Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » बिहार विधानसभा निवडणुकीचे वाजले बिगुल

बिहार विधानसभा निवडणुकीचे वाजले बिगुल

  • पाच टप्प्यात होणार मतदान, आचारसंहिता लागू
  • ८ नोव्हेंबरला मतमोजणी

Syed Nasim Ahmad Zaidi (EC)नवी दिल्ली, [९ सप्टेंबर] – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने आज बुधवारी जाहीर केला. बिहारमध्ये पाच टप्प्यांत निवडणूक होणार असून, त्याची सुरुवात १२ ऑक्टोबरपासून होणार आहे. पाचवा आणि अंतिम टप्पा ५ नोव्हेंबरला पूर्ण होईल आणि ८ नोव्हेंबर रोजी बिहारच्या सत्तेत कोण विराजमान होणार, याचा निर्णय जाहीर होणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त नसीम अहमद झैदी यांनी बुधवारी भरगच्च पत्रपरिषदेत निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. २४३ सदस्यीय विधानसभेसाठी १२, १६ आणि २८ ऑक्टोबर, तसेच १ व ५ नोव्हेंबर, अशा पाच टप्प्यांत मतदान घेण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ २९ नोव्हेंबर रोजी संपणार आहे.
नवरात्र, दसरा, ईद, मोहरम, दिवाळी आणि छट पूजा यासारखे महत्त्वाचे सण निवडणूक काळात येत आहेत. या सर्व सणांचा आम्ही काळजीपूर्वक विचार केला. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, याची काळजीही आम्ही घेतली आहे, असे झैदी म्हणाले. पत्रपरिषदेत निवडणूक आयुक्त अचल कुमार ज्योती आणि ओमप्रकाश रावत हेदेखील उपस्थित होते.
या पाचही टप्प्यांमध्ये २४३ जागांवर उभे राहणार्‍या उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यासाठी ६.६८ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्यातील ३८ जिल्ह्यांपैकी २९ जिल्ह्यांमधील ४७ विधानसभा मतदारसंघ नक्षलप्रभावित आहेत. या सर्वच मतदानसंघांमध्ये सुरक्षेचे विशेष उपाय करण्यात येणार आहेत. प्रत्येक ईव्हीएममध्ये उमेदवारांची छायाचित्रे राहणार असून, सर्व मतदानकेंद्रांची व्हिडीओग्राफी होणार आहे. कुठेही अनुचित प्रकार होता कामा नये, यासह नक्षली हिंसाचारावर लक्ष ठेवण्यासाठी जमिनीसोबतच हेलिकॉप्टर्समधूनही आमची नजर राहणार आहे, अशी माहितीही झैदी यांनी दिली.
आज बुधवारपासूनच बिहारमध्ये आचारसंहिता लागू झाली असल्याने सर्व परवानाप्राप्त शस्त्रे ताब्यात घेतली जाणार आहेत. सोबतच, पहिल्या टप्प्याकरिता जनमत चाचण्यांवरही बंदी आणण्यात आली आहे. पेड न्यूजवर आळा घालण्यासाठीही विशेष पावले उचलण्यात येणार आहेत. निवडणूक काळात कुठलीही अप्रिय घटना घडणार नाही, यासाठी केंद्रीय निमलष्करी दलांचे सुमारे ५० हजार जवान तैनात करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि जदयु-राजद-कॉंगे्रसचा समावेश असलेल्या महाआघाडीतच खरी लढत होणार असली, तरी लालूंचे ‘समधी’ मुलायमसिंह यादव यांचा समाजवादी पार्टी आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष जागावाटपाच्या मुद्यावर नाराज होऊन महाआघाडीतून बाहेर पडल्याने निवडणुकीआधीच या आघाडीला धक्का बसला आहे. त्यातच सपाने सर्व २४३ जागा लढविण्याचा निर्णय घेतल्याने आणि सर्व सहाही डाव्या पक्षांनी वेगळी आघाडी स्थापन केल्याने निवडणुकीत आणखी रंगत येणार आहे.
२०१० मध्ये झाले होते सहा टप्पे
२०१० मध्ये बिहार विधानसभेची निवडणूक सहा टप्प्यांत झाली होती. ११ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर, असे ते सहा टप्पे होते. या निवडणुकीत जदयुने ११५, भाजपाने ९१, राजदने २२, लोजपाने ३, कॉंगे्रसने ४, भाकपाने १ आणि झारखंड मुक्ती मोर्चाने १ जागा, तर अपक्षांनी सहा जागा जिंकल्या होत्या.
निवडणुकीचे पाच टप्पे असे
टप्पा मतदानाची तारीख जागा:
पहिला टप्पा – १२ ऑक्टोबर, ४९ जागा
दुसरा टप्पा – १६ ऑक्टोबर, ३२ जागा
तिसरा टप्पा – २८ ऑक्टोबर, ५० जागा
चौथा टप्पा – १ नोव्हेंबर, ५५ जागा
पाचवा टप्पा – ५ नोव्हेंबर, ५७ जागा
मतमोजणी – ८ नोव्हेंबर, २४३ जागा
निवडणूक कार्यक्रमाचे आपण स्वागत करतो. पाच टप्प्यांत निवडणूक घेण्याचा आयोगाचा निर्णय योग्यच आहे. पण, पाच टप्प्यांमध्ये जो कालावधी आहे, तो अतिशय कमी आहे. तथापि, त्याचा फारसा परिणाम होणार नाही. जनता महापरिवारात राहून निवडणूक लढवायची की नाही, हा निर्णय मुलायमसिंह यादव यांनाच घ्यायचा आहे.’’
नितीशकुमार, मुख्यमंत्री बिहार
निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत. निवडणुकीत भाजपाला खुले आव्हान देत आहो. भाजपाला बिहारमधून रिकाम्या हाताने परत जावे लागेल. ही निवडणूक बिहारची नसून, देशाची आहे. मोदी सरकारची उलटगणती सुरू झाली आहे. निवडणुकीसाठी भाजपाकडे नेपाळहून नकली नोटा येत आहेत, त्यापासून सावध राहायला हवे.’’
लालूप्रसाद यादव, राजद अध्यक्ष
नितीश-लालूमुक्त बिहार निर्मितीचा आमचा निर्धार आहे. त्यांच्याकरिता डीएनए आणि आमच्याकरिता विकास हाच निवडणुकीचा मुद्दा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांना होणार्‍या गर्दीमुळे नितीश, लालूंना घाम फुटला आहे. जनतेचा मोदींवर विश्‍वास आहे. बिहारमधील सत्ताधार्‍यांचीच उलटगणती आता सुरू झाली आहे.’’
शाहनवाज हुसैन, भाजपा
आयोगाच्या घोषणेचे स्वागत करतो. देशाची भावी राजकीय वाटचाल कोणत्या दिशेने होईल, याचा निर्णय ही निवडणूक घेणार आहे. बिहारविरोधात झालेल्या अपप्रचाराचे उत्तर जनतेकडून दिले जाईल. आम्ही जागावाटपही केले. रालोआ मात्र केवळ प्रचारातच व्यस्त आहे.’’
शरद यादव, जदयु अध्यक्ष
या निवडणुकीत भाजपाची मोठी निराशा होणार आहे. भाजपाने ज्या पक्षांशी युती केली, ते सर्व सत्तेचे भुकेले आहेत. नितीशकुमार यांच्या नेतृत्वावर बिहारवासीयांचा विश्‍वास आहे. राष्ट्रवादी आणि सपाने महाआघाडीत परत यावे, ही आमची इच्छा आहे.’’
शकील अहमद, कॉंगे्रस

Short URL: https://vrittabharati.in/?p=23744

Posted by on Sep 10 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (1491 of 2452 articles)


नवी दिल्ली, [९ सप्टेंबर] - संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ)च्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून वैज्ञानिक जे. मंजूला यांनी बुधवारी ...

×