Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » भूपृष्ठ परिवहन मंत्रालय शेततळे खोदून देणार : गडकरी

भूपृष्ठ परिवहन मंत्रालय शेततळे खोदून देणार : गडकरी

nitin gadkari1नवी दिल्ली, [२८ एप्रिल] – देशाच्या विविध भागात राष्ट्रीय महामार्ग आणि पूल बांधणार्‍या केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्रालयाने आता दुष्काळग्रस्त भागामध्ये जलसंवर्धनाला गती देण्यासाठीही पुढाकार घेतला आहे. यासंदर्भातील घोषणा केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे एका पत्रपरिषदेत केली.
दुष्काळग्रस्त भागामध्ये जलसंवर्धनाला गती देण्यासाठी शेततळे, छोटे तळे आणि तलाव खोदण्याचा निर्णय मंत्रालयाने घेतला आहे, असे स्पष्ट करत गडकरी म्हणाले की, नदी आणि नाल्यांच्या खोलीकरणाचा आणि रुंदीकरणाचा निर्णयही घेण्यात आला आहे. यातून निघणार्‍या मातीचा उपयोग रस्त्यांच्या बांधकामासाठी केला जाणार आहे.
भूपृष्ठ परिवहन मंत्रालयातर्फे देशाच्या विविध भागात मोठ्याप्रमाणात रस्त्यांची आणि पुलांची कामे केली जात आहे. या कामांसाठी बांधकाम कंत्राटदारांना मोठ्या प्रमाणात मातीची आवश्यकता भासते. ही माती त्यांना वेगवेगळ्या मार्गाने विकत घ्यावी लागते, याकडे लक्ष वेधत गडकरी म्हणाले की, त्यामुळे शेतकर्‍यांनाही फायदा मिळावा तसेच बांधकाम कंत्राटदारांनाही माती उपलब्ध व्हावी म्हणून दूरगामी परिणाम करणारा हा निर्णय आमच्या मंत्रालयाने घेतला आहे. या योजनेनुसार शेतकर्‍याच्या शेतात बांधकाम कंत्राटदार आपल्या खर्चाने शेततळे खोदून देईल. यामुळे शेतकर्‍यांना आपल्या शेतात एक पैसाही खर्च न करता शेततळे मिळेल, या शेततळ्यात पाणी साठवून शेतकरी त्याचा उपयोग आपल्या शेतातील पिकांच्या सिंचनासाठी करेल. यामुळे शेतकर्‍याच्या शेतातील उत्पादनात अडीचपटीने वाढ होईल. दुसरीकडे बांधकाम कंत्राटदारांना आपल्या रस्त्याच्या कामासाठी माती मिळेल. शेतातून माती वाहून नेण्याची जबाबादारी कंत्राटदाराचीच राहणार आहे.
आजपर्यत देशात कधीही असा अभिनव प्रयोग करण्यात आला नाही, याकडे लक्ष वेधत गडकरी म्हणाले की, याचपद्धतीने ग्रामीण भागात चेकडॅमचीही कामे केली जातील. यामुळे जलसंवर्धन होत ग्रामीण भागातील पाण्याच्या पातळीतही वाढ होईल. अशी कामे करण्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील २८ कामांना मंजुरी
एआयबीपीअंतर्गत केंद्र सरकारने ८९ कामांना मंजुरी दिली असून यातील २८ कामे महाराष्ट्रातील आहेत. चार वर्षांत ही कामे पूर्ण करायची असून यासाठी ८० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.
यामुळे देशातील १ कोटी हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे, असे स्पष्ट करत गडकरी म्हणाले की, याशिवाय प्रधानमंत्री सिंचन योजनेसाठी आणखी २० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात देशातील जमीन सिंचनाखाली येणार आहे. याचा फायदा शेतकर्‍यांनाच मिळणार आहे. त्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती होणार आहे.
महाराष्ट्रातील विविध सिंचन प्रकल्पांबाबत निर्णय घेण्यासाठी ३ मेला मुंबईत जलसंसाधन मंत्री उमा भारती यांच्या उपस्थितीत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांच्या उपस्थितीत अशीच बैठक दिल्लीत घेतली जाणार आहे, असे गडकरी यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28048

Posted by on Apr 28 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (418 of 2453 articles)


=पर्रीकरांचे कॉंगे्रसला आव्हान= नवी दिल्ली, [२७ एप्रिल] - ३६५ कोटी रुपयांच्या व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर्स खरेदी घोटाळ्यात सहभागी असलेल्या ऑगस्टा वेस्टलॅण्ड कंपनीवर ...

×