपा ४०
आरएलएसपी २३
एचएएम २०

Short URL: https://vrittabharati.in/?p=23800

Posted by on Sep 14 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (1473 of 2452 articles)


नवी दिल्ली, [१४ सप्टेंबर] - भारताने संरक्षण क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीला मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच ‘मेक इन इंडिया’मोहिमेअंतर्गत उत्पादनाचे कार्य ...

×