Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » बिहारात नरेंद्र मोदींचा झंझावात

बिहारात नरेंद्र मोदींचा झंझावात

  • भाजपाचा निर्णय
  • पूर्ण ताकदीने प्रचारात उतरविणार
  • ४० सभांचे नियोजन

narendra modi 7नवी दिल्ली, [७ ऑक्टोबर] – बिहारमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या प्रचाराचा मुख्य जोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभांवर राहणार आहे. बिहारची निवडणूक भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणि नेतृत्वात लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे ते स्वाभाविकही आहे. मोदी भाजपाचे मुख्य स्टार प्रचारक आहेत. भाजपाने बिहारमध्ये मोदी यांच्या ४० जाहीरसभा करण्याचे नियोजन केले आहे.
येत्या काही दिवसांत भाजपा बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारसभांची रणधुमाळी उडवून देण्याच्या तयारीत आहे. बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होत असलेल्या भागात उद्या ८ ऑक्टोबरला मोदी यांच्या ५ सभांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात बिहारमध्ये ४५ मतदारसंघात १२ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. या भागातील प्रचार १० ऑक्टोबरला संपेल. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपा या भागात पंतप्रधान मोदी यांना उतरवून वातावरण आपल्या बाजूने करण्याच्या प्रयत्नात आहे.
महाराष्ट्र, झारखंड, हरयाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचारात उतरवले होते. विशेष म्हणजे या चार राज्यात भाजपाने आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. भाजपाने या चारही राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडणूक लढवली होती, आणि ती जिंकलीही होती.
महाराष्ट्रात मागील वर्षी १५ ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक झाली होती. या निवडणुकीत मोदी यांनी प्रचाराचा झंझावात उभा केला होता. ४ ते १३ ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात मोदी यांच्या २५ जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या. यातील नाशिकची सभा प्रचंड पावसामुळे रद्द करावी लागली. उर्वरित २४ सभा मोदी यांनी घेत वातावरण भाजपाच्या बाजूला वळवले होते. १२ आणि १३ ऑक्टोबरला मोदी यांनी ८ सभा घेतल्या होत्या. मोदी यांच्या प्रचारामुळेच भाजपाला राज्यात प्रथमच सर्वाधिक जागा मिळाल्या आणि शिवसेनेच्या मदतीने भाजपा राज्यात सत्तेवर आली. बिहारप्रमाणेच जम्मू काश्मिरात २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०१४ या काळात ५ टप्प्यात मतदान झाले होते. २२ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या काळात पंतप्रधान मोदी यांनी राज्यात ९ सभा घेतल्या. मोदी यांच्या जम्मू, श्रीनगर, उधमपूर, कठुआ, पूंछ, सांबा, किश्तवाड, राजौरी आणि बिलावल येथे सभा झाल्या. या सभामुळेच कधी नव्हे ते राज्यात भाजपाला दुसर्‍या क्रमांकाच्या जागा मिळाल्या. महाराष्ट्राप्रमाणे काश्मिरातही भाजपाने पीडीपीच्या मदतीने सरकार बनवले.
झारखंडमध्येही मागीलवर्षी २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०१४ या काळात ५ टप्प्यात मतदान झाले. पंतप्रधान मोदी यांनी राज्यात ६ दिवसांत ९ जाहीरसभा घेत भाजपाला सत्तेवर आणले. हरयाणातही १५ ऑक्टोबरला मतदान झाले होते. हरयाणात मोदी यांच्या एकूण ११ सभा झाल्या. ८ ऑक्टोबरला मोदी यांनी ४ प्रचारसभांना संबोधित केले. हरयाणातही भाजपाने स्वबळावर सरकार स्थापन केले.
प्रचाराचा हाच फॉर्म्युला बिहारमध्ये वापरण्याची भाजपाची योजना आहे. बिहारमध्येही पाच टप्प्यांत मतदान होत आहे. पहिला टप्प्यातील प्रचार संपायला आता फक्त तीन दिवस उरले आहेत. मात्र, मतदानाच्या प्रत्येक टप्प्यात बिहारमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या आठ ते दहा सभा घेण्याची योजना भाजपाने आखली आहे. बिहारमध्ये निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधी पंतप्रधान मोदी यांच्या चार मोठ्या सभा झाल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी बिहारची विधानसभा निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळेच त्यांनी बिहारच्या विकासासाठी सव्वा लाख कोटी रुपयांचे पॅकेजही घोषित केले आहे. याशिवाय राज्यातील अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ४० हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना पूर्ण ताकदीने प्रचारात उतरवण्याची भाजपाशी योजना आहे. मोदी प्रचारात उतरल्यावर राज्यातील वातावरण पूर्णपणे भाजपामय झालेले असेल आणि भाजपाचे ‘मिशन १८५’ यशस्वी होईल, असा भाजपा नेत्यांचा विश्‍वास आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25040

Posted by on Oct 8 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (1357 of 2452 articles)


न्यूयॉर्क, [७ ऑक्टोबर] - येत्या काळात वैयक्तिक कराचे प्रमाण कमी करून योग्य स्तरावर आणण्यात येतील. तसेच येत्या चार वर्षांत औद्योगिक ...

×