Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » मानवकल्याण हेच अंतिम उद्दिष्ट: भय्याजी जोशी

मानवकल्याण हेच अंतिम उद्दिष्ट: भय्याजी जोशी

bhaiyyaji joshiमुंबई, [२३ ऑक्टोबर] – नैतिक, धार्मिक आणि मानवकल्याणासाठी भारताने जगाचे नेतृत्व करायचे आहे. सामर्थ्यशील नेतृत्व करणारी माणसे तयार करणे व निर्दोष, जागृत आणि संघटित भारतासाठी संघ अविरत प्रयत्नशील आहे. विश्‍वगुरू भारतासाठी अजून खूप मोठा पल्ला गाठायचा असला, तरी संघाचा प्रवास योग्य दिशेने सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. समग्र हिंदू संघटनांतून भारताला परमवैभवापर्यंत नेऊन संपूर्ण मानवकल्याण साधणे, आपले अंतिम उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी येथे केले. विजयादशमी उत्सवानिमित्त ठाण्यातील गावदेवी मैदान येथे संघ स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी जैनाचार्य सुरेश्‍वरमुनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच ठाणे जिल्हा संघचालक विवेकानंद वडके, विभाग संघचालक मधुकर बापट, ह. भ. प. सदगीर महाराज, इस्कॉनचे प्रतिनिधी, ज्यू समाजातील मान्यवर, चिन्मय मिशनचे प्रतिनिधी, तसेच विविध जातिसमूहातील प्रतिष्ठित व्यक्ती यावेळी विशेष निमंत्रित म्हणून व्यासपीठावर उपस्थित होत्या. उत्सवानंतर भव्य घोष व ध्वजसंचलन करण्यात आले, तसेच शस्त्रपूजनदेखील या वेळी संपन्न झाले.
भय्याजी जोशी पुढे म्हणाले, प्रभू रामचंद्रांनी रावणावर विजय मिळवून राज्य रावणाच्या बंधूकडे सोपवले. आपल्या संस्कृतीत विजयदेखील निस्वार्थपणे प्राप्त करण्याची शिकवण आहे. विजय सर्वसामान्यांसाठी असला पाहिजे. संघाच्या स्थापनेला ९० वर्षे पूर्ण झाली. हा कालावधी लहान अथवा मोठा मानता येणार नाही. अद्यापही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. सामाजिक परिवर्तनाचे लक्ष्य मानून संघ काम करीत आहे. इतक्या वर्षांच्या कामानंतर आपण योग्य दिशेने जात असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. अनेक देशांमध्ये संस्कृत श्‍लोकांपासून कार्यारंभ करण्याची पद्धत रूढ होऊ लागली आहे.
जगातील १८० देशांनी ‘योग’ स्वीकारला आहे. आयुर्वेदालादेखील जगभर मान्यता मिळत आहे. प्रगत राष्ट्रांच्या वर्चस्ववादी मनोवृत्तीपासून आपले संरक्षण व्हावे म्हणून जगातील अनेक लहान देश भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. प्रकृतीशी सुसंगत व्यवहार करण्याची आपली शिकवण आहे. भारत हा देणार्‍यांचा देश आहे. तो कधीच घेण्यासाठी कुठे गेला नाही, त्याने कधी आक्रमण केले नाही. हिंदू संस्कृतीत सर्वांना सन्मान आहे. सगळ्यांच्या स्वातंत्र्याचा सन्मान केवळ हिंदुत्वच करू शकते,’ असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब देवरस, पंडित दीनदयाल उपाध्याय, एकनाथ रानडे, नानाजी देशमुख आदी व्यक्तिमत्त्वांच्या वैचारिक मार्गदर्शनामुळे आपला देश उभा आहे. हिंदू समाज हे या व्यक्तिमत्त्वांचे कार्यक्षेत्र होते. हिंदू समाज हा दोषमुक्त व्हावा व तो सामर्थ्यसंपन्न होत स्वाभिमानाने उभा राहावा, यासाठी या व्यक्तिमत्त्वांनी काम केले. जगाच्या पटलावर हिंदू समाजाचे जे दायित्व आहे ते पूर्ण करण्यासाठी त्यांच्यात सामर्थ्य निर्माण व्हावे म्हणून संघ प्रयत्नशील आहे. वर्तमानाचे प्रश्‍न सोडवताना सध्याच्या व्यवस्थेला भविष्यातील प्रश्‍न समजत नाहीत. या प्रश्‍नांना केवळ हिंदू संस्कृती हेच उत्तर असून, आज कदाचित जग ‘हिंदू’ हा शब्द स्वीकारणार नाही. मात्र, हिंदू संस्कृतीचा प्रभाव आता जग स्वीकारायला लागले आहे, हे शुभलक्षण आहे,’ असेही भय्याजी जोशी यांनी यावेळी सांगितले.
हजारो वर्षांपासून हिंदू संस्कृती परंपरेने विकसित होत गेली. परिवर्तनाच्या प्रक्रियेत या संस्कृतीने आपल्यातील दोषदेखील दूर केले. काळाच्या ओघात ही प्रक्रिया खंडित झाली होती. त्यामुळे काही अनिष्ट प्रथा पडल्या. जाती-प्रांताचे भेद उभे राहिले, हे भेद आपण मिटविले पाहिजेत, यासाठी समाजातील धार्मिक व्यक्तींनी, समाजसुधारकांनी पुढाकार घेतला पाहिजे. कारण हे दोष दूर करणे हे राजकारणाचे काम नाही किंवा कायद्यानेही हे प्रश्‍न सुटणार नाहीत. राजकारणातून या प्रश्‍नांचा मतपेट्यांच्या दृष्टिकोनातून गैरफायदा घेतला जाईल, तर कायद्याने हे प्रश्‍न सुटण्याऐवजी ते झाकले जातील. कायद्याच्या भयाने प्रश्‍न झाकायचे की सोडवायचे, याचा निर्णय आपण घेतला पाहिजे.
आपल्याला राजकीय संकुचितपणातून बाहेर पडावे लागणार आहे. देश आणि समाजाचे हित लक्षात घेतले पाहिजे. आपण लोकशाहीचा मार्ग अवलंबला आहे. हा मार्ग कमीत कमी दोष असलेला योग्य मार्ग आहे; पण याचबरोबर जागृत समाजदेखील निर्माण व्हायला हवा. निर्दोष, जागृत संघटित भारतासाठी आपण प्रयत्न करण्याची गरज आहे,’ असेही सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी नमूद केले.
एकविसावे शतक हे भारताचे आहे, हिंदुत्वाचे आहे, आर्य संस्कृतीचे आहे. स्वच्छ चारित्र्यनिर्मितीतून भारताच्या हितासाठी काम करीत असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ योग्य दिशेने काम करीत आहे. आपल्याकडे बहादुरी आणि शौर्य असताना एकता नसल्याकारणाने आपल्यावर आक्रमणे झाली आणि आपण पारतंत्र्यात गेलो. आतादेखील भाषा, प्रांतवादाच्या नावाने भेद पाडले जात आहेत. अशा परिस्थितीत समग्र हिंदू संघटनासाठी व समाजसेवेसाठी संघ काम करीत असून, संघाचे काम हे नक्कीच कौतुकास्पद आहे,’ असे या वेळी बोलताना उत्सवाचे प्रमुख पाहुणे जैनाचार्य सुरश्‍वर मुनी यांनी सांगितले. सूत्रसंचालन शहर कार्यवाह अजय जोशी यांनी केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25289

Posted by on Oct 24 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1291 of 2453 articles)


=प्रकाश जावडेकर यांची भूमिका= नवी दिल्ली, [२३ ऑक्टोबर] - यंग इंडिया प्रकरणी भाजपाने उपस्थित केलेल्या प्रश्‍नांची उत्तर देण्याचे टाळत कॉंग्रेस ...

×