Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » बिहारात पुन्हा ‘नितीश’ राज, उद्या शपथविधी

बिहारात पुन्हा ‘नितीश’ राज, उद्या शपथविधी

=विश्‍वासमतापूर्वीच मांझींचा राजीनामा=
jitan nitishपाटणा, [२० फेब्रुवारी] – गेल्या अनेक दिवसांपासून रोज नवनवे वळण घेणार्‍या बिहारमधील सत्तासंघर्षाला आज शुक्रवारी नाट्यमयरीत्या पूर्णविराम मिळाला. बहुमत नसल्यामुळे विश्‍वासमतात आपला पराभव अटळ आहे, याची खात्री पटल्याने बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी विश्‍वासमताचा सामना करण्यापूर्वीच थेट राजभवन गाठले आणि राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे आपला राजीनामा सोपविला. राज्यपालांनी मांझी यांचा राजीनामा मंजूर केल्यानंतर सायंकाळी नितीशकुमार यांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले असून, रविवार, २२ फेबु्रवारी रोजी नितीशकुमार यांचे सरकार राज्यात सत्तारूढ होणार आहे.
मांझी यांच्या राजीनाम्यानंतर नितीशकुमार यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. सुमारे अर्ध्या तासाच्या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, राज्यपालांच्या सूचनेनुसार रविवारी सायंकाळी पाच वाजता आपण मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे.
तत्पूर्वी, राज्यपालांकडे आपला राजीनामा सादर करणारे जीतन राम मांझी यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, विधानसभाध्यक्ष उदय नारायण चौधरी यांनी विश्‍वासमताच्या काळात गुप्त मतदानाची परवानगी नाकारण्याचे ठरविले होते. ते नितीशकुमार यांच्याच इशार्‍यावर काम करीत होते. नितीशकुमार समर्थक आमदारांनी तसेही सभागृहात जोरदार गोंधळ घालण्याची आणि माझ्या समर्थकांना मारहाण करण्याची तयारी केली होती. अशा स्थितीत विश्‍वासमताचा सामना न करता राजीनामा देण्यातच मला शहाणपण वाटले. माझ्याकडे १४० आमदारांचा पाठिंबा होता. पण, मी जर विधानसभेत गेलो असतो, तर रक्तपात झाला असता, अनेकांचा जीव धोक्यात आला असता. मला तो प्रकार टाळायचा होता.
मांझी यांनी यावेळी नितीशकुमार आणि विधानसभाध्यक्षांवर सडकून टीका केली. कुमार यांच्या इशार्‍यावरच अध्यक्ष निर्णय घेत होते. गुप्त मतदानाला परवानगी नाकारण्यात येणार असल्याचे मला आधीच कळले होते. त्यांचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. नितीशकुमार यांनी जर मला राजीनामा मागितला असता, तर मी हसत दिला असता. माझा पक्षाकडून अपमान होत असताना त्यांनी भीष्म पितामहासारखे मौन बाळगले होते, असा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी लालूप्रसाद यादव यांच्यावरही टीका केली. मुख्यमंत्रिपदी माझी निवड झाल्यानंतर त्यांनी एका महादलिताच्या नियुक्तीवर आनंद व्यक्त केला होता. माझ्या सरकारने केलेल्या कामाची स्तुती केली होती. पण, गेल्या १५ दिवसांपासून ते शांत बसले होते, असे त्यांनी सांगितले. यानंतर तुम्ही स्वतंत्र राजकीय पक्ष काढणार का, असे विचारले असता, येत्या २८ फेबु्रवारीला मी समर्थकांची बैठक बोलावली आहे. त्यात भविष्यातील रणनीतीवर चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
तत्पूर्वी, जदुय, राजद आणि कॉंग्रेस या पक्षांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता. राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी सकाळी अकरा वाजता संयुक्त बैठकीला संबोधित करणार होते. त्यानंतर मांझी विश्‍वासमत मांडणार होते. पण, मांझी यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांचे अभिभाषण रद्द करावे लागले. मांझी यांना त्यांच्या आठ आमदारांसह भाजपाच्या ८७ आमदारांचा पाठिंबा होता. तिथेच, नितीशकुमार यांना एकूण १२८ आमदारांचा पाठिंबा होता.
‘‘आपल्याला पाठिंबा देणारे मंत्री आणि आमदारांचा जीव धोक्यात आला होता. त्यांना नितीशकुमार गटाकडून जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. जदयु नेते रामेश्‍वर पासवान यांच्या घरी किमान १० अनोळखी लोक बसले होते. आपल्या समर्थकांचा जीव मला धोक्यात आणायचा नव्हता. शिवाय, विधानसभेतही हाणामारी होण्याची शक्यता जास्त होती. हा सर्व प्रकार मला टाळायचा होता. विश्‍वासमत मी सहज प्राप्त करू शकलो असतो. कारण जदयुतील किमान ५० आमदारांचा मला पाठिंबा होता.’’
जीतनराम मांझी
‘‘आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी आपला दावा काही दिवसांपूर्वीच सादर केला आहे. आम्हाला निमंत्रण द्यायचे की नाही, याबाबतचा निर्णय आता राज्यपालांनाच घ्यायचा आहे. मला जर मुख्यमंत्रिपदाची पुन्हा संधी मिळाली, तर यापूर्वी साडेआठ वर्षे ज्याप्रकारे मी जनतेची सेवा केली, तशीच सेवा उर्वरित काळातही करीन, राजीनामा देण्याचा माझा निर्णय चुकीचाच होता. पुन्हा अशी चूक करणार नाही. सुशासन हाच आपला उद्देश असेल.’’
नितीशकुमार, जदयु
‘‘नितीशकुमार यांनी एका महादलिताचा अपमान केला. आम्ही मांझी यांना केवळ पाठिंबा दिला होता. त्यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा आमचा उद्देश कधीच नव्हता. सरकारचे बहुमत कसे सिद्ध करायचे, हा निर्णय त्यांनाच घ्यायचा होता. नितीशकुमार यांच्या धूर्त राजकीय खेळीमुळे त्यांना कदाचित राजीनामा द्यावा लागला. पण, खरा विजय त्यांचाच झाला आहे. पाठिंब्यातून जो संदेश समाजाला द्यायचा होता, तो आम्ही दिला आहे.’’
सुशीलकुमार मोदी, भाजपा

Short URL: https://vrittabharati.in/?p=20753

Posted by on Feb 21 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (2035 of 2452 articles)


=शिव-पार्वती आमचेही आई-वडील : जमियतचे मुफ्ती मोहम्मद इलियास यांचे मत= अयोध्या, [१९ फेब्रुवारी] - भारत हे हिंदू राष्ट्र आहे, या ...

×