Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » मर्यादा लक्षात घेऊन विकासाचे धोरण आखले पाहिजे : भागवत

मर्यादा लक्षात घेऊन विकासाचे धोरण आखले पाहिजे : भागवत

=उत्तराखंड नैसर्गिक आपत्तीला तीन वर्ष पूर्ण=
dr mohanji bhagwat2नवी दिल्ली, [१८ जून] – मर्यादा लक्षात घेऊन विवेकाचा वापर करत विकासाचे धोरण आखले पाहिजे, अमर्यादित विकास हा आमच्या नाशाला कारणीभूत होऊ शकतो, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे केले.
उत्तराखंड येथील नैसर्गिक आपत्तीच्या घटनेला तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या आपत्तीत मृत्यमुखी पडलेल्यांना अ. भा. उत्तराखंड आपत्ती पीडित मंचातर्फे श्रद्धांंजली वाहण्यासाठी येथील मावळणकर सभागृहात शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात डॉ. मोहनजी भागवत बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरलीमनोहर जोशी होते. यावेळी व्यासपीठावर रा. स्व. संघाचे सह सरकार्यवाह कृष्णगोपालजी, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह, वन आणि पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर, वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री निर्मला सीतारामन, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री खा. रमेश पोखरियाल, खा. सत्यपालसिंह, खा. राजेंद्र अग्रवाल, खा. विजय गोयल प्रभृती उपस्थित होते.
अध्यात्म आणि विज्ञान यांच्या मर्यादेत विकास झाला पाहिजे. अध्यात्म आणि विज्ञान हे दोन्हीही धर्माला पूरक असले पाहिजे. मर्यादा ही फक्त धोरणातच नाही तर ती आचरणातही असली पाहिजे, असे ते म्हणाले.
निसर्ग आणि पर्यावरण यांचे जतन आणि संवर्धन कसे करावे, यांचे शिक्षण आम्हाला आमच्या पूर्वजांनी आपल्या अनुभवातून आणि पुराणातून दिले आहे. मात्र त्याकडे आम्ही दुर्लक्ष केले. पूर्वजांपासून चालत आलेले हे ज्ञान आम्ही काळाच्या कसोटीवर घासून घेतले पाहिजे, असे डॉ. भागवत म्हणाले.
आम्ही विकासाच्या नावाखाली आम्ही हिमालयाच्या नैसर्गिक प्रवृत्तीला आव्हान दिले, त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागले, असे स्पष्ट करत डॉ. भागवत म्हणाले की, त्यामुळे विकासासाठी तारतम्य बाळगले पाहिजे. सरकारनेही विकासाचे धोरण आखतांना त्यात लोकानुनयाला स्थान राहणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.
मानवीय भूमिकेतून संकटांचा सामना केला तर जगात असे कोणतीही संकट नाही, जे नामोहरम करता येणार नाही. रा. स्व. संघाची हीच भूमिका आहे, असे डॉ. भागवत यांनी सांगितले.
डॉ. मुरलीमनोहर जोशी
हिमालयाला धोका असल्याची सर्वप्रथम जाणीव गोळवलकर गुरुजींनी करून दिली होती. त्यानंतर हिमालय बचाओ चळवळ सुरू झाली होती; पण हिमालयाचा धोका काही टळला नाही, उलट वाढला, याकडे लक्ष वेधत डॉ. मुरलीमनोहर जोशी म्हणाले की, आमची विकासाची भूमिका हिमालयाचे संरक्षण आणि संवर्धन करणारी असली पाहिजे.
प्रकाश जावडेकर
हिमालयाचा अभ्यास करण्यासाठी २०० कोटी रुपये खर्च करुन सरकारने स्वतंत्र संशोधन संस्था स्थापन केली आहे, या संस्थेच्या अभ्यासानंतरच स्थानिक वातावरण आणि पर्यावरण लक्षात घेऊन विकासाचे धोरण तयार केले जाईल, असे वन आणि पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
यावेळी निर्मला सीतारामन, रमेश पोखरियाल, व्ही. के. सिंह, जगत्गुरू अनंताचार्य महाराज, दंडीस्वामी शंकरानंद सरस्वती यांचीही भाषणे झाली. भाजपा खा. अश्‍विनीकुमार चौबे यांनी प्रास्ताविक केले. प्रारंभी उत्तराखंडच्या नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्यांना पुष्पांजली वाहण्यात आली. उत्तराखंडच्या नैसर्गिक आपत्तीत चांगले काम करणार्‍या व्यक्ती आणि संघटनांचा यावेळी सत्कार करण्यात आला, काहींना आर्थिक मदतही करण्यात आली. त्रिनेत्र या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28648

Posted by on Jun 19 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (217 of 2453 articles)


=चीनचे मन वळविण्याचा प्रयत्न करणार= मॉस्को, [१८ जून] - पुढील आठवड्यात सेऊल येथे होणार्‍या अणुपुरवठादार देशाच्या (एनएसजी) बैठकीत भारताच्या उमेदवारीला ...

×