Home » उ.महाराष्ट्र, ठळक बातम्या » भारत हिंदूराष्ट्र व्हावे : डॉ तोगडिया

भारत हिंदूराष्ट्र व्हावे : डॉ तोगडिया

PRAVEEN_TOGADIAवर्धा, [२५ डिसेंबर] – मोगलांच्या आक्रमणापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी काही हिंदूंनी मुस्लिम धर्म स्वीकारला. तर ख्रिश्‍चनही मुळात हिंदूच होते. याचा अर्थ आजचे मुस्लिम वा ख्रिश्‍चन आमचेच वंशज आहेत. दुर्दैवाने आज धर्मांतरण वाढत आहे. मात्र, आम्ही पुन्हा धर्मांतरण होऊ देणार नाही. हिंदूंना सुरक्षा, समृद्धी आणि सन्मान मिळावा, यासाठी भारत एक घटनात्मक हिंदूराष्ट्र बनावे आणि हिंदूराष्ट्राच्या आधारावरच शासन असावे, असे मत विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केले.
विश्‍व हिंदू परिषदेच्या सुवर्णजयंती महोत्सवानिमित्त नारी सुरक्षा, गोरक्षा, दहशतवाद, लव्ह जिहाद आणि हिंदू संस्कारांच्या बळकटीकरणासाठी येथील केसरीमल कन्या विद्यालयाच्या प्रांगणात गुरुवार, २५ रोजी दुपारी आयोजित विशाल हिंदू संमेलनात ते बोलत होते. रा. स्व. संघाचे जिल्हा संघचालक रामदास डोणे, जिल्हा सहसंघचालक जेठानंद राजपूत, अजय लिल्लावार, संत सयाजी महाराज, अंबिका भारती, सुभाष महाराज बावणकर, शहालंगडीचे वासुदेव महाराज, महंत मुकेशनाथ महाराज, मोहन अग्रवाल, सुभाष राठी, प्रमोद मुरारका आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
डॉ. तोगडिया यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वाच्या माध्यमातून वास्तव मांडले. अरबस्थान, आफ्रिका, रोम, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आदी देशात हिंदूंचे प्रचंड प्रमाणात अस्तित्व होते. परमेश्‍वराने आम्हाला अपराजित अशी मातृभूमी बहाल केली होती. मात्र, गत अडीच वर्षात ही अपराजित भूमी पराभूत झाली. ७०० कोटी हिंदू १०० कोटींवर आले. रोम, अरबस्तान आणि नंतर काश्मीर खोर्‍यातूनही हिंदूंना संपविण्यात आले. बांगलादेशात ३० टक्के हिंदू होते. आता केवळ आठ टक्केच उरले आहेत. पाकिस्तानात १० टक्के असलेले हिंदू आता केवळ एक टक्का उरले आहेत. काश्मीर खोर्‍यात ३० टक्के हिंदू होते. आता नावालाही नाहीत, अशी आकडेवारीच त्यांनी सादर केली. येत्या २५ वर्षात हिंदूंची संख्या १० कोटींवर येईल की काय, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. संपूर्ण पृथ्वीवर हिंदू होता, आता तो केवळ अर्ध्या भारतात उरला आहे, यावर गंभीर चिंतनाची गरज त्यांनी व्यक्त केली.
प्राचीन भारतात लूटमार, आया-बहिणींवर अत्याचार होत नव्हते. मात्र, आजच्या समृद्ध भारतात घरे लुटली जातात, गाव जाळले जाते, संपत्तीची लूट होते, आया-बहिणींचे अपहरण करून त्यांना विकले जाते, गोमातेची सर्रास कत्तल केली जाते, मंदिरे तोडली जातात. एवढी भयंकर अवस्था हिंदूंची झाली आहे. त्यामुळे १०० कोटी हिंदू संघटित होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
आम्ही हिंदू संस्कृती जपली पाहिजे. रोज गाईला एक पोळी दिली पाहिजे, एक ओंजळ धान्य पक्षांना दिले पाहिजे, रोज मंदिरात जाऊन ईश्‍वराची प्रार्थना करावी, असे आवाहनही डॉ. तोगडिया यांनी यावेळी केले. ते पुढे म्हणाले, आम्हाला शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सन्मान हवा. जोपर्यंत राम जन्मभूमीवर भव्य मंदिर उभारले जाणार नाही, तोपर्यंत भारताला स्वाभिमान मिळणार नाही. तसेच विश्‍व हिंदू परिषद उत्सवही साजरा करणार नाही. आज केवळ आम्ही विशाल हिंदू संमेलनाच्या निमित्ताने संकल्प करीत असल्याचे त्यांनी प्रारंभीच स्पष्ट केले. जोपर्यंत देशात लाखो गाईंची कत्तल होत राहील, तोपर्यंत भारत सन्मानाने जगू शकणार नाही.
विश्‍व हिंदू परिषदेने हिंदूंसाठी विविध योजना अंमलात आणण्याचा संकल्प केला आहे. पाच हजार डॉक्टर्स गरीब हिंदू लोकांची नि:शुल्क आरोग्य तपासणी करीत आहेत. नागपूरपासून सुरू झालेला हा उपक्रम अवघ्या देशात राबविला जाणार असल्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखविला. आम्हाला पुन्हा सुरक्षा, समृद्धी आणि सन्मान मिळवायचा असल्याचे डॉ. प्रवीण तोगडिया यांनी सांगितले.
‘लव्ह जिहाद’मुळे आमच्या आया-बहिणी सुरक्षित नाहीत. आम्ही प्रेमाचे विरोधक नाही. प्रेमाचे सर्वात मोठे उपासक आम्हीच आहोत. आमच्या दृष्टीने आदर्श प्रेम भगवान शंकर-पार्वतीचे आहे. खरेच प्रेम असेल, तर धर्म बदलण्याची आवश्यकता काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या लव्ह जिहादमुळे सावित्री, सलमा होत आहेत. ५० सावित्री सलमा होत असतील तर ५० सलमान, राम का होऊ नयेत, असा प्रश्‍न उपस्थित करीत, हिंदू परिवाराची मुलगी केवळ त्या परिवाराची नसून, १०० कोटी हिंदूंची मुलगी आहे. त्यामुळे याद राखा, आमच्या बहिणींकडे वाईट नजरेने बघण्याची हिंमत करू नका, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी नारी शक्ती या विषयावर मीरा कडबे यांनी तर जैविक शेतीवर सुभाष शर्मा यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील हजारो नागरिक उपस्थित होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19298

Posted by on Dec 26 2014. Filed under उ.महाराष्ट्र, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.महाराष्ट्र, ठळक बातम्या (2300 of 2451 articles)


अयोध्या, [२५ डिसेंबर] - अयोध्या येथील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादातील सर्वात वयोवृद्ध पक्षकार मोहम्मद फारुक यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले. ...

×