Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » भारताच्या भूमिकेमुळे पाकला धडकी

भारताच्या भूमिकेमुळे पाकला धडकी

manohar parrikarनवी दिल्ली, [११ जून] – आमच्या जवानांना मारणार्‍या बंडखोरांचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्कराने म्यानमारमध्ये जाऊन केलेल्या कारवाईमुळे बदललेल्या मानसिकतेचे दर्शन घडले असून, भारताच्या या नव्या भूमिकेमुळे धडकी भरलेल्यांनी लगेचच प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे, या शब्दात संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी पाकिस्तानचे नाव न घेता चिमटा काढला आहे.
विचार करण्याचा दृष्टिकोन बदलला तरी किती फरक पडतो, हे गेल्या दोन-तीन दिवसात आमच्या निदर्शनास आले आहे. बंडखोरांविरोधात केलेल्या छोट्याशा कारवाईमुळे देशातील सुरक्षाविषयक स्थितीत एकदम फरक पडला आहे, असे पर्रिकर यांनी आज गुरुवारी येथे एका परिसंवादात बोलताना सांगितले. संरक्षण खरेदीची प्रक्रिया अधिक सुलभ कशी करता येईल, या विषयावर हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.
भारतीय लष्कराने म्यानमारमध्ये केलेल्या कारवाईच्या अधिक खोलात न जाता पर्रिकर म्हणाले की, भारताच्या नव्या भूमिकेमुळे ज्यांना धडकी भरली त्यांनी लगेेचच प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, म्यानमारमधील कारवाईसंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्‍नाला पर्रिकर यांनी उत्तर दिले नाही.
पाकिस्तानला म्यानमार समजू नका, असे त्या देशाचे गृहमंत्री निसार अली खान यांनी बुधवारी म्हटले होते आणि आपला देश सीमेपलीकडून मिळणार्‍या अशा धमक्यांना घाबरणार नाही, असा इशारा दिला होता. भारतीय लष्कराने म्यानमारमध्ये केलेली कारवाई हा इतर देशांना इशारा आहे, असे माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी म्हटले होते. राठोड यांचे हे विधान पाकिस्तानला इशारा आहे, असे समजून निसार खान यांनी हे वक्तव्य केले होते. अशाप्रकारचे कोणतेही धाडस केल्यास आमची सुरक्षा दले सडेतोड प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहेत, असे खान यांनी म्हटले होते.
उच्चस्तरीय बैठक
भारतीय लष्कराने म्यानमारमध्ये केलेली कारवाई, त्यानंतर अतिरेक्यांकडून याचा बदला घेण्यासाठी हल्ला होण्याची शक्यता आणि एकूणच सुरक्षाविषयक परिस्थितीचा गुरुवारी नवी दिल्ली येथे एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंह सुहाग, आयबी, रॉ या गुप्तचर संस्था, तसेच संरक्षण, गृह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. लष्करी कारवाईनंतर म्यानमारसोबत चर्चा करण्यासाठी अजित डोभाल लवकरच त्या देशाच्या दौर्‍यावर जाणार असल्याचे वृत्त आहे.
हल्ल्याची शक्यता, हायअलर्ट जारी
म्यानमारमध्ये करण्यात आलेल्या कारवाईनंतर ईशान्य भारतातील बंडखोरांमध्ये अस्वस्थता पसरली असून, भारत सरकारसोबत बदला घेण्यासाठी मोठा हल्ला करण्याच्या तयारीत ते असल्यामुळे सगळीकडे हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. बंडखोर भारताच्या कारवाईचा बदला घेण्यासाठी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर संस्थांना मिळाल्यानंतर ईशान्य भारतातील सर्व राज्यांमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. एनएससीएनचे (के) १५ ते २० अतिरेकी भारतीय सीमेत घुसले असून, सुरक्षा संस्था किंवा सामान्य लोकांना लक्ष्य करण्यासाठी ते आत्मघाती हल्ला करू शकतात, असा इशारा गुप्तचर संस्थांनी दिल्याचे समजते. गेल्या चार जून रोजी मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात १८ भारतीय जवान शहीद झाल्यानंतर भारताने थेट म्यानमारच्या भूमीत जाऊन जवळपास शंभर अतिरेक्यांचा खात्मा केला होता.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22835

Posted by on Jun 12 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (1629 of 2453 articles)


पुणे, [११ जून] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियासाठी जी धोरणे वेगाने राबवण्यास सुरुवात केली आहे त्याचा परिणाम ...

×