Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » भ्रष्टाचारमुक्त शासन दिले!

भ्रष्टाचारमुक्त शासन दिले!

=दोन आकडी विकास दर साधण्यावर भर : वर्षपूर्तीनिमित्त अरुण जेटली यांचे प्रतिपादन=
arun jaitley5नवी दिल्ली, [२२ मे] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाप्रणीत रालोआ सरकार केंद्रात सत्तेवर येऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. सरकारचे हे पहिले वर्ष देशाला भ्रष्टाचारापासून मुक्ती देणारेच ठरले. भ्रष्ट राजकारणापासून सर्वसामान्यांची खर्‍या अर्थाने मुक्तता झाली आहे आणि त्याचा परिणाम देशाच्या आर्थिक विकासावरही दिसून येणार आहे. पुढील आर्थिक वर्षात दुहेरी विकास दर गाठण्यावर आमचा भर राहणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज शुक्रवारी येथे केले.
पूर्वीच्या कॉंगे्रसप्रणीत संपुआ सरकारच्या काळात महागाई अनियंत्रित झाली होती. सर्वसामान्यांना जगणे कठीण झाले होते. भ्रष्टाचाराने तर सर्वच सीमा ओलांडल्या होत्या. पण, गेल्यावर्षी मे महिन्यात भाजपा सत्तेवर आली आणि भ्रष्टाचाराला वेसण घालण्यासोबतच महागाईवरही तातडीने नियंत्रण करण्यात आले. घाऊक आणि किरकोळ महागाईचा दर विक्रमी नीचांकावर आली असल्याने भारतीय रिझर्व्ह बँक आपल्या आगामी पतधोरण आढाव्यात प्रमुख कर्जांवरील व्याजदरात नक्कीच कपात करेल, असा विश्‍वास आहे. यामुळे घर आणि वाहन खरेदीचे सर्वसामान्यांचे स्वप्न आणखी स्वस्त होणार आहे, असे जेटली यांनी पत्रपरिषदेला संबोधित करताना सांगितले.
एक वर्ष आधी देशात नैराश्याचे वातावरण होते, सर्वत्र अंध:कार होता. पण, आता चित्र बदलले आहे. देशवासीयांच्या मनात प्रबळ आशावाद निर्माण झाला आहे. विदेशातही भारताचे महत्त्व वाढले आहे. भारताची अर्थव्यवस्था सध्या ७.५ ते ८ टक्के अशा गतीने विकास करीत आहे. पुढील वर्षी हा दर दुहेरी आकड्यापर्यंत नेण्याचा आमचा संकल्प आहे. त्यासाठी काही महत्त्वाच्या क्षेत्रात अतिशय जलदगतीने निर्णय घेणे आवश्यक आहे.
आर्थिक सुधारणा कार्यक्रम आणखी वेगाने राबविला जाणार आहे. भूसंपादन आणि जीएसटी विधेयक संसदेत मंजूर करण्याला सरकारचे प्राधान्य असेल. कररचना आणखी सोपी आणि सहज करण्यासाठी सरकार जीएसटी विधेयक आणणार आहे. हा निर्णय या क्षेत्रातील ऐतिहासिक असाच असेल, असे सांगताना जेटली म्हणाले की, काळ्या पैशाचे उगमस्थान कायमचे बंद करण्यासाठी सरकार लवकरच एक अधिसूचना जारी करणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौर्‍यांवर टीका करणार्‍या विरोधकांना विशेषत: कॉंगे्रसलाही जेटली यांनी आडव्या हाताने घेतले. कोणतेही कारण नसताना तब्बल दोन महिन्यांच्या सुटीवर जाणे व परत आल्यानंतर शेतकरी व सर्वसामान्यांविषयी कळवळ्याचा देखावा करणे आणि विदेशात जाऊन भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करणे, भारताची खालावलेली प्रतिष्ठा परत आणणे यात मोठा फरक आहे, असा जोरदार चिमटा जेटली यांनी काढला. भाजपा सरकार केवळ श्रीमंतांचेच आहे, असा आरोप कॉंगे्रस वारंवार करीत असते. पण, हा आरोप निराधार आहे. भाजपा सरकार प्रगती आणि विकासाला चालना देणारे आहे. यात समाजातील सर्वच वर्गांचा फायदा होणार आहे. विकासाची फळे सर्वांना मिळणार असून, त्यात गरीब आणि श्रीमंत असा कोणताही भेद राहणार नाही, असे जेटली यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22643

Posted by on May 23 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1673 of 2453 articles)


=संरक्षणमंत्री पर्रिकर यांचा सवाल, लष्करालाच आघाडीवर का पाठवायचे= नवी दिल्ली, [२२ मे] - शेजारील देश परराष्ट्र धोरण म्हणून जर दहशतवादाचा ...

×