Home » क्रीडा, ठळक बातम्या » बेल्जियम अंतिम आठमध्ये

बेल्जियम अंतिम आठमध्ये

= ‘युसए’वर २-१ अशी मात=
साल्वाडोर, [२ जुलै] – विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम सामन्यात केव्हिन डी ब्रूनी व रोमेलू लुकाकु यांनी केलेल्या शानदार गोलच्या जोरावर मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या सामन्यात बेल्जियमने अमेरिकेचा २-१ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मोठ्या उत्साहाने सामना बघितला. परंतु, संघाच्या पराभवामुळे त्यांच्या उत्साहावर पाणी फेरले.
बेल्जियमने गेल्या २८ वर्षांत प्रथमच विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. विश्‍वचषक स्पर्धेत आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांपैकी सर्वोत्तम लढत, असेच या सामन्याचे वर्णन करावे लागेल. अमेरिकेचा गोलकिपर टीम हॉवर्डने निर्धारित ९० मिनिटांच्या खेळात अनेक हल्ले परतवून लावले आणि मार्क विल्मॉट्‌स यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार्‍या बेल्जियमला गोल करण्याची संधी नाकारली. परंतु, अखेर केव्हिनने अमेरिकन संरक्षण फळी भेदत ९३ व्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर रोमेलू लुकाकुने १०५ व्या मिनिटाला गोल करून बेल्जियमला २-० अशी आघाडी मिळवून दिली. यावेळी बेल्जियमचा विजय सुनिश्‍चित मानला जात होता. परंतु, अतिरिक्त वेळेच्या दुसर्‍या सत्राच्या दोनच मिनिटांमध्ये अमेरिकेने गोल करून सामन्यात चुरस निर्माण केली. ज्युलियन ग्रीनने धावत असताना मिळालेल्या पासवर सुंदर गोल करून बरोबरी साधली. अमेरिकेच्या क्लायंट डेम्पसेने मारलेला फटका थिबाउट कोर्टियसने यशस्वीरित्या अडविला आणि सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये जाण्यापासून वाचला. या विजयासह बेल्जियमने उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. आता बेल्जियमची लढत शनिवारी ब्राझीलिया येथे अर्जेंटिनाशी होणार असून, या दोघांमधील ही लढाई म्हणजे १९८६ च्या उपांत्य फेरीच्या सामन्याची पुनरावृत्ती असेल.
‘ह’ गटातील तिन्ही सामन्यांमध्ये बदली खेळाडू म्हणून चमकदार कामगिरी करणारा १९ वर्षीय स्ट्रायकर डिव्होक ओरिगीला लुकाकुच्या जागी संधी देण्यात आली. सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर काही मिनिटांतच केव्हिनच्या पासवर गोल करण्याची संधी ओरिगीला मिळाली होती. परंतु, त्यामध्ये तो अपयशी ठरला. प्रतिआक्रमण करताना बेल्जियमने जो वेगवान खेळ केला तो अमेरिकेसाठी नेहमीच धोकादायक दिसत होता. यादरम्यान, साखळी सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करणारा अमेरिकेचा फाबियान जॉन्सनचा स्नायू दुखावल्यामुळे त्याला सामना मधेच सोडावा लागल्याने जुर्गन क्लिन्समन यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार्‍या अमेरिकन संघाला धक्का बसला.
पूर्वार्धात गोल करण्यात अपयशी ठरल्यानंतर बेल्जियमने उत्तरार्धात जोरदार सुरूवात केली. व्हर्टोनघेनने सुंदर पास दिला. परंतु, केव्हिन आणि ओरिगी या दोघांनाही त्यावर गोल करता आला नाही. हेडर क्रॉसबारला लागून परत आल्यामुळे ओरिगी कमनशिबी ठरला. अतिरिक्त वेळेतील खेळाला सुरुवात झाल्यानंतर ओरिगीला बदलून त्याच्या जागी लुकाकुला संधी देण्यात आली. अमेरिकेने १०७ व्या मिनिटाला गोल केल्यानंतर खेळात पुन्हा चुरस निर्माण झाली. त्यानंतरही दोनवेळा गोल करण्याची संधी अमेरिकेला मिळाली. परंतु, त्यामध्ये त्यांना यश आले नाही आणि २-१ अशा विजयासह बेल्जियमने अंतिम आठमधील आपला प्रवेश निश्‍चित केला. युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या बेल्जियमला जेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणून मानले जात आहे.
बेल्जियम : केव्हिन डी ब्रूनी (९३), रोमेलू लुलाकु (१०५)
अमेरिका : ज्युलियन ग्रीन (१०७)
यलो काडर्‌‌स : अमेरिका : जिऑफ कॅमरून (१८), व्हिन्सेंट कोम्पनी (४२)

Short URL: https://vrittabharati.in/?p=13926

Posted by on Jul 2 2014. Filed under क्रीडा, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, ठळक बातम्या (2405 of 2455 articles)


= फ्रान्सशी लढत होणार= पोर्टो ऍलोगो, [१ जुलै] - विश्‍व करंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीने प्रवेश केला आहे. रात्री ...

×