Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » महामार्गावर दर १०० किमीवर रुग्णालयाचा प्रस्ताव

महामार्गावर दर १०० किमीवर रुग्णालयाचा प्रस्ताव

=सभापतींकडून गडकरींची प्रशंसा=
nitin gadkari2नवी दिल्ली, [२५ फेब्रुवारी] – प्रश्‍नोत्तराच्या तासात दिलेल्या मुद्देसूद आणि समाधानकारक उत्तराबद्दल लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी आज गुरुवारी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची प्रशंसा केली. अपघातात जखमी होणार्‍यांना तातडीने उपचार मिळून त्यांचे प्राण वाचावे म्हणून महामार्गावर दर १०० किमीवर रुग्णालय बांधण्याचा प्रस्ताव असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
रस्त्यांवरील वाढते अपघात आणि ते रोखण्यासाठी सरकारने केलेले प्रयत्न याबाबत शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी विचारलेल्या प्रश्‍नावर गडकरी यांनी नेमके आणि मुद्देसूद उत्तर दिले. यावर सुमित्रा महाजन यांनाही गडकरी यांची प्रशंसा करण्यापासून राहवले नाही. खूप चांगले उत्तर अशा शब्दात सुमित्रा महाजन यांनी गडकरी यांची प्रशंसा केली. गडकरी प्रामाणिकपणे काम करत आहेत, असेही महाजन म्हणाल्या.
स्वीडनमध्ये वर्षभरात फक्त एक अपघात होतो आणि आपल्या देशात वर्षभरात पाच लाख अपघात होतात, याकडे लक्ष वेधत गडकरी म्हणाले की, अपघातांसाठी फक्त चालकच जबाबदार असल्याची आपली भावना असते. पण अपघातांसाठी फक्त चालकच जबाबदार असतो, असे नाही. अनेकवेळा रस्त्याच्या सदोष बांधकामामुळेही अपघात होतात. त्यामुळे रस्त्यावरील अपघाताची कारणे तुमच्या लक्षात आली तर आम्हाला कळवा. आम्ही वेबसाईट सुरु केली आहे. अपघातांची ही कारणे तत्काळ दूर करण्यासाठी आम्ही केंद्र, राज्य सरकारे आणि महापालिकांना तातडीने सूचना देऊ.
अपघात स्थळावर अपघात होऊ नये म्हणून राज्य सरकार उपाययोजना करत असेल, तर त्या राज्याला सीआरएफ निधीचे वाटप करताना आम्ही प्राधान्य देऊ, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. अपघात रोखण्यासाठी आवश्यक तेथे अंडरब्रिज आणि ओव्हरब्रिज बांधले जातील. याशिवाय चालू आर्थिक वर्षात देशात २५०० रेल्वे ओव्हरब्रिज बांधण्यात येतील, असे गडकरी म्हणाले. रस्त्यांच्या सदोष कामामुळे अपघात होत असतील, तर त्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना जबाबदार धरले जाईल, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही गडकरी म्हणाले.
देशात सर्वाधिक म्हणजे ६७,२५० अपघात तामिळनाडूत, तर त्याखालोखाल ६१,६६७ अपघात महाराष्ट्रात होतात. वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि रस्त्यांचे सदोष बांधकाम यामुळे अपघात वाढत आहेत, पण त्यासाठी मला कोणालाही दोष द्यायचा नाही. अपघात कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, याकडे लक्ष वेधत गडकरी म्हणाले की, यासाठी राजकीय नेते, जनता आणि नोकरशाही यांनी संवेदनशील होण्याची गरज आहे.
मी महाराष्ट्रात मंत्री असताना रस्त्यांवरील अपघात कमी करण्यासाठी अपघात निवारण समिती स्थापन केली होती. त्याचा चांगला फायदाही झाला होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले. अपघातात जखमी होणारा व्यक्ती कोणत्याही जातीधर्माचा, पंथाचा, राज्याचा आणि भाषेचा असला तरी त्याला न्याय मिळावा, असा आमचा प्रयत्न आहे. यासाठी प्रत्येक १०० किमीवर रुग्णालय बांधण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे गडकरी म्हणाले. वाहन परवाने देण्याच्या पद्धतीतही आम्ही सुधारणा करत आहोत, याकडे लक्ष वेधत गडकरी म्हणाले की, वाहनचालकांना वाहन चालवण्याचे शास्त्रीय प्रशिक्षण दिले जाईल, त्यानंतर त्यांची संगणकीय परीक्षा घेतल्यावरच त्यांना वाहन परवाना दिला जाईल, अशी २३ केंद्रे सध्या सुरू करण्यात आले आहे, ही संख्या नंतर वाढवण्यात येईल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26897

Posted by on Feb 25 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (814 of 2453 articles)


स्मृती इराणींच्या तडाखेबंद भाषणाने विरोधकांची बोलती बंद मोदींचे ट्विट सत्यमेव जयते नवी दिल्ली, [२४ फेब्रुवारी] - लहान मुले देशाचे ...

×