Home » ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य » भाजपा-पीडीपी सरकारचा उद्या शपथविधी

भाजपा-पीडीपी सरकारचा उद्या शपथविधी

  • पंतप्रधान मोदी- मुफ्ती मोहम्मद सईद यांच्यात चर्चा
  • २५ मंत्री शपथ घेण्याची शक्यता

AMIT SHAH,MEHBOOBA MUFTIनवी दिल्ली, [२७ फेब्रुवारी] – जम्मू-काश्मिरात भाजपा-पीडीपी सरकार स्थापन होण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून, रविवार एक मार्च रोजी सकाळी शपथविधी समारंभ होणार आहे.
जम्मू-काश्मीरच्या आजवरच्या इतिहासात भाजपा सत्तेवर येण्याची ही पहिलीच वेळ असेल. भाजपा-पीडीपी सरकारचा किमान समान कार्यक्रम निश्‍चित झाला असून, त्यात या राज्यात शांतता प्रस्थापित करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. पीडीपीचे सर्वेसर्वा मुफ्ती मोहम्मद सईद यांनी आज शुक्रवारी राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि किमान समान कार्यक्रमाला अंतिम रूप दिले. सोबतच, कोणत्या पक्षाचे किती मंत्री शपथ घेणार, याबाबतचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. रविवारी होणार्‍या शपथविधी सोहळ्यात मुफ्ती मोहम्मद सईद हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या सरकारमध्ये भाजपाचे वरिष्ठ नेते निर्मल सिंह हे उपमुख्यमंत्री राहाण्याची शक्यता आहे. पीडीपीतील १३ आणि भाजपाचे १२ असे एकूण २५ सदस्य या सरकारमध्ये राहणार असल्याची माहिती आहे.
पंतप्रधान मोदी यांच्यासोबत माझी सर्वच मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली आहे. राज्यातील मतदारांनी आम्हाला एकत्रित सरकार चालविण्यासाठीच कौल दिला आहे. त्यातच काश्मीर खोर्‍यात दोन्ही पक्षांना सर्वाधिक मते मिळाली आहेत. त्यामुळे आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती बैठकीनंतर सईद यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. केंद्रातील भाजपाप्रणीत रालोआ सरकारमध्ये पीडीपी सहभागी होणार आहे का, असे विचारले असता या मुद्यावर आताच काही बोलणे योग्य होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न दिल्याने राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. तब्बल दोन महिन्यांपासून पीडीपी आणि भाजपा यांच्यात सरकारच्या मुद्यावर चर्चा सुरू होती. गेल्या आठवड्यात अखेर सर्वच मुद्यांवर एकमत झाले. दोन दिवसांपूर्वी मेहबुबा मुफ्ती आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यातील चर्चेनंतर ११ पानांचा किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आला होता.
सईद हे नऊ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. यापूर्वी कॉंग्रेससोबतच्या युती सरकारमध्ये त्यांनी नोव्हेंबर २००२ ते नोव्हेंबर २००५ या काळात मुख्यमंत्रिपद भूषविले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20911

Posted by on Feb 28 2015. Filed under ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य (2004 of 2452 articles)


=सुरेश प्रभू यांनी सादर केला आश्‍वासक अर्थसंकल्प= नवी दिल्ली, [२६ फेब्रुवारी] - कोणत्याही लोकप्रिय घोषणा न करता, कोट्यवधी भारतीयांची ‘लाईफ ...

×