Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » भारत-पाक चर्चा रद्द होण्याची शक्यता

भारत-पाक चर्चा रद्द होण्याची शक्यता

  •  द्विपक्षीय चर्चेत तिसर्‍या पक्षाला स्थान नाही
  •  भारताने पाकिस्तानला सुनावले
  •  … ही तर ऊफा अजेंड्यापासून पळवाटच

SartajAzizनवी दिल्ली/इस्लामाबाद, [२१ ऑगस्ट] – काश्मिरातील फुटीरतावादी हुर्रीयत नेत्यांची भेट घेण्याच्या पाकिस्तानच्या आडमुठ्या भूमिकेमुळे येत्या २३ आणि २४ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये (एनएसए) होऊ घातलेली बैठक रद्द होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. एनएसए बैठकीच्या वेळी हुर्रीयत नेत्यांची भेट कदापि मान्य नाही, असे भारताने पाकिस्तानला स्पष्टपणे बजावले आहे.
या बैठकीपूर्वी हुर्रीयत नेत्यांची भेट घेण्याची परवानगी भारताने द्यावी, असा हेका कायम ठेवत, एनएसए स्तरावरील चर्चेसाठी भारताची कोणतीही पूर्वअट आम्ही मान्य करणार नाही, अशी भूमिका पाकने घेतली आहे. तिथेच, द्विपक्षीय चर्चेत तिसर्‍या कोणत्याही मध्यस्थाला स्थान नाही, अशी कणखर भूमिका भारताने घेतली. दहशतवादाच्या मुद्यावर आपण तोंडघशी पडणार आहोत, याची परिपूर्ण जाणीव असलेल्या पाक सरकारने शुक्रवारी सकाळपासूनच हेकेखोर भूमिका घेतली. अशा वातावरणात फलदायी चर्चा शक्य नसल्याने ही चर्चाच रद्द होण्याची दाट शक्यता आता निर्माण झाली असून, तसे स्पष्ट संकेत भारताने दिले आहेत.
एनएसए पातळीवरील चर्चेपूर्वी पाकचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीज जम्मू-काश्मिरातील फुटीरतावादी नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळताच, सरकारने या सर्व नेत्यांना त्यांच्याच घरात नजरकैद केले आणि ही चर्चा केवळ एनएसए स्तरावरच होईल, असे पाकला ठणकावले. एनएसए बैठकीत भारत केवळ दहशतवादाचाच विशेषत: एनआयएच्या कोठडीत असलेल्या नावेदचा मुद्दा उपस्थित करून पाकला जाब विचारणार असल्याचे स्पष्ट झाल्याने भारताने ही चर्चाच रद्द करावी, याच उद्देशाने पाकने शुक्रवारी सकाळपासूनच हालचाली सुरू केल्या. यापूर्वीची परराष्ट्र सचिव स्तरावरील बैठक याच कारणामुळे रद्द झाल्याचे उदाहरण ताजे असतानाही पाक सरकारने पुन्हा एकदा तेच कारण पुढे करून एनएसए चर्चेतही खोडा आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या.
कोणत्याही चर्चेपूर्वी फुटीरतावादी नेत्यांसोबत चर्चा करण्याची आमची आजवरची प्रथा राहिली आहे. प्रसंगी आम्ही एनएसए चर्चा रद्द करू, पण, ही प्रथा कदापि मोडू शकत नाही. भारताने आम्हाला आदेश देण्याचा प्रयत्न करू नये, असे पाकचे परराष्ट्र सचिव एजाझ अहमद यांनी इस्लामाबादेतील भारतीय उच्चायुक्त टी. सी. ए. राघवन यांना कळविले. भारताच्या कणखर भूमिकेनंतर पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय आणि लष्करातील वरिष्ठ अधिकार्‍यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली. त्यात भारताची भूमिका फेटाळून लावताना, पाकने आपल्या काही अटीही सादर केल्या. भारताने आमच्यावर कोणतीही पूर्वअट लादू नये, तसेच फुटीरतावादी नेत्यांसोबत चर्चा करण्याची परवानगी आम्हाला देण्यात यावी, अशा या अटी आहेत.
या बैठकीनंतर एक निवेदनही जारी करण्यात आले असून, यात काश्मीर हा वादग्रस्त प्रदेश आहे आणि हुर्रीयत नेतेच काश्मिरी जनतेचे खरे प्रतिनिधी आहेत. काश्मीर समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी आम्ही या नेत्यांना सहकार्य करीत आहोत, असा उल्लेख करण्यात आला आहे.
दिवसभरच सुरू असलेल्या पाकमधील घडामोडींवर भारत सरकारची बारीक नजर होती. पाक चर्चेसाठी उत्सुक नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भारताने पाकला पुन्हा एकदा दणका दिला. आम्हाला द्विपक्षीय आणि शांततापूर्ण चर्चा हवी आहे. यात त्रिपक्षीय भूमिका मान्य नाही, असे भारताचे परराष्ट्र सचिव विकास स्वरूप यांनी नवी दिल्ली येथे छोटेखानी पत्रपरिषदेत स्पष्ट केले.
रशियाच्या ऊफा येथे दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी जो निर्धार व्यक्त केला होता, त्याचे पाकिस्तान पालन करेल, अशी अपेक्षा आहे. पण, ऊफा अजेड्यापासून पाकने पळवाट काढली आहे. भारतात अलीकडील काळात अनेक मोठे दहशतवादी हल्लेे झाले. उधमपूर हल्ल्यात पाकचाच हात असल्याचे स्पष्ट झाले. आम्हाला केवळ दहशतवादावर चर्चा हवी आहे. जेव्हा जेव्हा आपण तोंडघशी पडणार, याची जाणीव पाकला होते, त्या प्रत्येक वेळी पाक अशीच भूमिका घेत असतो. यात नवीन काहीच नाही. यापूर्वी परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चेतही पाकने अशीच भूमिका घेतली होती, अशी आठवणही स्वरूप यांनी करून दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23654

Posted by on Aug 22 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1516 of 2453 articles)


=सौदी अरेबियात महिलांना मिळाला प्रथमच मतदान अधिकार= रियाध, [२१ ऑगस्ट] - सौदी अरेबियातील महिलांना स्थानिक निवडणुकांमध्ये प्रथमच मतदानाचा अधिकार बहाल ...

×