Home » आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप » महात्मा गांधींची शिकवण प्रेरणा देणारी: कॅमरून

महात्मा गांधींची शिकवण प्रेरणा देणारी: कॅमरून

=लंडन येथे कांस्य पुतळ्याचे थाटात अनावरण=
david-cameronलंडन, [१४ मार्च] – महात्मा गांधी यांच्या ऐतिहासिक कांस्य पुतळ्याचे आज शनिवारी येथील पार्लियामेंट स्क्वेअर परिसरात थाटात अनावरण करण्यात आले. या पुतळ्याच्या शेजारीच दुसर्‍या महायुद्धाच्या काळातील ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल आणि वर्णभेदाविरुद्ध लढा देणारे दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांचेही पुतळे आहेत.
महात्मा गांधी यांच्या सुमारे ९ फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आयोजित सोहळ्यात ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून, अर्थमंत्री अरुण जेटली, हिंदी चित्रपट सृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन आणि महात्मा गांधी यांचे नातू गोपालकृष्ण गांधी यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. लंडन येथील पार्लियामेंट स्क्वेअर येथे अशाप्रकारचा सन्मान मिळालेले महात्मा गांधी हे पहिलेच भारतीय आणि कोणत्याही सरकारी पदावर न राहिलेले पहिलेच व्यक्ती ठरले आहेत. कॅमरून आणि जेटली यांनी संयुक्तपणे या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी ‘रघुपती राघव राजाराम’ या महात्मा गांधींच्या आवडत्या भजनाची धून वाजविण्यात आली.
जागतिक राजकारणाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या व्यक्तीला आगळीवेगळी आदरांजली अर्पण करण्यासाठीच हा पुतळा उभारण्यात आला आहे. या ऐतिहासिक चौकात आम्ही या महान नेत्याचा सन्मान करीत आहोत. त्यांची शिकवण आजही जगाला प्रेरणा देणारीच आहे, असे कॅमरून यांनी यावेळी सांगितले.
महात्मा गांधींचा हा पुतळा जगातील दोन सर्वात जुन्या लोकशाही देशांमधील मैत्रीसंबंध आणखी मजबूत झाल्याचा साक्षीदार आहे. गांधीजींच्या संदेशात जी जागतिक शक्ती होती, त्याचे हा पुतळा प्रतिक आहे. भारत आणि ब्रिटनचे संबंध नेहमीच मजबूत राहिले आहेत आणि पुढेही ते आणखी मजबूत होत राहणार आहेत. परस्परांविषयी आदर आणि सहकार्य हाच आमच्या मैत्रीचा आधार आहे. १५ लाख भारतीयांनी ब्रिटनच्या विकासात मोठा हातभार लावला आहे. दोन्ही देशांमधील वाढते सहकार्य परस्परांच्या हितात आहे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
गांधीजींच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी विशेष करून निमंत्रित करण्यात आलेले जेटली म्हणाले की, भारतावर दीडशे वर्षे राज्य करणार्‍या ब्रिटिशांना ‘चले जाव’चा नारा देणारे महात्मा गांधी यांचाच पुतळा या ऐतिहासिक परिसरात उभारून ब्रिटिशांनी आपल्या सभ्य संस्कृतीचाच परिचय दिला आहे. आजचा दिवस खरोखरच ऐतिहासिक आहे. दोन्ही देशांचे संबंध यामुळे आणखी मजबूत होणार आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21439

Posted by on Mar 15 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप (1917 of 2458 articles)


=पक्षांतर्गत कलहांवर प्रथमच केजरीवाल बोलले= बंगळुरू, [१४ मार्च] - आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या ...

×