Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » भूकंपाने भारतही हादरला, ३७ ठार

भूकंपाने भारतही हादरला, ३७ ठार

=सर्वाधिक बळी बिहारमध्ये=
Map of Bihar n nepalनवी दिल्ली, [२५ एप्रिल] – नेपाळमध्ये केंद्रबिंदू असलेल्या भूकंपाचे जबरदस्त हादरे उत्तर आणि पूर्व भारताच्या बहुतांश भागांना बसले. नेपाळच्या सीमेला लागून असल्याने बिहारला या भूकंपाचा सर्वाधिक तडाखा बसला. या राज्यात २५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. उत्तरप्रदेशात नऊ आणि पश्‍चिम बंगालमध्ये तीन जणांचा बळी गेला असून, अनेक जण जखमीही झाले आहेत. राजधानी दिल्ली, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, नागपूर, झारखंड, सिक्कीम, ओडिशा आणि मणिपूरसह अनेक राज्यांनाही या भूकंपाचे धक्के बसले आहेत.
बिहारच्या सीतामढी आणि पूर्व चंपारण या दोन जिल्ह्यांना भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. हे दोन्ही जिल्हे नेपाळ सीमेला लागून आहेत. पूर्व चंपारण जिल्ह्यात दहा आणि सीतामढी जिल्ह्यात आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याशिवाय, शेखपुरा, पूर्व चंपारण, नालंदा, मुंगेर, वैशाली, दरभंगा, किशनगंज, अरारिया यासारख्या जिल्ह्यांमध्ये काही लोकांचे बळी गेले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. भूकंपाची माहिती मिळताच मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपला दिल्ली दौरा अर्ध्यावरच संपविला आणि तातडीने पाटणा गाठले. पाटणा विमानतळावरून ते थेट सचिवालयात गेले आणि वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक बोलावून राज्यातील स्थितीचा आढावा घेतला.
भूकंपाचा धक्का बसलेल्या बिहारमधील प्रत्येक भागात एनडीआरएफच्या तुकड्या रवाना करण्यात आल्या असून, त्यांनी स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने मदत व बचाव कार्य तातडीने सुरू केले आहे. जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहे. सर्वच जिल्हा पोलिस मुख्यालयांनाही कोणत्याही आकस्मिक स्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे पोलिस महासंचालक पी. के. ठाकूर यांनी दिली.
उत्तरप्रदेशच्या बाराबांकी जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. बाराबंकीसह अन्य भागात भूकंपाने काही इमारती आणि पक्के बांधकाम कोसळले असून, त्याखाली दबल्याने ९ जणांचा मृत्यू झाला आहे. शंभरावर लोक जखमी झाले असल्याची माहिती प्रशासकीय अधिकार्‍याने दिली. बाराबंकी जिल्ह्यात पाच जण, गोरखपूर जिल्ह्यात तीन आणि संत कबीर नगर जिल्ह्यात एकाचा बळी गेला आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये आणि किरकोळ जखमींना प्रत्येकी २० रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही फोन करून राज्यातील स्थितीबाबत, उचलण्यात आलेल्या पावलांचीही माहिती दिली. दरम्यान, जेट एअरवेजचे मुंबई-काठमांडू विमान या भूकंपाच्या पार्श्‍वभूमीवर लखनौकडे वळविण्यात आले आणि चौधरी चरण सिंग विमानतळावर उतरविण्यात आले.
पश्‍चिम बंगालच्या काही भागांनाही भूकंपाचा मोठा फटका बसला. राज्याच्या पूर्वेकडील भागात अनेक मोठ्या इमारतींना तडे गेले. जलपायगुडी जिल्ह्यातील अंबारी भागात काम करणार्‍या एका महिलेचा घराची भिंत कोसळल्याने मृत्यू झाला. तर, अन्य एका घटनेत आणखी दोघांना आपला जीव गमवावा लागला. एका शालेय बसवर घराचे छत कोसळल्याने ४० विद्यार्थी जखमी झाले. राज्याच्या विविध भागांमध्ये ७५ पेक्षा जास्त लोक जखमी झाले असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. सिक्कीममध्ये भूस्खलन झाल्याची माहिती असून, त्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचेही सूत्राने सांगितले. राजस्थान, हरयाणा आणि पंजाबमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. पश्‍चिम बंगाल आणि बिहारमध्ये बसलेल्या धक्क्यांची तीव्रता सुमारे ७.४ इतकी असल्याचे सांगण्यात आले. पहिल्या भूकंपाचा धक्का तब्बल एक मिनिटपर्यंत जाणवल्यानंतर दुसरा धक्का २० सेकंदपर्यंत जाणवला. अनेकांच्या घरातील पंखे, टीव्ही आणि अन्य सामान हलायला लागले. भूकंपाचा धक्का बसल्याचे लक्षात येताच या भागातील लोक घराबाहेर पडले आणि सुरक्षित ठिकाण गाठले. कोलकात्यात सावधतेचा उपाय म्हणून मेट्रोसेवा स्थगित करण्यात आली होती.
मोदी यांनी घेतली तातडीची बैठक
भूकंपाच्या पार्श्‍वभूमीवर देशातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची बैठक बोलावली. देशभरातच भूकंपग्रस्तांना आवश्यक ती मदत पुरविण्यासाठी मदतीचा हात देण्यासाठी आवश्यक त्या सूचना पंतप्रधानांनी या बैठकीत दिल्या. केंद्र सरकारने आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे. सर्वच राज्यांमध्ये केंद्रीय पथके रवाना झालेली आहेत. याशिवाय, सर्व राज्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिली.
एनडीएमएने आधीच दिला होता इशारा
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अर्थात एनडीएमएने भारतात शक्तिशाली भूकंपाचा इशारा २०१३ मध्येच दिला होता. जम्मू-काश्मीर ते अरुणाचल प्रदेश यासारख्या हिमालयीन राज्यांमध्ये जर मोठा भूकंप झाला, तर किमान आठ लाख लोकांना आपला जीव गमवावा लागेल, असे एनडीएमएने स्पष्ट केले आहे.
हिमालयाचा संपूर्ण भागच भूकंपप्रवण आहे. १८९७ ते १९५० या ५३ वर्षांच्या काळात भूकंपाचे चार मोठे हादरे या भागाला बसले आहेत. १८९७ मध्ये शिलॉंगला, १९०५ मध्ये कांगडा, १९३४ मध्ये बिहार-नेपाळ सीमावर्ती भागांना आणि १९५० मध्ये आसामला आठ पेक्षाही जास्त तीव्रता असलेल्या भूकंपांचे हादरे बसले आहेत आणि यामुळे मोठ्या प्रमाणात प्राणहानी व संपत्ती हानी झालेली आहे.
१९५० नंतर या भागांना फार मोठ्या तीव्रतेचा भूकंप झाला नसला, तरी आता हा भाग पुन्हा एकदा भूकंपाकडे झुकत असून, आठ किंवा त्यापेक्षा जास्त तीव्रतेचा धक्का बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही आणि असे झाल्यास किमान आठ लाख लोकांचा बळी जाण्याची भीती आहे, असे एनडीएमएचे उपाध्यक्ष एम. शशिधर रेड्डी यांनी सांगितले.
भारताच्या कोणत्या भागात आणि केव्हा भूकंपाचा शक्तिशाली धक्का बसेल, याबाबत ठोसपणे सांगणे शक्य नसल्याने, अशा धक्क्यांपासून होणारी प्राणहानी टाळण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे भूकंपरोधक समाज विकसित करणे होय, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22264

Posted by on Apr 26 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1751 of 2453 articles)


=जिनपिंग यांच्या भेटीत झाला करार, भारतासाठी धोक्याची घंटा= इस्लामाबाद, [२५ एप्रिल] - चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या अलीकडील पाकिस्तान दौर्‍यात ...

×