Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » महिषासूर मुद्यावरून राज्यसभेत गदारोळ

महिषासूर मुद्यावरून राज्यसभेत गदारोळ

  • स्मृती इराणी यांच्या माफीची कॉंग्रेसची मागणी
  • मी आस्थावान हिंदू, दुर्गामातेची उपासक

नवी दिल्ली, [२६ फेब्रुवारी] – जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील महिषासूर कार्यक्रमाबाबत केलेल्या विधानावरून राज्यसभेत आज शुक्रवारी कॉंग्रेसने केंद्रीय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांना घेरत त्यांच्या माफीची मागणी केली. आपण कोणत्याही देवीदेवतेबद्दल अपशब्द काढले नाही, तर विद्यापीठाच्या आवारात वाटण्यात आलेले पत्रक वाचून दाखवले, असे इराणी यांनी स्पष्ट केले.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या परिसरात वाटण्यात आलेले देवीदेवतांबद्दल आक्षेपार्ह घोषणा असणारे पत्रक स्मृती इराणी यांनी सभागृहात वाचून दाखवले, हा हिंदूंच्या देवदेवतांचा अपमान आहे, त्यामुळे इराणी यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी कॉंगे्रसचे सभागृहातील गटनेते गुलाम नबी आझाद यांनी केली. अनेकवेळा अनेक धार्मिक नेत्यांबद्दल आक्षेपार्ह प्रचार केला जातो, पण त्याचा उल्लेख सभागृहात केला जात नाही, असा आक्षेपार्ह मजकूर सभागृहात वाचून दाखवला जात नाही, असे आझाद म्हणाले. इराणी माफी मागत नाही, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू न देण्याचा इशारा कॉंग्रेस सदस्यांनी दिला.
स्मृती इराणी यांचा बचाव करीत संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी म्हणाले की, विरोधकांना संसदीय कामकाजात आवड राहिली नाही. त्यामुळे कोणताही मुद्दा उपस्थित करून मंत्र्यांच्या माफीची मागणी केली जाते. राष्ट्रद्रोही घोषणा देणार्‍यांची बाजू घेतल्यामुळे कॉंग्रेस उपाध्यक्षांची देशभर निंदा होत असल्यामुळे हे प्रकरण उपस्थित करण्यात आल्याचा आरोप नकवी यांनी केला.
मी आस्थावान हिंदू असून, दुर्गामातेची पूजा करीत असते, याकडे लक्ष वेधत स्मृती इराणी म्हणाल्या की, देशद्रोहाच्या घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांबाबत तुमच्याजवळ काय पुरावे आहेत, अशी वारंवार विचारणा माझ्याकडे करण्यात आल्यामुळे मी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात वाटण्यात आलेले ते आक्षेपार्ह पत्रक वाचून दाखवले. ते पत्रक मी काढलेले नव्हते, आणि सरकारनेही काढलेले नव्हते. त्या पत्रातील भाषा आमची नाही. विद्यापीठाच्या प्रशासनाने ते पत्रक केंद्र सरकारकडे पाठवले होते. त्यामुळे या मुद्यावर माफी मागण्याचा प्रश्‍नच उदभवत नाही, असे त्या म्हणाल्या.
दुर्गामातेबद्दल पत्रकात जे काही म्हटले असेल, त्याचा संपूर्ण सभागृहाने निषेध करायला हवा, असे तृणमूल कॉंग्रेसचे सुखेंदू रॉय म्हणाले. देवीदेवतांबद्दल वा कोणा समाजाबद्दल आक्षेपार्ह मजकूर असेल, तर तो सभागृहात मांडता येत नाही, याकडे लक्ष वेधत आक्षेपार्ह मजकूर नोंदल्या गेला असेल, तर तो कामकाजातून वगळण्यात येईल, असे उपाध्यक्ष कुरियन यांनी स्पष्ट केले.
सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ होताच कॉंग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी हा मुद्दा उपस्थित केला. स्मृती इराणी यांनी दुगादेवीबद्दल आक्षेपार्ह मजकूर जशाचा तसा वाचून दाखवला, त्यामुळे सभागृहाच्या भावना दुखावल्या. सभागृहाच्या बाहेर कोणी देवीदेवतांबद्दल आक्षेपार्ह घोषणा दिल्या, तर त्याचा उल्लेख सभागृहात करायचा का, अशी विचारणाही शर्मा यांनी केली. जदयुचे के. सी. त्यागी आणि अन्य सदस्यांनी शर्मा यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26904

Posted by on Feb 27 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (809 of 2453 articles)


=मायावती यांचा स्मृती इराणींवर हल्ला= नवी दिल्ली, [२६ फेब्रुवारी] - बसपाच्या नेत्या मायावती आणि केंद्रीय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी ...

×